यंदा संगमनेरचे गणेशविसर्जन निर्विघ्न पार पडणार का? अधिकार्यांच्या बदल्यांचा परिणाम; बुडिताच्या घटना टाळण्याचे आव्हान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मान्सूनच्या मध्यात पुनरागमन करणार्या पावसाने उत्तर नगरजिल्ह्यातील छोट्या-मोठ्या धरणांसह मराठवाड्याची तहाण भागवणार्या जायकवाडी जलाशयाचा पाणीसाठाही शंभर टक्क्यांजवळ पोहोचवला आहे. त्यातही अद्याप मान्सून टिकून असल्याने गणेशोत्सवादरम्यान अकोले तालुक्यात पाऊस झाल्यास मुळा, प्रवरासह आढळा व म्हाळुंगी नद्यांनाही पूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच गेल्या सहा वर्षात शहरासाठी निर्माण झालेल्या आदर्श विसर्जन पद्धतीचा अनुभव असलेल्या अधिकार्यांच्या एकामागून एक बदल्यांचे सत्र सुरु असल्याने यंदाचा उत्सव बुडिताच्या घटनांशिवाय निर्विघ्नपणे पार पडेल का? अशी शंकाही निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी शहराच्या अपघात मुक्त विसर्जन प्रक्रियेचे एकमेव साक्षीदार असल्याने त्यांचीही बदली झाल्यास गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यावर विघ्नांचे संकट घोंगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्पूर्वीच विसर्जन सोहळ्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्याची गरज आहे.

संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 129 वर्षांचा प्रगल्भ इतिहास आहे. पुण्यात या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर पुढील वर्षी संगमनेरातील रंगारगल्लीतील सोमेश्वर मंदिरात या लोकोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या उपस्थितीत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर वर्षा, दोन वर्षांच्या अंतराने देवांग कोष्टी समाज, साळी समाज, ब्राह्मण समाज, माळी समाज, क्षत्रिय समाज, कुंभार समाज, मराठा समाज अशा शहरातील विविध भागात नांदणार्या जातींमधील लोकांनी आपापल्या समाज मंदिरात गणरायांची स्थापना करुन दहा दिवसांचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पुढे त्यात जाती विरहित चौक व गल्ल्यांचा समावेश होवून सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येने त्याचे स्वरुप वाढत गेले. स्वातंत्र्यौत्तर काळात सार्वजनिक गणरायाच्या वाजत-गाजत मिरवणुका निघू लागल्या. आजही ही परंपरा अखंडपणे सुरु आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच महाराष्ट्रात घरोघरी गणरायांचे आगमन होते. संगमनेरातही या उत्सवाची मोठी धूम असते. मोठ्या मंडळांसह बाल मंडळे आणि घराघरात गणेशोत्सवातील दहा दिवस बसलेले बाप्पा अमृतवाहिनी प्रवरेच्या वाहत्या प्रवाहात विसर्जित करण्याची संगमनेरची पारंपरिक पद्धत. त्यामुळे विसर्जनाला नदीपात्रात पाणी नाही असे चित्र अपवादात्मकच. मात्र गेल्याकाही वर्षात संगमनेर तालुक्यातून वाहणार्या सगळ्याच नद्यांमधून बेसुमार वाळू उपसा झालेला असल्याने विसर्जनादरम्यान बुडिताच्या घटना घडण्यास सुरुवात झाली. एकीकडे दहा दिवस उत्साहात आणि जल्लोशात साजरा झालेला उत्सव आणि दुसरीकडे त्या उत्सवाच्या सांगतेला घडणार्या दुर्दैवी घटना यामुळे गालबोट लागू लागले. मात्र अशा घटना टाळण्यासाठी उपायच शोधले गेले नाहीत, त्यामुळे दहा दिवसांचा हा उत्सव संगमनेरकरांसाठी सांगतेला वेदना देणारा ठरु लागला होता.

दरवर्षीच्या विसर्जनाला घडणार्या या घटना टाळल्या जाव्यात यासाठी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांनी स्वतः पुढाकार घेतला. पालिकेचे तेव्हाचे मुख्याधिकारी सचिन बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक अभय परमार यांनीही त्यांच्या नियोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली. संगमनेरच्या बजरंग दलाने विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी घेतली. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांच्या एकवीरा फौंडेशनने घाटांच्या आधीच गणेश मूर्ती स्वीकारुन घाटावरील बजरंग दलापर्यंत त्या सन्मानाने पोहोवण्याची जबाबदारी घेतली. कोणालाही थेट नदीपात्रात जावून विसर्जन करण्यास मनाई करण्यात आल्याने आणि त्यासाठी घाटांकडे जाणारे सगळे रस्ते बंदीस्त करुन तेथे आणि घाटांच्या परिसरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने 2019 साली बुडिताची एकही घटना घडली नाही.

आमचा बाप्पा, आम्हीच विसर्जन करणार! अशा भूमिकाही त्यावेळी समोर आल्या, मात्र प्रशासनाने अजिबात ढील दिला नाही. त्याचा परिणाम पुढच्या वर्षी संगमनेरकर स्वतःहून आपला बाप्पा एकवीराच्या स्वयंसेवकांकडे सोपवू लागले आणि बजरंग दलाकडून त्यांचे विधीवत वाहत्या पाण्यात विसर्जनही घडू लागले. दरवर्षीचे दुखःद प्रसंग बंद होवून 2019 सालाने संगमनेरात आदर्श विसर्जनाचा नवा पायंडा घातला, ज्यातून गेल्या सहा वर्षात विसर्जनादरम्यान एकही अप्रिय घटना घडली नाही. यंदा मात्र प्रशासनच विस्कळीत झाले आहे. कोणाचाही कोणाला ताळमेळ बसत नसल्याचे चित्र गेल्याकाही दिवसांत स्पष्टपणे समोर आले आहे.

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बदली झाली असतानाच पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनाही तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनाही आदेशाची प्रतिक्षा असून कोणत्याही क्षणी त्यांच्या बदलीचा हुकूम होवू शकतो. विसर्जनात स्थानिक स्वराज्य संस्थेची खूप मोठी भूमिका असते. अशात आदर्श विसर्जनाचा पूर्वानुभव असलेल्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांची बदली झाल्यास पेच निर्माण होवू शकतो. त्यामुळे किमान विसर्जनापर्यंत त्यांना येथेच कर्तव्यावर ठेवण्यासह नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी विसर्जनासाठी वापरल्या जाणार्या घाटांसह गेल्यावर्षी कोठे बॅरिकेटींग करुन रस्ते अडवण्यात आले होते, बंदोबस्त देण्यात आला होता याचा आढावा घेण्याची गरज आहे.

यंदा उशिराने जोर पकडणार्या मान्सूनमुळे जिल्ह्यातील सर्व धरणं तुडूंब झालेली आहेत. निळवंडे धरणाचा पाणीसाठाही आता शंभर टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या कालावधीत अकोले तालुक्याच्या घाटमाथ्यावर पाऊस झाल्यास नदीपात्रांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्याशिवाय अन्य पर्याय नाही. अशा स्थितीत नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसे न घडल्यास नियमित आवर्तनाच्या पाण्यातही वाळू तस्करांच्या अवकृपेने जागोजागी मृत्यूचे खड्डे निर्माण झालेले असल्याने अपघाताची शक्यता कायम आहे. त्यामुळे संगमनेरच्या प्रांताधिकार्यांसह प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार व पोलीस निरीक्षकांनी मुख्याधिकार्यांच्या सोबतीने विसर्जनाचा पारंपरिक आराखडा तयार करुन तो ताकदीने अंमलात आणण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.

प्रचंड वाळू उपशामूळे संगमनेरच्या प्रवरानदीचे पात्र असमान आणि अतिशय धोकादायक बनले आहे. असे असतानाही आजही नदीपात्रातून राजरोसपणे वाळूचोरी होत असल्याने नवख्यांसाठी नदीपात्र म्हणजे साक्षात काळाचा जबडाच बनले आहे. अशा स्थितीत विसर्जनासाठी नवखे आणि अबालवृद्ध कुटुंबासह येत असल्याने थेट नदीपात्रात विसर्जनाची सवलत अपघाताचे कारण ठरु शकते. त्यामुळे नदीपात्रात किती पाणी असेल याचा हिशोब करण्याऐवजी जितके असेल तेही धोकादायकच ठरेल याचा विचार करुन गेल्या सहा वर्षांपासून सुरु असलेल्या पद्धतीनेच यंदाही विसर्जनाची परंपरा राबवली जावी असा शहरातून आग्रह आहे. त्यासाठी प्रशासनाने बजरंग दलासह एकवीरा फौंडेशनला विश्वासात घेवून नियोजन करण्याची गरज आहे.

