एका मृतदेहासाठी व्यवस्थेने घेतला चौघांचा बळी! प्रवाह कायम ठेवून बचावकार्य; जवानांच्या मृत्यूने राज्याची हानी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुगांवमधील बुधवारच्या घटनेत प्रवरापात्रात बुडालेल्या दोघांमधील एकाचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत हाती न लागल्याने थेट राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातील एका मातब्बर राजकीय पुढार्‍याच्या दबावतंत्राचाही वापर झाला. त्याच दबावात धुळ्याहून तब्बल 21 जणांचे पथक रातोरात सुगांवमध्ये दाखल झाले. खरेतर सध्या सुरु असलेले आवर्तन काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय झाला असता तर कदाचित आपत्ती प्रतिसाद पथकाचीही गरज भासली नसती. मात्र प्रत्यक्षात आवर्तन बंद केल्यास लाभार्थी शेतकरी नाराज होतील या एकाच शक्यतेवर आपत्ती प्रतिसाद दलाला बोलवण्यात आले आणि दुर्दैवाने घडलेल्या अपघातात राज्याने एका अधिकार्‍यासह दोघा जवांनाना गमावले. ही घटना वरकरणी अकस्मात वाटत असली तरीही त्यात गेलेले चारही बळी याच व्यवस्थेने घेतल्याचे आता स्पष्ट होत आहे.


गेल्या बुधवारी (ता.22) अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाट्याजवळील प्रवरा नदीपात्रात पोहोत असतांना सिन्नर तालुक्यातील घोलवडचा रहिवाशी सागर पोपट जेडगुले (वय 25) व अर्जुन रामदास जेडगुले (वय 18, रा.पेमगिरी) हे दोघे तरुण बंधार्‍याजवळ बुडाले. त्यानंतर दोन तासांनी सागर जेडगुलेचा मृतदेह त्याच परिसरात आढळून आला तर, अर्जुन जेडगुले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेवूनही बेपत्ताच होता. या दरम्यान सुगांवमधील काहींनी जिल्ह्यातील एका राजकीय पुढार्‍याशी संपर्क साधून निळवंडे धरणातून सुरु असलेले आवर्तन काही काळासाठी बंद करण्याची करण्याची विनंती केली. मात्र सदरचे आवर्तन सिंचनासाठी सुरु असल्याने आणि त्यातच बुधवारीच पूर्वेकडील काही लोकप्रतिनिधींनी आवर्तनाला वेग नसल्याने आंदोलनाची भाषा केल्याने त्यातून निर्माण होणारी राजकीय नाराजी टाळण्यासाठी संबंधित पुढार्‍याने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा पर्याय योग्य असल्याचे ग्रामस्थांना पटवून दिले.


सुगांवकरांना बुडालेल्या तरुणाचा शोध महत्त्वाचा असल्याने त्यांनीही असा नाहीतर तसा पर्याय स्वीकारला आणि त्यानुसार ‘त्या’ पुढार्‍यानेही तत्काळ धुळ्यातील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाशी संपर्क साधण्याचे आदेश दिले. आता इतक्या मोठ्या पुढार्‍याकडून थेट मागणी झाल्याने धुळ्यातील नियंत्रण कक्षानेही तत्काळ हालचाल करीत पोलीस उपनिरीक्षक तथा पथकाचे प्रमुख प्रकाश नाना शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तब्बल 21 जवानांची टीम सुगांवला धाडण्यात आली. गुरुवारी (ता.23) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या या पथकाने सकाळी 6 वाजता लागलीच बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बुडालेला तरुण नेमका कोणत्या ठिकाणी पोहोत होता याची माहिती समजून घेण्यासाठी पथकाने सुगांवमधील गणेश मधुकर देशमुख याला आपल्या बोटीवर सोबत घेत अन्य दोन बोटींच्या साहाय्याने बंधार्‍याजवळील ठिकाणी घिरट्या घालीत त्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली.


या दरम्यान एसडीआरएफ पथकाचे प्रमुख प्रकाश शिंदे, काँन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, वैभव सुनील वाघ, पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार या जवानांसह सुगांवचा रहिवाशी गणेश देशमुख याला घेवून बंधार्‍याच्या भिंतीजवळ पोहोचले. दोनवेळा त्या परिसरात घिरट्या घालून तिसर्‍यांदा त्यांची बोट जेव्हा पुन्हा बंधार्‍याजवळ गेली तेव्हा मात्र काळाने आपला जबडा वासला आणि बंधार्‍यावरुन पडणार्‍या पाण्याचा लोंढा अचानक उसळून त्यांची बोटं अस्थिर होवू लागली. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच अचानक बोटीच्या इंजीनाने धोका दिला आणि ते ऐन बंधार्‍याजवळील धोकादायक क्षेत्रात बंद पडले. त्यामुळे बंधार्‍याखाली निर्माण झालेल्या भंवर्‍याने त्या बोटीचा मार्ग रोखून तिला आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली. नेमक्या त्यावेळी अन्य दोन्ही बोटी त्यांच्यापासून दूर होत्या.


या गदारोळात बंधार्‍यावरुन कोसळलेला एक प्रपात थेट बोटीतच पडल्याने ती एका बाजूला झुकली आणि त्यातील तिघे पाण्यात पडले. तर, प्रकाश शिंदे यांच्यासह स्थानिक गणेश देशमुख व जवान पावरा बोटीचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र या परिसरातील प्रवरेच्या वेगवान प्रवाहासमोर त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले आणि काही समजण्यापूर्वीच त्यांची बोट उलटली. आधी पाण्यात पडलेल्या तिघांमधील पंकज पवार आणि अशोक पवार हे दोघे त्या परिसरातील भंवर्‍याची कडी भेदून मदतीसाठी धावलेल्या दुसर्‍या बोटीपर्यंत पोहोचले, मात्र जवान वैभव वाघ भंवर्‍यात फसले आणि अंगात जीवरक्षक जॅकेट असतानाही गटांगळ्या खावू लागले. या अपघातानंतर हा परिसर किती धोकादायक आहे याची जाणीव झाल्याने मदतीसाठी धावलेल्या दुसर्‍या बोटच्या चालकाची थेट बंधार्‍यापर्यंत जाण्याची हिम्मत झाली नाही. त्यामुळे अंगात जीवरक्षक जॅकेट असतानाही शिंदे यांच्यासह पावरा आणि वाघ हे दोघे जवान नाकातोंडात पाणी जावून शहीद झाले.

तर स्थानिक तरुण गणेश मधुकर देशमुख पाण्यात पडताच त्याच्या अंगावरील जीवरक्षक जॅकेट पाण्याच्या वेगाने सटकल्याने बुडाला आणि तळाला जावून अडकला. तर काही वेळाने शहीद झालेल्या शिंदे, पावरा व वाघ यांचे मृतदेह टप्प्याटप्प्याने तरंगत बाहेर आले आणि बचाव पथकाच्या हाती लागले. सलग दुसर्‍या दिवशी घडलेल्या या भयंकर अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर चौथा गायब झाला. शोधकार्य करताना पथकाचे प्रमुख आणि दोन सहकारी धारातीर्थी पडल्याने संपूर्ण टीम शोकमग्न झाली, त्यामुळे त्यांच्याकडून सुरु असलेले शोधकार्य थांबवण्यात आले. सायंकाळी उशिराने राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुगांवला भेट दिली. त्यावेळी त्यांनी राज्य आपत्ती पथकातील जवानांची भेट घेत त्यांचे सांत्त्वन केले.


बचाव कार्यात शहीद झालेल्या जवानांना सुगांवमध्ये मानवंदना देण्यात येवून त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी सकाळी घडलेली दुर्घटना सविस्तरपणे सांगत आवर्तन बंद केल्याशिवाय बुधवारी बुडालेल्या अर्जुन जेडगुलेसह गुरुवारी सकाळी बुडालेल्या गणेश देशमुखचा शोध लागणे अशक्य असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांची जोरदार मागणी विचारात घेत मंत्री महोदयांनीही जिल्हाधिकारी सालीमठ यांना आवर्तन बंद करण्याचे आदेश दिले. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत त्यांच्यासमोरच जलसंपदा विभागाला आवर्तन थांबवण्यास सांगितले. त्यामुळेच आज सकाळी दोन्ही तरुणांचे मृतदेह हाती लागले.


गेल्या दोन दिवसांत घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये सहाजणांचा बळी गेला. बुधवारी बुडालेल्या दोघांमधील एकाचा शोध लागत नसल्याने काही काळासाठी आवर्तन थांबवण्याचा सोपा पर्याय असतानाही व्यवस्थेचा कसा वापर होतो याचे नवीन उदाहरण समोर उभे राहीले आणि थेट धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तब्बल 21 जणांच्या पथकाला पाचारण केले गेले. अशाप्रकारच्या मदतकार्यात आवश्यक असलेली साधनसामग्री घेवून पथकाने आपले कर्तव्यही सुरु केले, मात्र त्यात यश येण्याऐवजी त्यातून पथकातील एका अधिकार्‍यासह दोघा जवानांना आणि एका स्थानिक तरुणाला आपला जीव गमवावा लागला. एका मृतदेहाच्या शोधासाठी प्रतिसाद दलाला बोलावण्याचा निर्णय कितपत योग्य होता? असा प्रश्‍न आता उपस्थित होत असून एक बाजू टाळण्यासाठी घेतला गेलेला दुसरा निर्णय मात्र राज्याची मोठी हानी करणारा ठरला.


बुधवारी बुडीत झालेल्या एका तरुणाच्या शोधासाठी भंडारदर्‍याचे आवर्तन बंद करण्याची वेळ येवू नये यासाठी दबावतंत्राचा वापर करुन धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची संपूर्ण तुकडीच सुगांवमध्ये बोलावण्यात आली. अजिबाबतच व्यवहार्य न ठरणारी ही कृती मोठ्या अपघाताचे कारण ठरली आणि त्यातून राज्याने अतिशय कठोर प्रशिक्षणातून तयार झालेल्या आणि राज्य राखीव पोलीस दलातून निवडलेल्या एका अधिकार्‍यासह दोघा जवानांचे बळी घेतले. हा संपूर्ण प्रकार व्यवस्थेतूनच घडला असून आपल्या हवा तसा निर्णय घेण्याचा हा प्रकार राज्याची हानी करणारा ठरला. या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज असून आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यासाठी निकषांची प्रतिपूर्ती होण्याची आवश्यकता आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 79386

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *