सुगांवजवळील मनोहरपूर बंधार्‍याच्या भंवर्‍यात आठजण बुडाले! एसडीआरएफच्या तिघांसह सहाजणांचा मृत्यू; तर, दोघा जवानांना वाचवण्यात यश..

नायक वृत्तसेवा, अकोले
बुधवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या जलाशयात प्रवाशी बोट उलटून बुडालेल्या सहाजणांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नसताना आता अहमदनगर जिल्ह्यातूनही अतिशय वेदनादायक वृत्त समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेत बुधवारी दुपारी बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) बोटं ऐन बंधार्‍याजवळील वेगवान प्रवाहातच बंद पडून उलटल्याने त्यावरील पाच जवानांसह एक स्थानिक नागरिक बुडाला. यानंतर दुसर्‍या पथकाने तत्काळ बचावकार्य सुरु केल्याने बुडालेल्या टीममधील दोघांना वाचवण्यात यश आले, मात्र दुर्दैवाने या घटनेत एसडीआरएफच्या एका अधिकार्‍यासह दोन जवानांचा मृत्यू झाला असून स्थानिक तरुणासह बुधवारी बुडालेल्या एकाचा अद्यापही शोध लागलेला नाही. या भयानक दुर्घटनेतून बचावलेल्या दोन्ही जवानांवर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली असून आपत्तीच्या वेळी जीवाची बाजी लावून मानवी जीव वाचवणार्‍यांचेच जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुधवारी (ता.22) सुगांव येथील विनायक धुमाळ या शेतकर्‍याकडे संगमनेर व सिन्नर तालुक्यातील मुरघास तयार करणार्‍या मजुरांची टोळी आली होती. दुपारी जेवणं झाल्यानंतर टोळीतील काही तरुण जवळच्याच प्रवरानदी पात्रात पोहोण्यासाठी गेले. सध्या भंडारदरा-निळवंडे धरणातून सिंचनासाठीचे उन्हाळी आवर्तन सुरु आहे. त्यामुळे दुथडी वाहणार्‍या प्रवरा नदीवरील मनोहरपूरचा दगडी बंधारा ओसंडून वाहत असून बंधार्‍याजवळील पाण्याच्या प्रचंड वेगाने भिंतीजवळ मोठा भंवरा तयार झाला आहे. दुर्दैवाने याच परिसरात आंघोळ करणार्‍या दोघा मजुरांना त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पोहत असताना दोघेही भिंतीजवळील भंवर्‍याच्या झपाट्यात आले आणि क्षणात त्यात खेचले गेले. या घटनेनंतर उर्वरीत मजुरांनी आरडाओरड केल्याने आसपासचे शेतकरी मदतीला धावले.


बुधवारी सायंकाळी बुडालेल्या दोघांमधील सागर पोपट जेडगुले (वय 25, रा.घोलवड, ता.सिन्नर, जि.नाशिक) या तरुणाचा मृतदेह हाती लागला. मात्र तो पर्यंत अंधार दाटल्याने स्थानिक पातळीवरुन सुरु असलेले शोधकार्य थांबवण्यात आले. या दरम्यान अकोल्याच्या प्रशासनाने मुंबईतील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) मुंबई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बेपत्ता असलेल्या अर्जुन रामदास जेडगुले (वय 18, रा.पेमगिरी, ता.संगमनेर) याचा शोध घेण्यासाठी त्यांची मदत मागितली. त्यानुसार प्रतिसाद दलाची संपूर्ण तुकडी मुंबईहून आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुगांवमध्ये पोहोचली. पहाटे सहा वाजता दिवस उजेडताच प्रत्येकी पाचजणांच्या दोन टीम तयार करुन बचावकार्य सुरु करण्याची योजना आखण्यात आली.


त्यानुसार पहिल्या टीममध्ये प्रतिसाद दलाचे उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली जवान राहुल गोपीचंद पावरा, वैभव सुनील वाघ, पंकज पंढरीनाथ पवार व अशोक हिम्मतराव पवार यांच्यासह सुगांव येथील गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) असे सहाजण एका यांत्रिक बोटीवर व त्यांना प्रतिसाद देण्यासाठी दुसर्‍या बोटीवर अन्य पाच जवान असे नियोजन करण्यात आले. ठरल्यानुसार पहिल्या टीमने बोटीसह थेट बंधारा जवळ केला. मात्र या ठिकाणी बंधार्‍यातून आणि भिंतीवरुनही पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने नैसर्गिकरित्या मोठा भंवरा तयार झाला आहे. त्याचा अंदाज न आल्याने पथकाची बोट बंधार्‍याजवळ येताच ती गोल फिरु लागली आणि त्यातच बोटीचे इंजीनही बंद पडल्याने ती क्षणात उलटली. त्यामुळे बोटीवरील सहाही जण पाण्यात पडले आणि भंवर्‍यात फसले. सुदैवाने त्यातील दोघांनी धडपड करीत भंवर्‍याची चक्री भेदली आणि त्याचक्षणी दुसर्‍या टीमची बोट तेथे पोहोचली, त्यामुळे पंकज पवार आणि अशोक पवार या दोघा जवानांना अत्यवस्थ स्थितीत वाचवण्यात यश आले.


मात्र या दुर्घटनेत बोटीवरील एका अधिकार्‍यासह दोन जवान आणि स्थानिक तरुण बेपत्ता झाले. सुमारे दोन तासांच्या शोधकार्यानंतर बुडालेल्या टीममधील तिघे हाती लागले, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला होता. या घटनेने एसडीआरएफच्या सदस्यांना मोठा धक्का बसला. एरव्ही सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावणार्‍या आणि कठीण स्थितीतही त्याचे जीव वाचवणार्‍या या जवानांच्या डोळ्यातून अश्रू आणि आपल्या सहकार्‍यांच्या आठवणींनी फुटलेला आक्रोश ऐकून नदीकाठावर जमलेले शेकडों नागरीकही गहिवरले होते. या दुर्घटनेत बुधवारी (ता.22) बुडालेल्या अर्जुन जेडगुलेसह आज सकाळी एसडीआरएफच्या टीमसोबत बोटीवर गेलेला गणेश देशमुख अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.


बचाव कार्यासाठी आलेली एसडीआरएफच्या पाचजणांची टीमच बुडाल्याची माहिती मिळताच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्यासह संगमनेर व अकोले तालुक्यातील प्रशासनाने सुगांवकडे धाव घेतली. या घटनेनंतर एसडीआरएफने शोधकार्य थांबवले असून प्रशासनाने निळवंडे धरणातून सोडले जाणारे आवर्तन काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतरच पुढील शोधकार्य सुरु केले जाणार आहे. या घटनेत संगमनेर, अकोले व सिन्नर तालुक्यातील प्रत्येकी एका तरुणासह एसडीआरएफच्या एका अधिकार्‍यासह दोघा जवानांचे बळी गेल्याने संगमनेर व अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


बुधवारी दुपारी बुडालेल्या दोघां तरुणांमधील अर्जुन जेडगुले या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी मुंबईहून आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद पथकातील अधिकारी प्रकाश शिंदे यांच्यासह जवान राहुल पावरा, वैभव वाघ, पंकज पवार, अशोक पवार व स्थानिक तरुण गणेश देशमुख यांची यांत्रिक बोटही मनोहपूर बंधार्‍याजवळील भंवर्‍यात पलटली. या भयानक दुर्घटनेत बोटीवरील केवळ पंकज पवार व अशोक पवार या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तर बुधवारच्या घटनेतील एकासह गणेश देशमुख याचा शोध घेण्यासाठी निळवंडे धरणातून सुरु असलेले आवर्तन काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण संगमनेर व अकोले तालुका शोकमग्न झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *