दुचाकीवर ‘स्टंटबाजी’ करणार्‍यांना धडा! जागृक नागरिकांचे चित्रण; उपअधिक्षकांची कारवाई..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वेगवेगळ्या फॅन्सी नंबरप्लेट, विचित्र आवाजाचे सायलेंसर आणि रहदारीच्या रस्त्यांवर सुसाट वेगाने केली जाणारी स्टंटबाजी ‘त्या’ दुचाकीस्वारांसह अन्य प्रवाशांसाठीही धोकादायक ठरु शकते. मात्र नियमांची एैशीतैशी करुन काहीजण शहराच्या वेगवेगळ्या भागात असे उद्योग करीतच असून त्यातून त्यांच्यासह सामान्य पादचार्‍यांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. मात्र आता शहरातील काही जागृक नागरिकांनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली असून सोमवारी नाशिक महामार्गावर अशीच स्टंटबाजी करणार्‍या दोघा दुचाकीस्वारांचे छायाचित्रण करुन ते पोलीस उपअधिक्षकांना पाठवल्यानंतर ‘त्या’ दोघाही ‘स्टंटबाजांना’ हुडकावून काढीत पोलिसांनी त्यांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करुन दंडही वसुल करण्यात आला आहे. अशाप्रकारे शहरात कोणी स्टंटबाजी करताना आढळल्यास त्याचे छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तो पाठवण्याचे आवाहनही पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.


याबाबत उपअधिक्षकांच्या कार्यालयाकडून समजलेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.29) दुपारी शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी शिक्षण संकुलापर्यंतच्या नाशिक-पुणे महामार्गावर दोन अलिशान मोटर सायकलवरील चौघेजण प्रचंड रहदारी असतानाही भरधाव वेगाने वाहन चालवून स्टंटबाजी करीत होते. या दोन्ही वाहनांना विचित्र आवाजाचे सायलेंसरही असल्याने वाहनाच्या वेगामुळे त्यातून येणार्‍या कर्णकर्कश आवाजातून अनेकांच्या कानठळ्याही बसत होत्या. मात्र आईबापाच्या कमाईवर मिळालेल्या वस्तूचा वापर कसा करायचा याची अक्कलच नसल्याने आपल्या या कृत्याचा इतरांवर होणारा परिणाम डावलून या दोघा दुचाकीस्वारांकडून महामार्गावरच आडव्या-तिडव्या पद्धतीने दुचाकी चालवून स्वतःसह अन्य प्रवाशांचा जीव धोक्यात आणण्याचा उद्योग सुरु होता.


यावेळी मात्र त्यांच्या पाठीमागे असलेल्या एका चारचाकी वाहनातील दक्ष नागरिकाने त्या स्टंटबाजांना धडा शिकवण्याचा चंग बांधून रस्त्यावर सुरु असलेल्या त्यांच्या हुल्लडबाजीचे आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या नागरिकाने दोन्ही स्टंटबाजांचे चेहरे आणि त्यांच्या दुचाकींचे क्रमांक व्यवस्थितीत दिसू शकतील अशाप्रकारे चित्रण करुन ते तत्काळ संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना पाठवले. त्यांनी मिळालेल्या चित्रणातील दोन्ही दुचाकीस्वारांच्या मालकांचा शोध घेवून रात्री ‘त्या’ दोघाही स्टंटबाजांसह त्यांच्या दुचाकीही ताब्यात घेतल्या.


या प्रकरणी अमन शेख (एम.एच.14/इ.एल.4440) व अरमान शहा (एम.एच.17/डी.ए.2362) या दोघांवरही सामाजिक शांततेला बाधा निर्माण करण्यासह मोटार वाहन कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंडही वसुल करण्यात आला आहे. याशिवाय जप्त करण्यात आलेल्या दोन्ही दुचाकींचे कर्णकर्कश हॉर्न तोडून टाकण्यात आले असून मॉडिफाईड केलेल्या त्यातील एका दुचाकीचे सायलेंसर तिच्या मालकालाच दगडाने फोडण्यासही भाग पाडण्यात आले आहे. या कारवाईने शहरात विना परवाना वाहन चालवणारे, फॅन्सी नंबरप्लेट असलेले, कर्णकर्कश आवाज व बदललेले सायलेंसर लावलेल्या दुचाकी गर्दीत पिटाळून स्टंट करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत पुढेही सातत्य ठेवणार असल्याची माहिती या निमित्ताने पोलिसांकडून देण्यात आली आहे. या कारवाईत वाहतुक शाखेचे हवालदार जगधने, पिचड, झोळे यांच्यासह अंमलदार राहुल डोके व राहुल सारबंदे यांचा समावेश होता.


रहदारीच्या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणे, मनाई असलेले कर्णकर्कश हॉर्न अथवा सायलेंसरचा वापर करुन सामान्य नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करणे बेकायदेशीर असून असा प्रकार करणार्‍यांची गय केली जाणार नाही. संगमनेर उपविभागात अशाप्रकारचे कृत्य करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून नागरिकांनीही असा प्रकार कोठेही निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाचे व त्याच्या चालकाचे छायाचित्र अथवा छायाचित्रण करुन ते पोलिसांना पाठवावे, अशा अपप्रवृत्तीं विरोधात तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल.
सोमनाथ वाघचौरे
पोलीस उपअधिक्षक, संगमनेर उपविभाग

Visits: 4 Today: 2 Total: 22957

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *