वादग्रस्त पोलीस निरीक्षक संतोष खेडकर नियंत्रण कक्षात! भगवान मथुरे कोपरगावचे निरीक्षक; जिल्ह्यातील सदतीस अधिकार्यांच्या बदल्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरु करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करणार्या अधिकार्यांचे बदली आदेश निघण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनीही सोमवारी रात्री उशिराने जिल्ह्यातील 16 पोलीस निरीक्षकांसह एकूण 37 अधिकार्यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यात नियुक्तिपासूनच वादग्रस्त ठरलेल्या घारगावच्या संतोष खेडकर यांच्यासह संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे व अकोल्याचे निरीक्षक गुलाब पाटील यांचाही समावेश आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार घारगावचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना जिल्हा विशेष शाखेत पाचारण करण्यात आले असून त्यांच्याजागी शेवगावच्या दिगंबर भदाणे यांची तर त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील समाधान नागरे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांना कोपरगाव शहराचा पदभार सोपवण्यात आला असून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेल्या बापूसाहेब महाजन यांना संगमनेरात पाठवण्यात आले आहे. कोपरगाव शहर निरीक्षक प्रदीप देशमुख यांना आता शिर्डी वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
खासदार नीलेश लंके यांच्या आंदोलनातून चर्चेत आलेल्या सायबर विभागाला आता स्वतंत्र पोलीस निरीक्षक लाभले असून शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या मोरेश्वर पेंदाम यांच्या खांद्यावर या पोलीस ठाण्याचा भार देण्यात आला आहे. नियंत्रण कक्षातील मोहन बोरसे यांना अकोले पोलीस ठाणे देण्यात आले असून गुलाब पाटील आता नियंत्रण कक्षात बदलून गेले आहेत. नियंत्रण कक्षातील किरण शिंदे आता श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तर, तेथील ज्ञानेश्वर भोसले नियंत्रणात कक्षात आले आहेत. धडाकेबाज पोलीस निरीक्षक अशी ओळख असलेले नितीनकुमार चव्हाण आर्थिक गुन्हे शाखेत तर, नंदकुमार दुधाळ पोलीस अधिक्षकांचे वाचक असणार आहेत. जिल्हा विशेष शाखेतील बाबासाहेब बोरसे यांची शहर वाहतूक शाखा, भरोसा सेलच्या दौलत जाधव यांची जिल्हा विशेष शाखा तर, शिर्डी वाहतूक शाखेच्या राजेंद्र इंगळे यांची ए.एच.टी.यु.च्या निरीक्षकपदी बदली झाली आहे.
सोळा पोलीस निरीक्षकांसह जिल्ह्यातील अकरा सहाय्यक नारीक्षकांच्याही जिल्ह्यातंर्गत बदल्या करण्यात आल्या असून त्यात जगदीश मुलगीर (पाथर्डी ते भिंगार कॅम्प), योगेश राजगुरु (भिंगार कँम्प ते नियंत्रण कक्षा), आशिष शेळके (सोनई ते कोपरगाव शहर), विजय माळी (कर्जत ते सोनई), कुणाल सपकाळे (नियंत्रण कक्ष ते अर्ज शाखा), रमीझ मुलानी (कर्जत), मंगेश गोंटला (जळगांव ते जामखेड), गणेश वारुळे (नंदूरबार ते शिर्डी), विवेक पवार (टीएमसी ते नगर), संदीप हजारे (शिर्डी ते वाहतूक शिर्डी), कल्पेश दराडे (नियंत्रण कक्ष ते उपअधिक्षक कार्यालय संगमनेर),
पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांमध्ये शुभांगी मोरे (भिंगार ते लोणी), योगेश शिंदे (लोणी ते भिंगार), तुळशीराम पवार (नियंत्रण कक्ष ते बेलवंडी), प्रियंका आठरे (ए.एच.टी.यु. ते भरोसा सेल), निवांत जाधव (नक्षल सेल ते व्हीआयपी, शिंगणापूर), उमेश पतंगे (नियंत्रण कक्ष ते टीएमसी), राजेंद्र इंगळे (नाशिक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगर), दीपक पाठक (नाशिक ते शेवगाव), सतीष डौले (नाशिक ते श्रीरामपूर), योगेश चाहेर (नाशिक ते सायबर सेल) अशा एकूण 16 पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक निरीक्षक व दहा पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 37 पोलीस अधिकार्यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.