शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त विखेंच्या आत्मचरित्रातील ‘तो’ किस्सा चर्चेत

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त विखेंच्या आत्मचरित्रातील ‘तो’ किस्सा चर्चेत
‘देह वेचावा कारणी’मधील विविध आठवणी आणि किस्स्यांना मिळाला उजाळा
नायक वृत्तसेवा, राहाता
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवारी (ता.17 नोव्हेंबर) स्मृतिदिन असल्याने राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. ठाकरे यांची भाषणशैली सर्वश्रृत होती. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांना मात्र ते स्वतः शिवसेनेत असताना त्यांना बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणात नेमके काय बोलतात, याची काळजी वाटली होती.

‘देह वेचावा कारणी’ हे विखे यांचे आत्मचरित्र अलीकडेच प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी ‘माझं शिवसेनापर्व व मंत्रीपद’ या प्रकरणात शिवसेनेत असताना आलेले अनुभव व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला असून त्याबाबत भरभरून लिहिले आहे. शिवसेनेत गेल्यानंतर मंत्रीपद कसे मिळाले, यावरही त्यांनी या प्रकरणात प्रकाश टाकला आहे. सोबतच शिवसेनेतून का बाहेर पडलो, याचाही आढावा विखे यांनी घेतला आहे.

डॉ.बाळासाहेब विखे यांनी 1998 सालची लोकसभेची निवडणूक दक्षिण नगर मतदारसंघातून व 1999 सालची लोकसभेची निवडणूक कोपरगाव मतदारसंघातून शिवसेनेकडून लढवली होती. 1999 च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यात दोन प्रचारसभा घेतल्या होत्या. याबाबतचा उल्लेख विखे यांनी आपल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्रात केला आहे. विखे यांनी म्हंटले आहे, ‘निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनाप्रमुखांनी दोन प्रचारसभा घेतल्या होत्या. एक श्रीगोंदे येथे, तर दुसरी राहात्याला. मला जरा बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांची काळजी होती. पण त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण या दोन्ही सभांमध्ये ते कडवट जातीवाचक शब्दही बोलले नाहीत. मला आणि कार्यकर्त्यांनाही आनंद झाला व त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. जातीय प्रश्नांवर आपण बोललात, तर त्याचं भांडवल करून विरोधक अपप्रचार करतील आणि आपल्या निवडणुकीला ते अडचणीचं ठरेल. असं मी ठाकरेंना सभेपूर्वी बोललो होतो. प्रबोधनकारांच्या सर्वसमावेशक व सुधारक विचारांवरही चर्चा झाली होती. अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय प्रवाहाची यथार्थ जाणीव ठेवून मोठ्या तारतम्यानं त्यांनी भाषण केलं. श्रीगोंद्याच्या सभेत ते कांद्याच्या प्रश्नावर बोलताना, ‘कांद्याचे भाव कमी झाले पाहिजे’ असं बोलल्यानं कांदा-उत्पादक शेतकर्‍यांना भडकावण्याचे प्रयत्न झाले होते. त्याचा मला थोडाफार फटका बसला. राहात्याच्या सभेत मात्र त्यांनी खंडकरी शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत या मुद्द्यावर भर दिला. त्या लढ्याला शिवसेनेने पाठिंबाही दिला. अशा विविध आठवणी यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

 

Visits: 8 Today: 1 Total: 116863

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *