पोखरण संघाने पटकावला पहिला ‘ब्राह्मण लीग’ चषक! अमेय तिवारी मालिकावीर; बक्षिसाची रक्कम मंदिर जिर्णोद्धाराला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील राजस्थानी ब्राह्मण समाजाने मर्यादीत षटकांची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. फरगडे स्पोर्ट क्लब येथे झालेल्या या स्पर्धेत साखळीतील चारही सामने एकतर्फी जिंकणार्‍या ‘पोखरण वॉरियर्स’ संघाने अंतिम सामन्यात मारवाडी क्लासिक संघावर 45 धावांनी मात करीत ब्राह्मण प्रिमिअर लीगचा पहिलाच चषक पटकावला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या पोखरण संघाने सहा षटकात 109 धावांचा डोंगर उभा केला होता. तो पार करताना मारवाड क्लासिक संघ अवघ्या 64 धावांतच गारद झाला. या सामन्यात 16 षटकारांसह अवघ्या 23 चेंडूत 98 धावा कुटणारा कर्णधार अमेय तिवारी मालिकावीर ठरला. विजेत्या संघाला ‘ब्राह्मण लीग’ चषकासह सात हजारांचे रोख बक्षिस देण्यात आले, मात्र कर्णधार तिवारी याने बक्षिसाची संपूर्ण रक्कम जगदीश मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यासाठी देत आदर्श निर्माण केला.

भारताने नुकताच मर्यादीत षटकांचा विश्‍वकप पटकावला. त्यामुळे देशभरात सध्या सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर चढल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथील राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या उत्सव युवक समितीने समाजातील तरुणांसाठी दोन दिवस ‘ब्राह्मण प्रिमिअर लीग’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते. त्यात ‘अ’ गटात नितीन ओझा यांचा मेवाड वॉरियर्स, शिरीष तिवारी यांचा पोखरण वॉरियर्स, दीपक जोशी याचा राजस्थान रॉयल, द्वारकानाथ जोशी यांचा जोधपूर टायटन्स. तर, ‘ब’ गटात सोनु ओझा यांचा मारवाडी क्लासिक, साई जोशी याचा पाली इंडियन, मनोज पंचारिया याचा जयपूर सुपरकिंग आणि आदित्य ओझा याचा भिलवाडा ब्लास्टर्स या संघांचा समावेश होता.


गुंजाळवाडी शिवारातील फरगडे स्पोर्ट क्लबच्या टर्फ खेळपट्टीवर पार पडलेल्या या स्पर्धेच्या शुभारंभाच्या सामन्यापासूनच पोखरण वॉरियर संघाने आपले वर्चस्व कायम राखले. पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल आणि त्यानंतर पाली इंडियन संघाला मोठ्या फरकाने धूळ चारीत ‘अ’ गटात सर्वोत्तम ठरलेल्या पोखरण संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. ‘ब’ गटात सर्वोत्तम ठरलेल्या मारवाड क्लासिक संघासोबत झालेल्या या लढतीतही पोखरण संघानेच बाजी मारीत थेट अंतिम फेरीत धडक दिली. तर, मारवाड संघाला मिळालेल्या दुसर्‍या संधीत त्यांनी मेवाड संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.


त्यामुळे या स्पर्धेचा अंतिम सामना दोन्ही गटात तुल्यबळ ठरलेल्या पोखरण वॉरियर्स आणि मारवाड क्लासिक या संघांमध्ये रंगला होता. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार्‍या मारवाड संघाला मात्र आपला निर्णय सार्थ ठरवता आला नाही. संपूर्ण स्पर्धेत स्फोटक फलंदाजी करणार्‍या अमेय तिवारीसह मैदानात उतरलेल्या जयेश जोशीने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी सुरु केली. त्यातही कर्णधार तिवारीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना अवघ्या 23 चेंडूत 16 षटकार फटकावताना तब्बल 98 धावांची धडाकेबाज खेळी केली. दुर्दैवाने चोरटी धाव घेताना तो धावबाद झाला. मात्र तोवर संघाने धावफलकावर 103 धावा झळकावल्या होत्या.


त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या संयम आसोपाने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकताना कर्णधाराने सुरु केलेला धडाका कायम राखला, मात्र फटकावण्याच्या नादात तो पुढे गेल्याने यष्टीरक्षक मोंटी ओझा याने क्षणात त्याची दांडी उडवली. अमेयच्या 98 धावांच्या खेळीवर पोखरण संघाने अवघ्या सहा षटकात दोन गड्यांच्या बदल्यात 109 धावांचा डोंगर उभा करीत मारवाड क्लासिक संघासमोर 110 धावांचे आव्हान उभे केले. या डावात सोनु ओझा याने दोन षटकांत 20 धावा देत एक बळी मिळवला. गौरीशंकर जोशी याच्या एका षटकांत 26, हर्ष पवारच्या षटकांत 25, मोंटी ओझा याच्या षटकात 24 तर, विष्णु जोशी याच्या एकाच षटकांत 14 धावा फटकावल्या गेल्या.

110 धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मारवाड क्लासिकच्या हर्ष पवार व विष्णु जोशी यांच्या जोडीने दोन षटकांत 40 धावा फटकावताना संघाला विजयाची आशा लावली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अमेय तिवारीने सीमेवरुन फेकलेल्या अचूक फेकीने पवारचा बळी गेला. त्याने 12 चेंडूत पाच षटकार आणि एका चौकारासह 35 धावा केल्या होत्या. तो बाद झाल्यानंतर मारवाड क्लासिकचा संघ अवघ्या 64 धावांमध्येच गडगडला आणि पोखरण वॉरियर संघाचा तब्बल 45 धावांनी दणदणीत विजय झाला. या स्पर्धेत 235 धावांसह 18 बळी घेणार्‍या अमेय तिवारीला मालिकावीर म्हणून तर, अंतिम सामन्यात एकाकी झूंजणार्‍या हर्ष पवारला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.


राजस्थानी ब्राह्मण प्रिमिअर लीग स्पर्धेच्या खिताबासह सात हजारांचे बक्षिस मिळवणार्‍या पोखरण वॉरियर्स संघाचे मालक शिरीष तिवारी यांनी जगदीश जयंतीचे औचित्य साधून संघाला मिळालेली रक्कम मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीचे उपस्थित समाजबांधवांनी टाळ्यांचा गजर करीत स्वागत केल्यानंतर उपविजेत्या मारवाडी क्लासिक संघाचे मालक सोनु ओझा आणि मेवाड वॉरियर्स संघाचे मालक नितीन ओझा यांनीही त्याचे अनुकरण करीत आपल्या संघांना मिळालेल्या बक्षिसाची रक्कम मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यासाठी जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *