पती-पत्नीने गळफास घेत संपवला जीवन प्रवास! संगमनेर शहरातील धक्कादायक घटना; दोन वर्षात दोन मुलांसह कुटुंब संपले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वेगवेगळ्या घटना आणि घडामोडींमुळे सतत चर्चेत असलेल्या संगमनेर शहरातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले असून वाडेकर गल्लीत राहणार्‍या पती-पत्नीने गळफास घेत आपला जीवन प्रवास संपवला आहे. हृदयद्रावक म्हणजे दोन वर्षांपूर्वी मयत पती-पत्नीच्या अवघ्या सोळा वर्षीय मुलाने घरातच तर पाच दिवसांपूर्वी 21 वर्षीय मोठ्या मुलाने पुण्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर आज त्या दोघांच्या जन्मदात्यांनीही मरणाला अलिंगन देत जगाचा निरोप घेतला आहे. या वृत्ताने संगमनेरात मोठी खळबळ उडाली असून अवघ्या दोन वर्षात आई-वडिलांसह दोन्ही मुलांनी गळफास घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आज आत्महत्या केलेले दाम्पत्य शासकीय सेवेत कार्यरत होते.

याबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरचा प्रकार शहरातील अतिशय गजबजलेल्या वाडेकर गल्ली परिसरात घडला. संगमनेर नगरपालिकेत लिपिकपदावर सेवेत असलेले मात्र काही महिन्यांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणारे गणेश वाडेकर () व घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारीका म्हणून कार्यरत असलेल्या गौरी वाडेकर यांनी आपल्या राहत्या घरात छताला गळफास बांधून जीवन संपवले. पाच दिवसांपूर्वी पुण्यात शिक्षण घेणारा त्यांचा मोठा मुलगा श्रीराज गणेश वाडेकर यानेही आपल्या खोलीत गळफास घेतला होता, तर दोन वर्षांपूर्वी 26 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांचा छोटा मुलगा श्रेयस (वय 16) यानेही वाडेकर गल्लीतील आपल्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली होती.

आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमागे दोन्ही मुलांच्या आकस्मात मृत्यूने आलेले नैराश्य असण्याची दाट शक्यता आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरीकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ वाडेकर गल्लीत धाव घेतली मात्र तो पर्यंत खूप उशिर झालेला होता. यावेळी वाडेकर गल्ली, रंगारगल्ली, चंद्रशेखर चौक या परिसरातील रहिवाशी मोठ्या संख्येने जमा झाले होते. अवघ्या दोन वर्षात सुखवस्तू कुटुंब असतानाही दोन मुलांसह आई-वडिलांनी गळफास घेवून जीवन संपवल्याने परिसरासह संपूर्ण संगमनेरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 21 Today: 4 Total: 15376

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *