अधिकार्यांपुढे नुकसानग्रस्त पठारावरील शेतकर्यांनी मांडल्या व्यथा
अधिकार्यांपुढे नुकसानग्रस्त पठारावरील शेतकर्यांनी मांडल्या व्यथा
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात अतिवृष्टीने लाल कांद्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेले तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे व महसूल विभागाच्या अधिकार्यांपुढे शेतकर्यांनी डोळे पाणावत आपल्या व्यथा मांडल्या असल्याचे भावनिक चित्र बुधवारी (ता.21) पहावयास मिळाले.
पठारभागातील नांदूर खंदरमाळ, बावपठार, मोरेवाडी, वनकुटे, भोजदरी, पेमरेवाडी, माळेगाव पठार, डोळासणे, सारोळे पठार, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, वरूडी पठार, ढोरवाडी, पोखरी बाळेश्वर, तळेवाडी, सावरगाव घुले, जवळे बाळेश्वर, महालवाडी, पिंपळगाव देपा, मोधळवाडी या गावांसह आदी गावे लाल कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथील शेतकरी कांद्याचे उत्पादन घेऊन उत्पन्न मिळवितात. मात्र यावर्षी सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाल कांदा, मका, ऊस, डाळिंब इत्यादी पिकांची अक्षरशः वाट लागली आहे. तर कांदा शेतातच सडून गेला आहे. अनेक शेतकर्यांनी दोन-तीनदा कांद्याची लागवड केली होती. परंतु, पावसाने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. या अतिवृष्टीने सुमारे एक लाख रुपयांच्या आसपास खर्च करुनही शेतकर्यांच्या पदरी काहीच उरले नाही.
बुधवारी तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, कृषी मंडल अधिकारी पंढरीनाथ लेंडे, तलाठी के.बी.शिरोळे, कृषी सहाय्यक प्रदीप मंडलिक यांनी नांदूर येथील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत पंचनामे केले. यावेळी सरपंच सुनंदा भागवत, सामाजिक कार्यकर्ते गणेश सुपेकर यांनी अधिकार्यांपुढे शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या.