काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांकडून कूळ जमीनी लाटण्याचे षडयंत्र! यंत्रणांना हाताशी धरुन सुरु आहे खेळ; पीडिताचा ‘स्वातंत्र्यदिनी’ आत्मदहनाचा इशारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कूळ हक्काने प्राप्त झालेल्या जमीनींच्या हयात नसलेल्या मूळ मालकांचा शोध घेवून त्यांच्या वारसांचे बनावट आदिवासी प्रमाणपत्र तयार करुन तालुक्यातील गोरगरीबांच्या जमीनी हडपण्याचे मोठे कारस्थान तालुक्यात सुरु आहे. यातील संगमनेर खुर्दमधील अशाच एका प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष मिलींद माधवराव कानवडे आणि त्यांच्या टोळीचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात गेल्या आठ दशकांपासून कूळाने जमीन कब्जात असलेल्या अशोक नवले या शेतकर्‍याची जमीन गिळण्यासाठी कानवडे यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन पीडित शेतकर्‍याला दमदाटी करण्यास सुरुवात केली असून संबंधितांवर वेगवेगळ्या पातळ्यांवर तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने अखेर स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. या वृत्ताने संगमनेर तालुक्यात सुरु असलेला ‘मूळशी पॅटर्न’ उघड होवू लागला असून अशाप्रकारे परस्पर मूळमालकांचा शोध घेवून कूळाच्या जमीनी हडपण्याचे पद्घतशीर षडयंत्र राबवले जात असल्याचे आता उघड होवू लागले आहे.

याबाबत संगमनेर खुर्द येथील जमीनीचा कब्जा असलेल्या अशोक तुकाराम नवले यांच्या तक्रार अर्जातून तालुक्यात सुरु असलेला हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या तक्रारीनुसार अशोक नवले यांच्याकडे संगमनेर खुर्दमधील मूळ सर्वे नंबर 13 (अ) मधील गट नं.89/3 ही शेतजमीन सन 1945 साली नवले यांच्या कुटुंबाचे मूळ पुरुष लक्ष्मण नवले यांच्याकडे फेर नं.751 नुसार आली. त्यांच्या मृत्यूनंतर फेर नं.754 नुसार आप्पा नवले व त्यानंतर रेकॉर्ड ऑफ राईटचा फेर नं.1840 अन्वये आप्पा नवले यांच्या वारसांच्या नोंदी झालेल्या आहेत. सदरील जमीन ताब्यात आल्यापासून गेल्या 79 वर्षात कोणत्याही सक्षम न्यायालयाने नवले यांचा जमीनीवरील हक्क रद्द केलेला नाही.


या जमीनीचे मूळ मालक बाबुराव सदाशिव जाधव हे मराठा (कुणबी) समाजाचे असून त्यांनी मूळ सर्वे नं.13 ही मिळकत 1936 साली खरेदी घेतलेली आहे. परंतु त्यांचा या मिळकतीवर कधीही कब्जा अथवा हक्क नव्हता. त्यानंतरच्या काळात जाधव आपल्या कुटुंबासमवेत जव्हार (जि.पालघर) येथे निघून गेले. जव्हार येथे गेल्यानंतर बाबुराव जाधव हे मराठा (कुणबी) असतानाही त्यांनी व त्यांच्या वारसांनी आदिवासी असल्याची खोटी प्रमाणपत्र व कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे भासवले. 2021 सालापासून जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रीय काँग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष मिलींद माधवराव कानवडे यांनी तालुक्यातील अशा अनेक वादातील जमीनी हेरुन गोरगरीबांच्या मिळकती गिळण्याचे पद्धतशीर षडयंत्र राबवण्यास सुरुवात केली.


यासाठी कानवडे यांनी सातजणांची टोळी तयार करुन वादातील मिळकतीचे व्यवहार आपल्याच टोळीतील इसमांच्या नावे करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे या टोळीने तालुक्यातील अनेक गोरगरीबांच्या मिळकती हडप केल्याचा व त्यासाठी मोठ्या राजकीय हस्तकांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही अशोक नवले यांनी आपल्या तक्रार वजा निवेदनातून केला आहे. 2021 साली कानवडे यांनी आपल्या टोळीच्या मदतीने काही अधिकार्‍यांशी आर्थिक देवाण-घेवाण करुन अशोक नवले यांच्या कब्जात असलेल्या मिळकतीच्या 7/12 उतार्‍यावरुन नोंदी कमी करण्यासाठी संगमनेरच्या तहसीलदारांकडे प्रकरण दाखल केले. तहसीलदारांनीही मयताचे वारस रेकॉर्ड न घेताच नवले यांच्या विरोधात निकाल सुनावला.


अशोक नवले यांनी प्रकरणातील बहुतांशी कूळ मयत असल्याने त्या विरोधात मयतांविरुद्ध प्रकरण दाखल केले. याबाबत तहसीलदारांची नोटीस प्राप्त झाल्यानंतर नवले यांनी आपल्या कुटुंबाच्या नमूद मिळकतीवरील नोंदी कूळ हक्काने आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, कूळ हक्क ठरवल्याशिवाय तहसीलदारांना पुढील कारवाई करता येणार नाही असेही लेखी सादर केले होते. त्यावेळी मिलींद कानवडे यांनी ‘आम्ही *** यांची माणसं आहोत, तु कितीही तक्रारी कर, तुला व तुझ्या कुटुंबाला या जमीनीतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आमच्या माणसांकडून तुझा खून करुन मिळकत ताब्यात घेवू’ असा दमही भरल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या षडयंत्राचा भाग म्हणून कानवडे यांनी आपल्या टोळीतील व्यक्तिंच्या नावे या मिळकतीचे साठेखत नोंदवले. मूळात त्यावेळी बाबुराव जाधव यांचे वारस कागदोपत्री आदिवासी असल्याचे दिसत होते. तरीही आदिवासींच्या जमीनीच्या संदर्भात तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी साठेखत नोंदवले. त्याचा सगळा खर्च कानवडे व त्यांच्या हस्तकाने केला आणि 7/12 वरील नावे आदिवासी आहेत म्हणून दर्शवली. तत्कालीन अधिकार्‍यांनी त्यावरुन मिळकत स.नं.89/3 कूळ हक्काची नोंद असतानाही असा ताबा व नोंदी बोगस असल्याचा निर्वाळा दिला. त्याविरुद्ध पीडित शेतकर्‍याने उपविभागीय अधिकार्‍यांकडे अपिल केले. मात्र त्यांनीही तहसीलदारांचीच रीऽ ओढली. त्यावर तक्रारदराने एम.आर.टी. औरंगाबाद न्यायालयात अपिल दाखल केले. त्यावर तहसीलदार व नंतर उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती मिळाली.


मात्र सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व त्यावर स्थगिती हुकूम कायम असतानाही मिलींद कानवडे आपल्या हस्तकांसह येवून दमबाजी करीत आहेत. या गोष्टींना वैतागून नवले यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी संगमनेरच्या तहसीलदारांना कायदेशीर कारवाईचे आदेशही दिले होते. मात्र त्यांच्या आदेशाला संगमनेरात मात्र केराची टोपली दाखवण्यात आल्याचे नमूद करीत अशोक नवले यांनी मिलींद कानवडे व त्यांच्या टोळीकडून संगमनेर तालुक्यातील अशा प्रकारच्या मिळकती हडप करण्याचे उद्योग सुरु असल्याचा अतिशय गंभीर आरोप केला आहे. या टोळीकडून खोट्या खरेदीखताच्या आधारे जमीनीचा ताबा घेण्यासाठी विशिष्ट लोकांची टोळी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून धाक दाखवण्यासह खोट्या गुन्ह्यांची धमकीही भरली जात आहे.


या टोळीकडून आपणास व आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असून दररोज घरी माणसं पाठवली जातात व घर खाली करण्याची धमकी दिली जाते, शेतात नांगर फिरवण्याचा दम भरला जातो. सदरील मिळकतीमध्ये आम्ही पिढ्यान् पिढ्या राहत असून या मिळकतीत आमची घरं, जनावरांचे गोठे, विहीर, पाण्याच्या टाक्या आहेत. त्यासह मिलींद कानवडे व त्यांच्या टोळीकडून मिळकतीचा ताबा घेण्याचा दबाव सुरु असून आम्हाला भूमिहीन करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. या सततच्या त्रासामुळे आपणास व आपल्या कुटुंबियांना जगणे अवघड झाले असून मनात वारंवार आत्महत्येचा विचार घोंघावत असल्याचे अशोक नवले यांनी आपल्या निर्वाणीच्या निवेदनात नमूद केले आहे.


आपण या मिळकतीचे मूळ मालक बाबुराव जाधव व त्यांच्या वारसांविरोधात आदिवासींचे खोटे दाखले व कागदपत्रे प्राप्त केल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केलेली आहे. मात्र इतके सगळे करुनही आणि कायदेशीर मार्गाने न्याय मागूनही तो मिळत नसल्याने आपले जीवन नीरस्त झाले असून आपणास व आपल्या कुटुंबियांना अशाप्रकारे मानसिक त्रास देवून कूळ हक्काने आलेली जमीन गिळण्याचे षडयंत्र राबवणार्‍या मिलींद माधवराव कानवडे व त्यांच्या टोळीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास आपण येत्या स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करणार असल्याचा इशारा अशोक तुकाराम नवले यांनी पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे. त्यात मिलंीद कानवडे यांच्यासह त्यांच्या सात हस्तकांची नावेही नमूद केली आहेत. या प्रकाराने यापूर्वी वेगवेगळ्या बेकायदा उद्योगातून चर्चेत आलेल्या मिलींद कानवडे यांच्याकडून तालुक्यात सुरु असलेला ‘मूळशी पॅटर्न’ चर्चेत आला असून तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अशोक तुकाराम नवले यांनी स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिल्यानंतर संगमनेरच्या तहसीलदारांनी त्यांना पत्र पाठवून त्यांच्या तक्रारीबाबत संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांसह संगमनेर खुर्दच्या मंडलाधिकार्‍यांना योग्य त्या कारवाईच्या सूचना दिल्याचे सांगितले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून योग्य ती कारवाई होवून त्याचा अहवाल आपल्या कार्यालयाकडे येणार असल्याने आपण आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेवू नये असे आवाहन केले आहे. तर, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शहर पोलीस निरीक्षकांना वस्तुनिष्ठ चौकशी करुन कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Visits: 17 Today: 4 Total: 28817

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *