मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी श्याम तिवारी! महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था; सुभाष भालेराव नूतन कार्याध्यक्ष..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी दैनिक नायकचे कार्यकारी संपादक श्याम तिवारी यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करताना कार्याध्यक्षपदी दिव्यमराठीचे प्रतिनिधी सुभाष भालेराव, उपाध्यक्षपदी भारत रेघाटे (भास्कर), योगेश रातडिया (लोकमत), सचिवपदी संजय आहिरे (युवावार्ता) व खजिनदारपदी सुशांत पावसे (सार्वभौम) यांचीही सर्वानुमते निवड झाली. तर, शेखर पानसरे (लोकमत) व गोरक्ष नेहे (नवराष्ट्र) यांना जिल्हा कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.


85 वर्षांचा सुवर्ण इतिहास असलेली मराठी पत्रकार परिषद ही संस्था राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था आहे. पत्रकारांचे हित जपणार्‍या या संस्थेची व्याप्ती राज्यातील 36 जिल्ह्यांसह गोवा आणि बेळगावपर्यंत विस्तारलेली असून दहा हजाराहून अधिक पत्रकार या संघटनेशी जोडले गेले आहेत. परिषदेच्या राज्याध्यक्षपदी आजवर थोर विचारवंत, साहित्यिक काकासाहेब लिमये, पा.वा.गाडगीळ, प्र.के.अत्रे, प्रभाकर पाध्ये, ह.रा.महाजनी, अनंत भालेराव, बाबुराव ठाकूर, द.श.पोतणीस, वसंत काणे, रंगण्णा वैद्य यासारखे थोर विचारवंत, पत्रकार लाभले आहेत.


मराठी पत्रकारांसाठी सातत्याने संघर्षाची भूमिका घेतल्यानेच राज्यात पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांसाठी पेन्शनसारखे निर्णय घेणं सरकारला भाग पडले. पत्रकारांना निर्भिडपणे काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी, ग्रामीणभागातील छोट्या वृत्तपत्रांबाबत शासनाचे जाचक धोरण, ज्येष्ठ व पात्र पत्रकारांना पेन्शनचा लाभ, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विमा संरक्षण, अधिस्वीकृती व पेन्शनबाबतचे कठोर निकष या प्रश्‍नांना समोर ठेवून आगामी कालावधीत संघटनेच्यावतीने राज्यभर काम केले जाणार आहे.


या पार्श्‍वभूमीवर संघटनेचे उत्तर नगरजिल्हा अध्यक्ष अमोल वैद्य, प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले मार्गदर्शक विलास गुंजाळ व जिल्हा प्रतिनिधी सचिन जंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी मागील कार्यकारिणीत संगमनेर तालुका कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शेखर पानसरे व गोरक्ष नेहे या दोघांची जिल्हा कार्यकारिणीसाठी निवड करण्यात आली. पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, सरचिटणीस मन्सूर शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी व मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *