संगमनेरातील ‘लव्ह जिहाद’चा सूत्रधार ‘राष्ट्रवादी’तून निलंबित! ग्रंथालय विभागाचा पदभार; तीन महिन्यापूर्वीच कारवाई झाल्याचा दावा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
घारगावमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा मुख्य सूत्रधार, अंमली पदार्थांसह गुटख्याचा कुख्यात तस्कर युसुफ दादा चौगुले याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ग्रंथालय विभाग उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यासोबतच त्याच्याबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या व संबंधिताच्या व्यक्तिगत वागणूकीमुळे पक्षाची प्रतिमाही मलिन झाल्याचा दावा करीत या विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत त्याला राष्ट्रवादी पक्षातून निलंबित केल्याचे पत्र जारी केले आहे. मंगळवारी अचानक त्यांचे हे पत्र समाज माध्यमांमध्ये ‘व्हायरल’ झाले, मात्र त्यावर एप्रिल महिन्यातील तारीख असल्याने साशंकताही निर्माण झाली होती. याबाबत दैनिक नायकने प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्याची हकालपट्टी केल्याचे सांगितले. मात्र या कारवाईचे पत्र तब्बल तीन महिन्यांनी समोर आल्याने त्याच्या ‘टायमिंग’ बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या 7 जुलैरोजी पठारभागातील एका 19 वर्षीय तरुणीला मंचर (जि.पुणे) येथे बोलावून युसुफ दादा चौगुले याने त्याच्याच वाहनातून शादाब तांबोळी याच्या मदतीने तिचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिला गुंगीचे औषध पाजून अन्य दोघांच्या मदतीने चाकण येथून वाहन बदलीत शादाबसह मुंबईला पाठवले. तेथील दोघांच्या मदतीने तीन दिवस तिला सानपाडा येथील एका लॉजमध्ये थांबवून शादाब तांबोळी याला तिच्यावर अत्याचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिवाय 9 जुलैरोजी मुंबईतील साथीदारांच्या मदतीने पीडित तरुणीला बांद्रा येथे नेवून परस्पर तिचे धर्मांतरण घडवून आणले आणि तिचा निकाह झाल्याचे सांगत शादाबला पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यास प्रेरित केले.
मात्र या घटनेनंतर संगमनेर तालुक्यातील हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या व त्यांनी 12 जुलैरोजी पठारभाग बंदची हाक देत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले. त्यामुळे गडबडलेल्या घारगाव पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीपासून नाव समोर आलेल्या आणि स्वतःला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ग्रंथालय विभागाचा उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणवणार्या युसुफ दादा चौगुले याला पोलीस ठाण्यात पाचारण करुन पळवून नेलेली तरुणी हजर करण्यास भाग पाडले. मात्र या दरम्यानही मुंबईतून संगमनेरात येतायेता त्याने पाठवलेल्या वाहनातील अनोळखी दोघांनी पीडित तरुणीला दमदाटी करीत पोलिसांसमोर काय बोलायचे, कुटुंबियांसोबत कसे वागायचे याचे धडे दिले. त्यामुळे 10 जुलैरोजी सदरील तरुणी घारगाव पोलीस ठाण्यात हजर होवूनही भेदरलेली होती. त्यामुळे तिला उपचारार्थ पाठवून 26 जुलैरोजी तिचा जवाब नोंदवण्यात आला. त्यातून युसुफ चौगुले याचे काळे कारनामे उघड झाले.
या संपूर्ण प्रकरणाची चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून समाजमनावर प्रतिबिंबित झाली. या प्रकरणात सूत्रधार म्हणून युसुफ दादा चौगुले याचे नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाबाबत तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येवून सोशल माध्यमातून आगपाखडही व्यक्त होवू लागली. गेली दोन दिवस हा सगळा प्रकार सुरु असताना मंगळवारी (ता.30) सायंकाळी अचानक युसुफ चौगुले याची ग्रंथालय विभागाच्या प्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्यासह शिस्तभंग केल्याचे कारण समोर करुन त्याला राष्ट्रवादी पक्षातूनही निलंबित केल्याचे पत्र व्हायरल करण्यात आले.
या पत्रावर 27 एप्रिल 2024 अशी तारीख असून युसुफ दादा चौगुले यांच्या नावासह त्याच्या विरोधात असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, संघटनेची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. याबाबत वेळोवेळी समजही देण्यात आली मात्र दुर्लक्ष केल्याचा उल्लेख आहे. याबाबत पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे व आपल्या वागण्याने पक्षाची प्रतिमाही मलिन झाल्याचे कारण देत पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे व यापुढे पक्षाचे कोणतेही पद आपल्या नावासमोर लावू नये असा आशय त्या पत्रातून समोर आला. मात्र सदरील प्रकरणात 26 जुलै रोजी तक्रार दाखल झालेली असताना निलंबनाच्या पत्रातील 27 एप्रिल या तारखेचा उल्लेख ‘त्या‘ पत्राच्या सत्यतेवरच प्रश्न उभा करणारा ठरला.
त्यातच मागील तारखेचे पत्र दाखवून पक्षाने एकप्रकारे या प्रकरणातून आपला हात बाजूला करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा सुरु झाली. याबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी दैनिक नायकने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ग्रंथालया विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यासह राष्ट्रवादी पक्षातूनही त्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. त्यातून चौगुले याचे पक्षातून निलंबन झाल्याचे स्पष्ट झाले असले तरीही व्हायरल पत्राच्या टायमिंगबाबतचा संशय मात्र आजही टिकून आहे.
युसुफ दादा चौगुले याच्याबाबत आमच्या कार्यालयाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संघटनात्मक पातळीवरही त्याच्याकडून अपेक्षित काम होत नसल्याने गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाने त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यासह शिस्तभंगाची कारवाई करताना त्याला पक्षातूनही निलंबित केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा कोणताही संबंध नाही.
उमेश पाटील
प्रदेशाध्यक्ष (ग्रंथालय विभाग)