तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लीपची होणार चौकशी
नायक वृत्तसेवा, नगर
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लीपसंबंधी चौकशी करण्यासाठी तीन महिला अधिकार्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन चौकशीचा आदेश दिला असून त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान देवरे आता सावरल्या असून पोलिसांचेही त्यांच्यावर लक्ष आहे. आपण यापुढे स्वत:साठी नाही, तर राज्यातील सर्व महिला अधिकारी-कर्मचार्यांसाठी लढण्याचा निर्धार केल्याचे त्या सहकार्यांशी बोलताना सांगत आहेत.
लोकप्रतिनिधींचा जाच आणि तक्रार करूनही वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगत आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लीप देवरे यांनी तयार केली होती. ती व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही खळबळ उडाली. विरोधी पक्षाकडून कारवाईची मागणी झाली. त्यासोबतच राजपत्रित अधिकारी महासंघानेही सरकारला निवेदन देऊन चौकशी करून संबंधितांवर चौकशीची मागणी केली. राज्य महिला आयोगाने देवरे यांच्या क्लीपची दखल घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार वैशाली आव्हाड यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून आपला अहवाल देणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही नोंद केली नाही. मात्र, दखल घेतली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकार्यांनी देवरे यांच्याशी संवाद साधला आहे. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, यासंबंधी पोलिसांकरवी त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.