बालकाचा छंद पालकांनी पुरवला पाहिजे : आमदार थोरात आश्‍वीतून डागली तोफ; दहशत आणि जिरवाजिरवी फारकाळ चालत नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आश्‍वीसह वीस गावांचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण 25 वर्ष कामं केले आहे. मात्र या कालावधीत विरोधात आहे म्हणून कोणाला जेलमध्ये घालण्याचा, कोणावर खोट्या केसेस दाखल करण्याचा किंवा कोणाच्या प्रपंचात हात घालून तो विस्कटण्याचा प्रयत्न केल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही. राजकारण करण्याचीही पद्धत असते. प्रेमाने सुद्धा विकासाचे आणि चांगल्या सहकाराचे राजकारण होवू शकते हे आम्ही सिद्ध केले आहे असे सांगत माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज नाव न घेता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांच्याच मतदार संघातून थेट तोफ डागली. यावेळी त्यांनी डॉ.सुजय विखे यांच्या संगमनेर विधानसभा लढवण्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना लाडक्या लेकराचा छंद पुरवण्याची जबाबदारी पालकांची असल्याने ‘त्यांनी’ आपल्या लाडक्या बाळाचा छंद पूर्ण केला पाहिजे अशी कोपरखळीही हाणली.


शिर्डी विधानसभा मतदार संघात मोडणार्‍या आश्‍वीतील एका सहकारी संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना थोरात म्हणाले की, आपण 1985 ते 2009 अशी सलग 25 वर्ष आज शिर्डी विधानसभेत असलेल्या 20 गावांचेही प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी सुद्धा प्रचंड दहशत आणि दबाव असतानाही या भागाने आपल्याला भरभरुन मतदान केले. त्याकाळी सुद्धा राजकीय विरोधक होतेच, पण तरीही आपण त्यांची चांगली कामं मार्गी लावण्याचे काम केले. उंबरी बाळापूर आणि शिंदोडीच्या हायस्कूलसह गेल्या अडीच वर्षात मिळालेल्या संधीत या भागातील अनेक योजनांची कामे आपण मार्गी लावली. या कालावधीत विरोधात आहे म्हणून कोणाची जिरवण्याचा प्रयत्न केल्याचे एकही उदाहरण आश्‍वी परिसरात सापडणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.


विरोधात असतानाही या भागातील मतदार आपल्या मागे का उभा राहीला याचं गुपितं सांगताना त्यांनी या कालावधीत कोणाची जिरवण्याचा, कोणाला जेलमध्ये घालण्याचा, खोट्या केसेस दाखल करण्याचा, कुठे नडवण्याचा, कोणाच्या प्रपंचात हात घालून तो विस्कटण्याचा प्रयत्न केल्याचे एकही उदाहरण घडले नाही. म्हणून विरोधातील गावे असतानाही या गावांनी आपल्याला भरभरुन मतदान केल्याचे थोरात म्हणाले. राजकारण करण्याचीही पद्धत असते. प्रेमाने सुद्धा विकासाचे आणि चांगल्या सहकाराचे राजकारण करता येते हे आम्ही सिद्ध केले आहे. तुम्ही जर दहशतीचे आणि जिरवाजिरवीचे राजकारण करणार असाल तर ते फारकाळ चालत नाही असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.


एखादा सरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्य विरोधात आहे म्हणून त्याचे पदं घालवण्याचा प्रयत्न आपण कधीही केला नाही. उलट त्यांच्या मदतीसाठी आपण सतत पुढे असायचो. आता सरपंच वेगळा आहे म्हणून पाणी पुरवठा योजनाच बंद पाडली जाते असा टोला लगावतांना त्यांनी आश्‍वी, निमगाव जाळी आणि शेडगावच्या पाणी पुरवठा योजनांनाही त्रास झाल्याचे सांगत माणसाला प्यायला पाणी देण्याच्या योजनेतही जेव्हा माणसं विष कालवतात तेव्हा अशा लोकांना माणसं विसरत नाहीत असा सूचक इशाराही नाव न घेता महसूलमंत्र्यांना दिला. आम्ही जेथे जातो, तेथे सकारात्मक राजकारण करतो. दहा वर्ष त्यांच्याकडे गणेश कारखाना होता, पण त्यांनी चांगला चालवला नाही, राहुरीचेही तसेच झाले. कारण त्यांना फक्त एकच कारखाना चालवायचा होता अशी टीकाही थोरात यांनी केली.


गणेश कारखाना तुम्हीच चालवा, आम्ही फक्त मार्गदर्शन करतो अशा एका आवाहनावर गणेशच्या सभासदांनी आम्हाला हजारोंनी मतदान केल्याची पृष्टीही यावेळी त्यांनी जोडली. आजही गणेशच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सहा केसेस दाखल असल्याचे सांगत थोरात यांनी कारखाना चालू राहीला तर शेतकरी, कामगार, व्यापारी आणि अगदी पानटपरीवाल्यालाही त्याचा फायदा झाल्याचे सांगितले. त्यावेळी आम्हाला कारखाना चालवण्यासाठी पैसा मिळू दिला नाही. इकडून तिकडून पैसा जमा करुन तो चालवला व दोन लाख पोत्यांचे गाळपही केले. कारखान्याचे कर्ज प्रकरण अडवून ठेवण्यात आल्याच्या मुद्द्यावर उपस्थितांचे लक्ष वेधताना तुमच्याच मतदार संघातील शेतकरी, मजूर, व्यापार्‍यांचे हित ज्यात आहे त्याला सुद्धा अडवण्याची अजब पद्धत सध्या आपण बघत असल्याची टीकाही त्यांनी केली.


राजकारण करण्याची आपली पद्धत वेगळी असल्याचे सांगताना थोरात यांनी लोकांचे चांगले करायचे, त्यांचे भले होईल असे काम करायचे, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा आणि त्यानंतर त्यांच्याकडून मतं मागायची असा आपला स्वभाव असल्याचे सांगत बोलायला अजून खूप गोष्टी आहेत मात्र, आजच सगळा ‘दारुगोळा’ उडवण्यात मजा नाही असा सूचक इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मालुंजे येथील एका दोन एकर क्षेत्र असलेल्या शेतकर्‍याच्या कोरवाहू जमिनीच्या सपाटीकरणातून त्याच्यावर गौणखनिज उत्खणनाचा आरोप करीत झालेल्या कारवाईचे उदाहरणही दिले.


राजकारणात किती वाईट वागायचं, याचीही एक पद्धत असते. राजकारण करताना लोकांच्या जीवाशी खेळायचे, त्याचे वाईट करण्याचा प्रयत्न करायचा. पण, लोक एक दिवस त्याकडे बघतातच असा इशारा देत त्यांनी अहंकार असलेल्यांना लोकसभा निवडणुकीत जनतेने जागेवर आणल्याचे सांगताना संगमनेरात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत तशाच राहाता आणि शिर्डीतही घडवण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगताना भविष्यातील राजकारणाचे गणितंही उलगडले.


कार्यक्रमातील भाषणानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी गुरुवारी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची खिल्ली उडवत थोरात म्हणाले की;‘लाडकं लेकरु आहे ते, त्याचा छंदच असेल तर पालकांनी तो पुरवला पाहिजे. त्यांनी राहुरी आणि संगमनेर दोन्ही ठिकाणी त्यांना उभं करुन बालकाचा छंद पूर्ण केला पाहिजे.’ असे मिश्किल वक्तव्य केले.

Visits: 20 Today: 1 Total: 79602

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *