संगमनेर विधानसभा लढवण्याचा माजी खासदारांचा मनसुबा! पत्रकार परिषदेतून झाली इच्छा प्रकट; पक्षाने आदेश दिल्यास अर्ज भरणार..

नायक वृत्तसेवा, लोणी
शिर्डी लोकसभा मतदार संघातील बर्‍याच तालुक्यांची रचना वेगळी असल्याने तेथे इच्छुकांची संख्या एकापेक्षा अधिक आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचेही एकमत होत नाही. सध्या आपण मोकळेच असून शिर्डी वगळता आसपासच्या मतदार संघात चाचपणी सुरु आहे. कोपरगावमध्ये राजकीय गुंतागुंत, श्रीरामपूर राखीव तर राहुरीमध्ये कर्डिले-कदम वाद असल्याने आपल्यासमोर संगमनेर विधानसभा मतदार संघाचा पर्याय असून पक्षाने आदेश दिल्यास आपण विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लोणीत पत्रकारांशी बोलताना दिले. त्यांच्या या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून नगर दक्षिणेची निवडणूक लढवणार्‍या डॉ.सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांनी पराभव केला होता. त्यामुळे डॉ.विखे पाच वर्ष प्रतिक्षा करतील की विधानसभा निवडणुकीतून राजकीय पुनरागमन करतील असे कयास लावले जात असतानाच आज (ता.1) त्यांनी लोणीत पत्रकार परिषदेचे आयोजन करीत संगमनेर-राहुरीत राजकीय ‘बॉम्ब’ फोडला. यावेळी त्यांनी कोणत्याही मुद्द्यावर सुस्पष्ट माहिती न देता सरतेशेवटी राहुरी आणि संगमनेर या दोन विधानसभा मतदार संघाभोवतीच चर्चा फिरती ठेवली.


यावेळी बोलताना त्यांनी लोकशाही व्यवस्थेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपले मत मांडण्याचा आणि उमेदवारी मागण्याचा अधिकार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यातून ते यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले. त्यावर आपण शिर्डीतून इच्छुक आहात का? असा प्रश्‍न विचारला गेला असता हा मतदार संघ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा असल्याने तेच शिर्डीतून निवडणूक लढवतील असे सांगत त्यांनी शिर्डीतून त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याचवेळी त्यांनी सध्या आपल्याकडे भरपूर वेळ असल्याने आजुबाजूच्या मतदार संघात चाचपणी करुन निवडणूक लढवण्याचा विचार असल्याची टीपन्नी केली.


राहात्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा यांच्या शिर्डीत भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी पक्षात कार्यकर्त्यांना मत मांडण्याचा आणि उमेदवारी मागण्याचा अधिकार असल्याचे सांगत दक्षिणेतून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी आपल्यासह आमदार प्रा.राम शिंदे देखील उत्सुक होते असा दाखला दिला. या तत्त्वानुसार पिपाडांनी आपली इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात काहीच गैर नसल्याचे मात्र, याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याचे स्पष्ट केले.


श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ राखीव आहे. कोपरगावमध्ये आधीच खूप राजकीय गुंतागुंत आहे, अशा स्थितीत राहुरी आणि संगमनेर हे दोनच पर्याय आपल्यासमोर असल्याचे सांगताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी राहुरीत माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि सत्यजीत कदम यांच्यातील वादाचा दाखला देताना त्यांच्यात एकमत होत नसल्यास आपण राहुरीतूनही निवडणूक लढवू शकतो असे संकेत दिले. मात्र अन्य मतदार संघातून निवडणुकीचा विचार करताना तेथील स्थानिक कार्यकर्त्यांवर स्वतःला लादणार नसल्याचे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील बर्‍याच तालुक्यांची राजकीय रचना वेगळी आहे. त्यामुळे त्या तालुक्यांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही. अशा मतदार संघात आपल्या नावावर समन्वय होत असेल तर हरकत काय असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला. आपण सुक्षिक्षित आहोत, त्यामुळे अर्ज भरणं हे आपले काम आहे. अर्ज भरल्यानंतर तो स्वीकारावा की नाकारावा हा स्थानिक मतदारांचा प्रश्‍न आहे. त्यामुळे आपण संगमनेर आणि राहुरी या दोन्ही मतदार संघात उमेदवारी दाखल करणार असून दोन्ही ठिकाणांमध्ये पक्ष जेथे आदेश देईल तेथून आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेतही डॉ.विखे पाटील यांनी दिले.


राहुरीतील कर्डिले-कदम यांच्यातील वाद मिटणार नसतील तर आपण पर्याय आहोत. संगमनेरमध्ये चार/पाच इच्छुकांमध्ये एकमत होत नसेल आणि पक्षाने आपल्या नावामुळे एकमत होईल असे सांगत निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यास आपण संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. आपण पक्षादेश मानणारा कार्यकर्ता असून पक्ष सांगेल ते काम करु. आजची पत्रकार परिषद आणि त्यातून मांडलेले विषय बर्‍याच चर्चेनंतर मांडले असल्याचे सांगत त्यांनी
शेवटी या विषयावर ‘गूढ’ही निर्माण केले.


लोकसभा निवडणुकीतील पराभवापासूनच डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर आजच्या पत्रकार परिषदेतून एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. त्यातही त्यांनी श्रीरामपूर मतदार संघ राखीव तर, कोपरगाव मतदार संघ राजकीय गुंतागुंतीचा असल्याचे सांगत माध्यमांचे लक्ष्य ‘संगमनेर’ व ‘राहुरी’ मतदार संघांवर खिळवले. त्यावर भाष्य करताना राहुरीत शिवाजी कर्डिले व सत्यजीत कदम यांच्या वादाचा विषय पुढे करुन सरतेशेवटी ‘संगमनेर’ मतदार संघावरच चर्चा थांबवल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेरात भाजपकडून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यास आश्‍चर्य निर्माण होणार नाही.

Visits: 30 Today: 1 Total: 79326

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *