नवव्या राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलची भरारी! सीबीएसई शाळांची स्पर्धा; दहा सुवर्णसह एकोणावीस पदकांची कमाई


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सीबीएसईच्या शाळांमधील स्पर्धकांचा समावेश असलेल्या नवव्या राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने चमकादार कामगिरी करीत भरारी घेतली. या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करताना ध्रुवच्या स्पर्धकांनी दहा सुवर्ण, एक रौप्य आणि आठ कांस्यपदकांसह 19 पदकांची लयलुट केली. शिर्डीच्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून ध्रुव ग्लोबल स्कूलने एरोबिक्समध्ये आपला दबदबा कायम राखला आहे.

देशभरातील 70 सीबीएसई शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील स्पोर्टस एरोबिक्सच्या वैयक्तिक प्रकारात रचित कासट आणि युग भंडारी यांनी अनुक्रमे 11 आणि 14 वर्षांखालील गटात सुवर्ण तर शौर्य मणियारने 19 वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळवले. सांघिक प्रकारात 11 वर्षांखालील फिटनेस प्रकारात आर्या तक्ते, मानसी आहेर, नंदिनी हुलवान, तनुश्री लहामगे, आस्था जोशी, आदिती काळे, अस्मी वर्पे आणि मनस्वी कदम या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले.

तर, 14 वर्षांखालील याच प्रकारात वेदीका वर्पे, ईश्वरी खताळ, अनुष्का शिंदे, देवश्री लाहोटी, धनश्री जोर्वेकर, हर्षदा हासे, प्रांजली आढाव आणि सिद्धी दर्डा या स्पर्धकांनीही उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर सुवर्णपदक मिळवताना ध्रुव ग्लोबल स्कूलला या स्पर्धेत सुवर्ण झळाळी मिळवून दिली. या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कुलदीप कागडे आणि विनीता जोशी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 81 Today: 2 Total: 1108065

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *