महामार्गावरील बोगद्यातून विद्यार्थीनींवर भिरकावले जाताहेत दगड! कासारवाडीत विकृतांचा कहर; पोलिसांसह महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या मध्यात असलेल्या बोगद्यातून गेल्या वर्षभरापासून विद्यार्थीनींना लक्ष्य करुन दगड भिरकावण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत कासारवाडीतील काशेश्‍वर विद्यालय आणि ग्रामपंचायतीने शहर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वसुलीत पटाईत असलेल्या टोलनाका व्यवस्थापनास वारंवार पत्र पाठवूनही कोणतीच कारवाई झाली नाही. त्याचा परिणाम मनोबल वाढलेल्या विकृतांनी आज सकाळी शाळेत जाणार्‍या इयत्ता नववीतील विद्यार्थीनींना लक्ष्य करुन मोठा दगडं फेकल्याने त्यात दोघी जखमी झाल्या आहेत. या संतापजनक प्रकारात जखमी झालेल्या आस्था श्रीवास या विद्यार्थीनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या डोक्याला आठ टाके घालावे लागले आहेत. या घटनेनेे कासारवाडीतील ग्रामस्थ संतप्त झाले असून आंदोलनाच्या तयारीत आहेत. तर, शाळेत जाणार्‍या विद्यार्थीनींवर सातत्याने होत असलेल्या अशा भ्याड हल्ल्याने पालकही धास्तावले आहेत.


याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.15) सकाळी दहाच्या सुमारास कासारवाडीजवळील पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाच्या बोगद्यात घडला. नेहमीप्रमाणे आज सकाळी या बोगद्यातून काशेश्‍वर विद्यालयात शिकणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी आपल्या शाळेत येत होते. त्याचवेळी काही विकृतांनी महामार्गावर जावून दोन पुलांच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या बोगद्यातून (सापट) भलामोठा दगडं खालून पायी चालणार्‍या विद्यार्थीनींच्या डोक्यावर सोडला. असाकाही प्रकार घडेल याची कोणतीही कल्पना नसल्याने बेसावध असलेल्या इयत्ता नववीतील आस्था शिवकुमार श्रीवास या विद्यार्थीनीच्या डोक्यात हा दगड लागल्याने ती जागेवरच बेशुद्ध होवून कोसळली. तर, तिच्या डोक्याला लागून तोच दगड तिच्यासोबत असलेल्या श्रृती गणेश धुमाळ (इयत्ता 4 थी) या मुलीच्या पायावर आदळल्याने तिलाही जखम झाली.


यावेळी सोबत चालणार्‍या अन्य विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्याने पुलावरुन आपली विकृती उधळणारे टवाळखोर पसार झाले. या गदारोळाने आसपास राहणारे ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी धावले व त्यांनी डोक्यात दगड लागून रक्तबंबाळ झालेल्या आस्था श्रीवास व पायाला जखम झालेल्या श्रृती धुमाळ या दोन्ही विद्यार्थीनींना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. यातील श्रृती धुमाळ या विद्यार्थीनीवर उपचार करुन तिला सोडण्यात आले असून आस्था श्रीवास हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या डोक्याला आठ टाके घालून तिला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.


या घटनेनंतर कासारवाडीतील ग्रामस्थ आणि पालक संतप्त झाले असून वारंवार तक्रारी करुनही कोणतीही कारवाई न करणार्‍या आणि विकृतांना मोकळे रान निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरलेल्या पोलीस, सार्वजनिक बांधकाम व महामार्ग प्राधिकरणाबाबत रोष व्यक्त केला आहे. वारंवार घडणार्‍या या प्रकारांमुळे कासारवाडीतील पालकही धास्तावले असून त्याचा परिणाम मुलींना शाळेत पाठवण्यास भीती निर्माण होण्यात झाला आहे. आज सकाळी कासारवाडीतील ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनाचा पवित्राही घेतला होता. मात्र प्रशासनाला आंदोलनाची पूर्वसूचना नसल्याचे काहींनी निदर्शनास आणून दिल्यानंतर परवानगीचे सोपस्कार पूर्ण करुन कुंभकर्णाची झोप लागलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.


धक्कादायक बाब म्हणजे कासारवाडीतील काशेश्‍वर विद्यालयात जाणार्‍या केवळ विद्यार्थीनींनाच परिसरातील काही टवाळखोर लक्ष्य करीत असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी 12 डिसेंबररोजी या विकृतांचा पहिला प्रकार समोर आला होता. त्यावेळी देखील उड्डाणपुलाच्या त्याच सापटीतून कासारवाडीतील टवाळखोरांनी भलामोठा दगडं सोडल्याने त्यावेळी पुलाखालून जाणार्‍या गार्गी गोकुळ कश्यप या विद्यार्थीनीच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करुन हा विषय निदर्शनास आणून देताना अशा घटनांना वेळीच पायबंद घातला गेला नाही तर भविष्यात मोठा अपघात घडून त्यातून जीवितहानी होण्याची भीतीही वर्तवली होती.


त्या पत्रावरुन कासारवाडीच्या सरपंचांनी 15 डिसेंबर 2023 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही याबाबतची लेखी माहिती देवून उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच, 18 डिसेंबररोजी पुन्हा शहर पोलीस व हिवरगाव पावसा टोल प्राधिकरणालाही पत्र देवून तत्काळ या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले होते. मात्र यासर्व घडामोडींना आता जवळपास आठ महिन्यांचा कालावधी उलटला असूनही यातील कोणत्याही यंत्रणेने या विषयाकडे गांभीर्याने लक्षच दिले नसल्याने मध्यंतरीचा काहीकाळ शांत बसलेल्या विकृतांचे मनोबल पुन्हा उंचावले असून त्यातून आज एका विद्यार्थीनीच्या जीवावरच प्रसंग बेतण्याची स्थिती निर्माण झाली होती. आतातरी प्रशासनाने कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होवून कासारवाडीतील विद्यार्थीनींच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे अशी आर्त विनवणी पालकांसह ग्रामस्थांकडून होत आहे.


गेल्या आठ महिन्यांपासून कासारवाडी शिवारातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाच्या सापटीतून परिसरातील काही टवाळखोर आठवी-नववीतील विद्यार्थीनींना लक्ष्य करुन मोठे दगडं भिरकावित आहेत. या संतापजनक प्रकारात आत्तापर्यंत तीन विद्यार्थीनींना दुखापती झाल्या असून आज सकाळी एक विद्यार्थीनी डोक्यातच दगडं पडल्याने गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासारखा असून पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेवून ‘हत्येचा प्रयत्न’ केल्याचा गुन्हा दाखल करुन त्या टवाळखोरांना कारागृह दाखवण्याची गरज आहे. याशिवाय केवळ टोल वसुलीतच धन्य असलेल्या महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील अशा सर्व ठिकाणी तत्काळ संरक्षक जाळ्या बसवून विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना दिलासा देण्याची गरज आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 79380

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *