पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी निगडीत मौलानावर संगमनेरात कारवाई! पोलीस अधीक्षकांचा आदेश; संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांची कारवाई..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधीत असलेल्या ठिकाणांवर गुरुवारी राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरातील 11 राज्यात छापेमारी करीत 106 जणांना अटक केली होती. त्यात महाराष्ट्रातील बारा शहरांमधील 20 जणांचा समावेश होता. या साखळीत आता अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश झाला असून राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या सूचनेवरुन संगमनेर शहर पोलिसांनी आज पहाटे संगमनेर खुर्दमधील एका मौलानाच्या घरावर छापा घालीत त्याला ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने झालेल्या या कारवाईत तूर्ततः ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्याला स्थानबद्ध करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याशिवाय अहमदनगरच्या कॅम्प परिसरातूनही एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पीएफआयचे कनेक्शन आता थेट संगमनेरातही पोहोचल्याने शहर परिसरात गेल्या काही वर्षात वाढलेल्या अनोळखी लोकसंख्येचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.27) पहाटे दोन वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आली. या कारवाईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा संगमनेर शहराध्यक्ष मौलाना मोहम्मद खलील दिलावर शेख (वय 38, रा.संगमनेर खुर्द) याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. जवळपास दोन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या झडतीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी त्याची सखोल चौकशीही केली. तूर्ततः त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्याला स्थानबद्ध करण्यासाठीच्या हालचालीही सुरु आहेत. त्यासाठी आज दुपारी त्याला न्यायासनासमोर हजर केले जाणार आहे.


यासोबतच अहमदनगरमध्येही स्थानिक कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी कारवाई करीत नगर शहरातून जुबेर नामक इसमाला ताब्यात घेतले आहे. त्यालाही आज न्यासनासमोर हजर केले जाणार असून जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या संगमनेरच्या मौलानासह अहमदनगरच्या जुबेरवर 151 (3) नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना स्थानबद्ध करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. आज पहाटे झालेली ही कारवाई जिल्ह्यासह औरंगाबाद, ठाणे, सोलापूर, नांदेड, परभणी व नाशिकमधील मालेगावमध्येही करण्यात आली असून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दुसर्‍या टप्प्यातील कारवाईत राज्यातील आठ जिल्ह्यात 25 ठिकाणांवर छापे घातले आहेत.


गेल्या काही वर्षात संगमनेर शहर व त्याच्या लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनोळखी लोकांचा रहिवास वाढला आहे. अगदी बोली भाषेपासून ते पेहरावापर्यंत येथील संस्कृतीच्या भिन्न वावर असलेल्या अशा व्यक्ति संशयास्पद असूनही आजवर कोणत्याही यंत्रणांच्या माध्यमांतून त्यांचा नेमका ठावठिकाणा शोधण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. त्याचा परिणाम शहराच्या आसपास अतिक्रमणं करुन अशाप्रकारच्या लोकांच्या मोठ्या वसाहती निर्माण झाल्या असून त्यातूनच संगमनेरच्या गुन्हेगारीचा आलेखही सतत उंचावत गेला आहे. त्यातून शहराच्या सुरक्षिततेलाही धक्का लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून यापूर्वी संगमनेरात घडलेल्या काही धक्कादायक घटनांचे विश्‍लेषण केल्यास या दाव्याला अधिक बळ मिळते.


देशात सांप्रदायिक मुद्दे तापवत ठेवून देशाचे वातावरण बिघडवण्याच्या कटात सहभागी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधीत ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी देशभरात छापेमारी केली होती. या कारवाईत राज्यातील नवी मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजी महाराज नगर, पुणे, कोल्हापूर, बीड, मालेगाव, परभणी, नांदेड, जालना आणि धुळ्यात एनआयएच्या पथकांनी धाडी घालीत 20 जणांना अटक केली होती. या कारवाईत विदेशी फंडींगसह काही आक्षेपार्ह कागदपत्रेही तपास संस्थांच्या हाती लागल्याने आता त्याच्या विश्‍लेषणावरुन दुसर्‍या टप्प्यातील कारवाई सुरु करण्यात आली असून त्यात अहमदनगरसह संगमनेर शहरातील प्रत्येकी एकाची चौकशी व कारवाई झाल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


आज पहाटेच्या सुमारास करण्यात आलेली ही कारवाई थेट राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केल्याची जोरदार चर्चा जिल्हाभर सुरु होती. मात्र प्रत्यक्षात त्यामागील सत्यता शोधली असता सदरील कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले व स्थानिक पोलिसांच्या मदतीने पूर्ण केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय यंत्रणांनी अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर संशयीतांना सोबत नेले जाते, या प्रकरणात मात्र अहमदनगर व संगमनेर येथील दोन्ही आरोपींवर स्थानिक पोलिसांनीच प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने यात राष्ट्रीय तपास संस्थांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सदरील कारवाई करावी याबाबत या यंत्रणेकडूनच जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना प्राप्त झाल्या असण्याची दाट शक्यता मात्र कायम आहे.

  

Visits: 76 Today: 2 Total: 1108291

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *