वर्गणीसाठी आला अन् खून करुन पळाला! महिन्याभराने फुटली वाचा; मौलानासह दोघांना अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिन्याभरापूर्वी मालदाडच्या जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या मदीना नगरमधील इसमाच्या मृत्यूचे कोडे सोडवण्यात अखेर संगमनेर पोलिसांना यश आले आहे. शवविच्छेदन अहवालातून मयत आहतेशाम इलियास अन्सारी यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे समोर आल्यानंतर पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत महिनाभरातच त्याची उकल केली. या प्रकरणी आठ महिन्यांपूर्वी वर्गणी मागण्यासाठी संगमनेरात आलेल्या आणि काहीकाळ येथेच स्थिरावलेल्या मौलाना मोहंमद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी याच्यासह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना थेट उत्तर प्रदेशामधून अटक करण्यात आली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या महिन्यात 3 एप्रिलनंतर घडला, तर या घटनेत मयत झालेल्या आहतेशाम अन्सारी यांचा मृतदेह 23 एप्रिलरोजी मालदाडच्या जंगलात आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली. मात्र मयताच्या शवविच्छेदन अहवालातून त्यांना मारहाण करीत गळा आवळून खून झाल्याची बाब समोर आल्यानंतर संगमनेरचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत एकएक कडी जोडण्यास सुरुवात केली, त्यातून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

या प्रकरणी रविवारी (ता.26) रात्री उशिराने मयत अन्सारी यांचा मुलगा जुनेद आहतेशाम अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार आठ महिन्यांपूर्वी मोहंमद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी हा मौलाना सहारनपूर (उत्तर प्रदेश) येथून वर्गणी (चंदा) मागण्यासाठी संगमनेरात आला होता. मदिनानगर परिसरात धर्मकार्यासाठी कोणी आल्यास एम्पायर बेकरीचे मालक आहतेशाम अन्सारी त्यांना आपल्या बेकरीत निवारा देत असतं. त्यानुसार सहारनपूर आलेला मौलाना मोहंमद जाहीदही त्यांच्या बेकरीत मुक्कामी थांबून परिसरातील मशिदीत काम करुन लागला.

या दरम्यान ओळख झाल्याने अन्सारी यांच्या घरातील अन्य सर्व सदस्य नेहमीच त्याच्याशी बोलतं असतं. त्याचा गैरफायदा घेत दोन महिन्यांपूर्वी त्याने थेट अन्सारी यांच्या दोन मुलींमधील मोठ्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. मात्र आहतेशाम अन्सारी यांनी एकतर तो बाहेरील राज्याचा आणि त्यातही बारा गावचा मूंजा म्हणून आपल्या लाडक्या लेकीचा हात त्याच्या हातात देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्याचा राग येवून मौलानाने सगळ्या कुटुंबासमोरच अन्सारी यांना ‘तुमने ऐसे तरीकेसे लडकी नहीं दी, तो मुझे दुसरा तरीका भी आता है।, मै तुमकों बर्बाद कर डालुंगा।’ अशी धमकी भरल्याने त्यांनी त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले.

फुकटचा निवारा गेल्यानंतर हा मौलाना संगमनेर सोडून देवठाण (ता.अकोले) येथे गेला व तेथील मशिदीत नोकरी करु लागला. दीड महिन्यानंतर त्याने देवठाण सोडून थेट कल्याणमधील पत्रीपूल मशिदीत आश्रय घेतला. या दरम्यान त्याला घरातून काढून दिले असले तरीही आहतशाम अन्सारी यांचा त्याच्याशी संपर्क व संवाद सुरुच होता. त्यामुळे दोघांमध्ये फोनवरुन संभाषणही होत आणि अधुनमधून त्यांचे कल्याणला जाणंही होतं. या दरम्यान त्याने मुलीच्या मागणीचा विषय कायम लावून धरल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. मात्र मुलीच्या भविष्याचा विचार करुन अन्सारी यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून त्याच्या मागणीला जोरदार विरोध होत होता.

गेल्या महिन्यात 1 एप्रिलरोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आहतेशाम अन्सारी घरात काहीही न सांगता दोघांचा टिफीन घेवून बाहेर पडले. त्या रात्री ते माघारी घरी परतलेच नाहीत, मात्र दुसर्या दिवशी सकाळी घरी आले. त्यानंतर 3 एप्रिलरोजी सकाळी अकराच्या सुमारास ते घरात काहीच न सांगता आपली बॉक्सर कंपनीची दुचाकी घेवून घराबाहेर पडले, दुपार उलटल्यानंतरही ते घरी न आल्याने त्यांच्या मुलांनी वारंवार फोन करुन त्यांचा ठावठिकाणा जाणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाईल प्रत्येकवेळी बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी नातेवाईक व अन्य ठिकाणी त्यांची शोधाशोध सुरु केली.

सर्व ठिकाणं तपासूनही आहतेशाम अन्सारी यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर 4 एप्रिलरोजी त्यांच्या कुटुंबियांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली. अन्सारी हे नेहमी मौलाना मोहंमद जाहीदकडे कल्याणला जात असल्याने त्यांच्या मुलाने फोनवरुन त्यांच्याकडेही चौकशी केली. त्यावेळी त्याने तुझे वडिल 30 मार्चरोजी माझ्याकडे आले होते, त्यानंतर त्यांच्याशी संपर्क नसल्याचे त्याला सांगितले. अन्सारी कुटुंबाने आपली लेक मौलानाला देण्यास नकार दिला असला तरीही त्यांचा त्याच्यावरील विश्वास मात्र कायम होता. त्यामुळे दोन-चार दिवसांनी त्यांनी पुन्हा मौलानाला फोन केला. त्यावेळी त्याने न विचारताही ‘तुझे वडिल जिवंत असून लवकर घरी येतील’ असे त्याने सांगितले.

घरातील कर्ता पुरुष अचानक गायब झाल्याने हादरलेल्या अन्सारी कुटुंबाने त्यानंतर मौलानाला वेळोवेळी संगमनेरला येण्याची विनंती केली. मात्र तो प्रत्येकवेळी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अन्सारी यांच्या मुलाच्या मनात संशय निर्माण झाला. याबाबत त्याने वडिल हरवल्याची चौकशी करणार्या सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे यांना माहिती दिली. त्यांनीही मौलाना जाहीद याला फोन करुन संगमनेर पोलीस ठाण्यात बोलावले व त्याचा जवाब नोंदवून घेतला. या दरम्यान अन्सारी यांचा मोठा मुलगा जुनेदने 24 एप्रिलरोजी मोबाईलवर आलेल्या एका अनोळखी इसमाच्या मृतदेहाचा फोटो पाहीला असता तो आपल्या वडिलांचा असल्याचा संशय आल्याने त्याने पालिकेच्या शवविच्छेदन गृहात जावून खात्री केली असता त्याचा संशय खरा ठरला.

आपल्या वडिलांना मृतावस्थेत पाहून हादरलेल्या जुनेदने तेथूनच मौलाना जाहीदला फोन करीत ‘तुम्ही तर वडिल जिवंत व सुरक्षित असल्याचे म्हणाला होता, मग हे काय झाले?’ असा प्रश्न केला असता मौलाना घाबरला व त्याने मी नंतर फोन करतो असे म्हणतं त्याचा फोन कट केला. अन्सारी यांच्या दफनविधीच्या कार्यक्रमालाही मौलाना गैरहजर राहीला. त्यामुळे अन्सारी कुटुंबाच्या मनात असलेला संशय अधिक बळावला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी 1 ते 3 एप्रिल या दरम्यान मौलाना आणि मयत आहतेशाम अन्सारी यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता त्या दरम्यान मौलाना संगमनेरातच असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे मौलानाने संगमनेर पोलिसांना दिलेल्या जवाबातही त्याने संगमनेरात आल्याचा उल्लेख टाळला होता. त्यामुळे पोलिसांचाही संशय बळावला होता.

अखेर या प्रकरणातील बारकाव्यांचा शोध घेत पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्वतंत्र पथकाची नेमणूक करुन सखोल तपास केला असता मौलाना मोहंमद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी यानेच आहतशाम इलियास अन्सारी यांचा घातपात केल्याचे समोर आल्यानंतर त्याला थेट उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात जावून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी (रा.कल्याण) व मोहम्मद फैजल शमीम अन्सारी (रा.बगदाद अन्सार, ता.धामपूर, जि.बिजनौर) यांच्या मदतीने 3 एप्रिलरोजी दुपारी बाराच्या सुमारास मालदाडच्या जंगलात आपणच आहतेशाम अन्सारी यांचा दोरीच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली असून मोहम्मद फैजल पसार झाला आहे.

धर्मकार्याला मदत म्हणून ज्याने आपल्या घरात आश्रय दिला, त्याचाच मौलानाने दोघांच्या मदतीने खून केल्याच्या या घटनेचा संपूर्ण तपास तांत्रिक विश्लेषणावर अवलंबून होता. मुलगी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन खुन्नस मनात धरुन देवठाण आणि नंतर कल्याणला पोहोचलेल्या मौलाना मोहंमद जाहीद याने उत्तरप्रदेश व कल्याणमधील प्रत्येकी एकाला सोबत घेत मालदाडच्या जंगलात आपल्या मनातील भडाग्नी शांत केला. मात्र कायद्याच्या जाळ्यातून तो सुटू शकला नाही. पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस नाईक राहुल डोके व पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी सखोल तपास करुन थेट उत्तरप्रदेशातील सहारनपूर मधून मौलाना जाहीद तर कल्याणमधून मोहम्मद इम्रान सिद्दिकीच्या मुसक्या आवळल्या.

