गुंजाळवाडीतील शेतशिवारांमध्ये लोंबकळताहेत वीजवाहक तारा! वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा; ग्राहकसेवेच्या नावाने बोंबाबोंब..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भरमसाठ बिलांची आकारणी करुनही अखंडीत पुरवठा आणि ग्राहकसेवेच्या बाबतीत ठणठणपाळ असलेल्या राज्य वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा आता शेतकर्यांच्या मुळावरच उठल्याचे चित्र सध्या गुंजाळवाडी शिवारात दिसत आहे. या परिसरातील कंपनीच्या विद्युत प्रवाह वाहणार्या तारा चक्क काही शेतांमधील पिकांना स्पर्श करु लागल्याने मोठा अनर्थ घडण्याची भिती निर्माण झाली आहे. मात्र वारंवार तक्रारी करुनही कंपनीकडून या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आधीच संतापाची धनी असलेल्या वीज कंपनीच्या विरोधात शेतकर्यांच्या मनातील रोषही खद्खदू लागला आहे.
भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराचा सातत्याने आरोप होणार्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अनागोंदी कधीही लपून राहिलेली नाही. ग्राहकांना सेवा देण्यातही ही कंपनी सतत मागे राहीली आहे. पूर्वीच्या वीज मंडळाबाबत अशाच तक्रारी वाढत्याने तत्कालीन सरकारने मंडळ बरखास्त करुन त्याचे तीन भागात विभाजन केले. त्यातून कामकाजात पारदर्शकता आणि सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा गृहीत धरण्यात आली होती. मात्र ती सपशेल फोल ठरली असून उलटपक्षी कंपनीच्या गलथान कारभारात भर पडून भ्रष्टाचाराची नवनवीन कुरणं तयार करण्यातच कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी दिवस घालवित असल्याचेही आरोप वेळोवेळी झाले आहेत.
वीज कंपनीच्या अशा भोंगळ कारभारातून संगमनेर उपविभागही सुटलेला नाही. जिल्ह्यातील प्रगत आणि समृद्ध तालुका असतानाही संगमनेर तालुक्यात आजवर कधीही वीज कंपनीबाबत समाधानाचे शब्द कानी पडलेले नाहीत. इतकेच नव्हेतर संकटाच्या काळात अथवा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर ग्राहकांना तो सुरळीत होण्याची वेळ, झालेला खोळंबा याची माहिती देण्यासाठी असलेला ग्राहकसेवा दूरध्वनी क्रमांक एरव्ही सुरु असतो, मात्र खोळंबा अथवा पुरवठ्यात अडचण निर्माण होताच चक्क तो बंद करुन ठेवला जातो यावरुनच वीज कंपनीचा कारभार स्पष्ट होतो.
कंपनीच्या कामकाजात असलेल्या अशा अनेक त्रुटींमध्ये आता हलगर्जीपणाचाही समावेश झाला असून सध्या त्याचा प्रत्यय गुंजाळवाडी शिवारातील शेतकरी घेत आहेत. येथील नामदेव आनंदा गुंजाळ या शेतकर्याच्या शेतशिवारातून वीज कंपनीच्या वीजवाहक तारा गेल्या असून मागील वेळी झालेल्या वादळात परिसरातील काही खांब वाकल्याने या तारा अक्षरशः या शेतकर्याच्या मका पिकाला स्पर्श करु लागल्या आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने संबंधित शेतकर्याने वीज कंपनीकडे तक्रारही केली आहे.
मात्र भ्रष्टाचाराच्या चष्म्यातून ग्राहकसेवा हा शब्दच दृष्टीत पडत नसल्याने वीज कंपनीच्या अधिकारी व गुंजाळवाडीच्या वायरमनला त्याच्याशी काहीएक घेणंदेणं नसल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. वीज कंपनीच्या या गलथान आणि हलगर्जीपणामुळे या परिसरातील शेतकरी आपल्याच शेतात जाण्यास धजावत नसल्याने पिकांना पाणी देणंही अवघड होवून बसलं आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या तारा लोंबकळल्याने यापूर्वीही गुंजाळवाडी शिवारात अपघाताच्या घटना घडल्या आहेत, मात्र त्यातून बोध घेवून मार्गक्रमण करील ती वीज कंपनी कसली अशी येथील अवस्था आहे.
सध्या पावसाचे दिवस आहेत. विद्युतप्रवाह सुरु असताना पिकांना तारेचा स्पर्श झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची सतत शक्यता आहे. त्यातून एखाद्याच्या जीवावरही संकट ओढावू शकते. यासर्व गोष्टींचा आणि कंपनीकडून मिळणारा पगार काम करण्यासाठी दिला जातो याचा विचार करुन गुंजाळवाडी शिवारातील लोंबकळणार्या तारा त्वरीत पूर्ववत करुन उंचावर न्याव्यात अशी मागणी करण्यात आली असून याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलनाचे हत्यार उपासण्याची तयारी येथील शेतकरी करीत आहेत.
माझ्या शेतात सध्या मक्याचे पिक आहे. गेल्याकाही दिवसांपूर्वीच्या वादळवार्याने वीजेचा खांब झुकल्याने त्यावरुन गेलेल्या विद्युतवाहक तारा हाताला लागतील इतक्या खाली आल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने वीजप्रवाह सुरु असताना उभ्या पिकांना तारांचा स्पर्श होवून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याबाबत तक्रारीही केल्या आहेत, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.
नामदेव आनंदा गुंजाळ,
बाधित शेतकरी, गुंजाळवाडी