विधिज्ञाशी भररस्त्यात घातलेला वाद पडला महागात! अदखलपात्र गुन्ह्याचे दरोड्यात रुपांतर; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जवळे कडलग येथून घुलेवाडीतील जिल्हा न्यायालयाकडे येत असलेल्या विधिज्ञाच्या दुचाकीमुळेच आपल्या वाहनाची ट्रॅक्टरला धडक बसल्याचे मानून त्यांना दमबाजी, मारहाण, शिवीगाळ व नंतर न्यायालयाच्या आवारात येवून दादागिरी करण्याचा प्रकार सहाजणांना चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी सुरुवातीला शहर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती, मात्र शहरातील विधिज्ञांनी समूहाने जावून गुन्हेगारांवर जरब बसावी यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी करीत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी आता ‘त्या’ सहा जणांवर दरोड्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या तीन दिवसांपासून सुरु असून तिसर्या दिवशी त्याची परिणीती दरोड्याचा गुन्हा दाखल होण्यात झाली आहे. गेल्या रविवारी (ता.30) सकाळी अकराच्या सुमारास जवळे कडलगमध्ये राहणारे विधीज्ञ प्रसाद राजेंद्र कडलग लोकअदालतीसाठी घुलेवाडीतील जिल्हा न्यायालयाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी जवळ्याच्या शिवारात असतानाच समोरुन भरधाव वेगाने आलेले महिंद्रा बोलेरो कंपनीचे वाहन त्याच्या पुढ्यात असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याचवेळी समोरच्या बाजूस सदरील विधिज्ञ आपल्या दुचाकीवरुन येत असल्याचे दिसल्याने बोलेरो वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले व त्याचे वाहन ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकले.

हा सगळा प्रकार पाहून विधीज्ञ कडलग यांनी आपली दुचाकी जागीच उभी केली असता धडकलेल्या बोलेरोमधील चार/पाच इसम खाली उतरले आणि त्यांनी थेट शिवीगाळ सुरु केली. हा प्रकार सुरु असताना अनिल गुंजाळ नावाच्या इसमाने तर ‘त्या’ विधिज्ञाच्या दुचाकीची चावीच काढून घेत त्यांच्या कानाखाली आवाज काढीत शिव्या आणि धमक्यांची लाखोळी वाहण्यास सुरुवात केली. यावेळी अनिल गुंजाळ नावाचा माणूस विधिज्ञाच्या दुचाकीचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यात व त्यांना ‘तू आज बचावला आहेस, पण तुला सोडणार नाही..’ अशा धमक्या भरण्यात मश्गुल असतानाच आसपासचे काहीजण घटनास्थळाकडे धावल्याने ते सर्वजण क्रमांक नसलेल्या बोलेरो वाहनातून पसार झाले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे ते लोकन्यायालयात हजरही राहीले आणि घडली घटना सामान्य समजून ती विसरुनही गेले.

मात्र घटनेच्या दुसर्या दिवशी महाराष्ट्र दिनी सकाळी दहाच्या सुमारास अनिल गुंजाळ नावाच्या इसमाने त्याच्या खासगी मोबाईल क्रमांकावरुन विधिज्ञ प्रसाद कडलग यांना फोन करीत पुन्हा घडल्या प्रकरणाला हवा दिली. यावेळी त्याने ‘** कोठे आहेस?, कोर्टात असशील तर तेथेच थांब, तुझ्या *** पाय घालतो व आज तुझा मुडदाच पाडतो’ अशी धमकी दिली. मात्र त्यादिवशी न्यायालयाला सुट्टी असल्याने सदरचे विधीज्ञ घरीच असल्याने त्यांनी तक्रार दिली नाही. घटनेच्या तिसर्या दिवशी मंगळवारी (ता.2) ते नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता न्यायालयात आले. दुपारी अडीचच्या सुमारास टंकलेखनाच्या कामासाठी न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडून समोरच्या बाजूच्या असलेल्या एका दुकानाकडे जाण्यासाठी ते रस्त्याच्या कडेला उभे राहिले असता अचानक राखाडी रंगाची मारुती स्विफ्ट कार भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आली, मात्र प्रसंगावधान राखून वेळीच त्यांनी तेथून पळ काढल्याने ते बालंबाल बचावले. त्यानंतर रस्त्याच्या दुसर्या बाजूला जावून ते उभे राहिले.

त्यांनी वाहनाकडे पाहिले असता सदरचे वाहन दोन दिवसांपूर्वी वाद झालेला अनिल गुंजाळ नावाचा इसम चालवत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी गुंजाळ याच्यासह अन्य चार-पाचजण त्यांच्या दिशेने धावत आले व त्यांनी ‘** थांब तुला मारुन टाकतो, तू वाचणार नाहीस, तू आमच्या गाडीचे नुकसान केले आहेस’ असे म्हणत त्यातील अनिल गुंजाळ याने त्यांची कॉलर पकडली व अन्य इसमांनी लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाणही केली. त्यातील दाढी वाढलेल्या आणि अंगात पिवळा सदरा घातलेल्या इसमाने आपला सदरा वर करुन ‘त्या’ विधिज्ञांना कंबरेला लावलेली गुप्ती दाखवली व ‘पैसे दिले नाही तर तुझा मुडदा पाडू, तुझे बाकीचे वकील लोकं काय करतात तेच पाहतो’ असा दमही भरला.

अनिल गुंजाळ व त्याचे चार-पाच साथीदार प्रसाद कडलग यांना मारहाण करीत असताना त्यांनी त्यांच्या हातातील अर्धातोळा वजनाची सोन्याची अंगठीही काढून घेतली. त्याच दरम्यान हा प्रकार पाहून न्यायालयाच्या परिसरातील अन्य वकील मंडळीही त्यांच्या मदतीला धावल्याने जाताजाता त्या टोळक्यातील एकजण ‘सदरचे कोर्ट गुंजाळवाडी शिवारात आहे, आपलाच परिसर आहे गुंजाळ काय आहे हे दाखवून देवू’ असे म्हणत होता तर अनिल गुंजाळ त्याच्यासोबत असलेल्या दाढीवाल्याला ‘तुझी गुप्ती काढ आणि भोकसं त्याला’ असे म्हणत त्यांना पेटवत असल्याचे प्रसाद कडलग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणात सुरुवातीला शहर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 323, 504, 506, 507 नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र या घटनेत मंगळवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात घडलेल्या घटनेची कथाही समाविष्ट झाल्याने पोलिसांनी त्यात दरोड्याचे 395 कलम वाढवले.

त्यामुळे आपल्या चुकीने अन्य वाहनाला धडक बसून झालेल्या वाहनाच्या नुकसानीचा राग दुचाकीवरील विधिज्ञाशी घालून त्याच्याकडून नुकसान भरपाई मागणार्या ‘त्या’ सहा जणांविरोधात आता दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून तो सिद्ध झाल्यास त्या सर्वांना आजन्म कारावासाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे. या घटनेने संगमनेरच्या वकिली व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
