तुमचा एक ‘कॉल’ आणि प्रॉब्लेम ‘सॉल्व्ह’! निर्भया पथकाचा संदेश; टवाळखोरांविरोधात संगमनेर पोलीस सज्ज..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बदलापूरमधील प्राथमिक शाळेतील दोघा चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्याच्या विविध भागातूनही तशाच घटना समोर येवू लागल्याने राज्य सरकार या विषयावर अधिक गंभीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ‘निर्भया’ पथकांना पुन्हा संजीवनी दिली असून महिला, मुली व विद्यार्थीनींच्या तक्रारींचे तत्काळ समाधान करण्याचे आदेश बजावले आहेत. त्या शिवाय शाळा व महाविद्यालयांसाठीही सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली असून त्याचीही त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील निर्भया पथक सज्ज करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ यांच्या नेतृत्वाखाली अर्धाडझन महिला पोलिसांची टीम ‘अॅक्टिव्ह’ करण्यात आली आहे.
बदलापूरमधील एका शाळेत दोघा चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून राज्याच्या अन्य भागातूनही अशाच काही घटनाही समोर आल्याने त्याचा निषेध म्हणून राज्यात विविध ठिकाणी आंदोलनेही पुकारण्यात आली आहेत. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा व महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी नव्याने नियमावलीही तयार केली असून सर्व शिक्षण संस्थांना त्यांच्या आवारात सीसीटीव्ही बसवणे बंधकारक करण्यात आले आहे. याशिवाय ओळखपत्राशिवाय कोणालाही शिक्षणसंस्थेच्या प्रांगणात प्रवेश मनाई, कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची माहिती, सुरक्षा रक्षक अशा वेगवेगळ्या गोष्टींनाही अधिक महत्त्व देण्यात आले आहे.
त्यासोबतच गृहमंत्रालयाने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांनाही सतर्कतेचे आदेश बजावले असून प्रत्येक पोलीस ठाण्यातील ‘निर्भया’ पथकाची पुनर्रचना करुन शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील गस्त वाढवण्यासह विनाकारण शिक्षण संस्थांच्या परिसरात घुटमळणार्या टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या शिवाय महिला, मुली व विद्यार्थीनींच्या छेडछाडीच्या तक्रारी समोर येताच तत्काळ कारवाईचे आदेशही देण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांनी आपल्या हद्दितील शाळा व महाविद्यालयांची संपर्क क्रमांकासह माहिती मिळवून त्यांच्याकडून शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करवून घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी सोशल माध्यमांसाठी ‘सिंघम’ या चित्रपटावर आधारित ‘रिल’तयार केली असून त्याद्वारे सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सोनल फडोळ आणि त्यांच्या निर्भया पथकातील महिला पोलीस शहर हद्दितील महिला, मुली व विद्यार्थीनींना न घाबरता पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करीत आहेत. याच रिलमध्ये पोलीस कॉन्स्टेबल सोमेश्वरी शिंदे यांनी आपला मोबाईल क्रमांक खुला केला असून ‘आपला एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह’ असा नेमका संदेशही त्यांनी दिला आहे. त्यांच्यासोबतच हेडकॉन्स्टेबल संगिता ठुंबरे व पोलीस कॉन्स्टेबल शितल बहिरट यांनीही महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही 24 तास तत्पर असल्याचा संदेश देताना न घाबरता पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची बढतीवर नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण अकादमीत बदली झाली आहे. मात्र त्यांच्याजागी अद्यापही नूतन अधिकार्यांची नियुक्ति नसल्याने सध्या त्यांच्याचकडे शहराचा पदभार देण्यात आला आहे. त्यांनीही कोणताही बडेजाव न मिरवता पोलीस अधिक्षकांचा आदेश मान्य करीत बिघडलेली कायदा व सुव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न सुरु केला असून निर्भया पथकाला बळ दिले जात आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे संगमनेर शहरातून कौतुक होत आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाणे 24 तास नागरीकांच्या सेवेत आहे. शहर पोलीस ठाण्यातंर्गत असलेले ‘निर्भया’ पथकही पूर्ण क्षमतेने कार्यरत असून शहरातील महिला, मुली व विद्यार्थीनींना कोणाकडूनही त्रास दिला जात असल्यास त्यांनी निर्भया पथक अथवा शहर पोलीस स्टेशनला केवळ एक फोन कॉल करावा, त्यानंतर काही मिनिटांतच संबंधितांवर कारवाई केली जाईल. माहिती देण्यास अथवा तक्रार करण्यास घाबरु नका, आपली हिम्मत घडणारी संभाव्य घटना टाळणारी ठरु शकते. पीडित महिला व मुलींनी डायल 112, शहर पोलीस ठाण्याच्या 02425 – 225333 किंवा पो.कॉ.सोमेश्वरी शिंदे यांच्या 99229 82803 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सोनल फडोळ
सहाय्यक पोलीस निरीक्षक, संगमनेर