वळण पिंप्री येथील जाधव खून प्रकरणी सात जणांना जन्मठेप

वळण पिंप्री येथील जाधव खून प्रकरणी सात जणांना जन्मठेप
जन्मठेपेसह 1 लाख 19 हजार रुपये दंडाची जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वळण पिंप्री येथील हिंमत जाधव यांच्या खुनाबद्दल जिल्हा सत्र न्यायालयाने आज (गुरुवार ता.12) सकाळी मुख्य आरोपी राजू शेटे याच्यासह सात जणांना दोषी ठरवत जन्मठेप आणि 1 लाख 19 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

कृष्णा अशोक कोरडे (वय 26, रा.माजलगाव, बीड), सोमनाथ भानुदास मोरे (वय 31, रा.शिंगणापूर, ता.नेवासा), आजिनाथ रावसाहेब ठोंबरे (वय 29, रा.जामगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद), रामचंद्र ऊर्फ राजू चिमाजी शेटे (वय 44, रा.वळण पिंप्री, ता.राहुरी), संदीप बहिरूनाथ थोपटे (वय 29, रा.राहुरी कृषी विद्यापीठ), राहुल बाबासाहेब दारकुंडे (वय 28, रा.मोरगव्हाण, ता.राहुरी), जावेद करीम शेख (वय 36, रा.देवगाव, ता.नेवासा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वळण पिंप्री येथील हिंमत अभिमन्यू जाधव (वय 32) व त्याचा मित्र संतोष चव्हाण हे न्यायालयीन कामासाठी 12 सप्टेंबर, 2016 रोजी अहमदनगरला आले होते. कामकाज आटोपल्यानंतर संतोष चव्हाण यांच्या दुचाकीवर बसून हिंमत जाधव औरंगाबाद रस्त्याने गावाकडे जात होते. इमामपूर घाटाजवळ मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी जाधव यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते खाली कोसळले. संतोष चव्हाण याने घाटाखाली थांबलेल्या लक्ष्मण कुसळकर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. याबाबत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आनंद भोईट यांनी तपास करून आरोपींना अटक केली. त्यानंतर भोईटे यांची बदली झाल्यावर हा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडे गेला. त्यांनी मुख्य सूत्रधार राजू शेटे याला अटक केली. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात सरकारी पक्षातर्फे 25 साक्षीदार तपासण्यात आले. मुख्य आरोपी शेटे याने जुन्या वादातून हिंमत जाधव यांच्या खुनाची सुपारी कृष्णा कोरडे, सोमनाथ मोरे, आजिनाथ ठोंबरे यांना दिली होती. आरोपी संदीप थोपटे व राहुल दारकुंडे यांनी घटनेच्या दिवशी जाधव यांचे ‘लोकेशन’ गोळीबार करणार्‍यांना कळविले होते. आरोपी जावेद शेख याने आरोपींना पिस्तुल पुरविल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना जन्मठेप आणि 1 लाख 19 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.केदार केसकर यांनी बाजू मांडली.

 

Visits: 16 Today: 1 Total: 115337

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *