हुंड्यासाठी नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ संगमनेरातील घटना; नवरा व सासूसह आठजणांवर गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे शासनासह विविध समाजसेवी संस्थांकडून हुंड्याची अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी विविध उपययोजनांसह जनजागृतीवर भर दिला आहे. तर, दुसरीकडे समाजात आजही हुंड्यासाठी विवाहित महिलांना शारीरिक व मानसिक यातना देण्याचे प्रकार सर्रासपणे सुरुच आहेत. असाच प्रकार संगमनेरातील एका 21 वर्षीय नवविवाहितेसोबतही घडला असून अवघ्या वर्षभरापूर्वी सुखी संसाराची स्वप्नं बाळगून सासरी नांदण्यासाठी गेलेल्या विवाहितेला घर बांधण्यासाठी वडिलांकडून आठ लाख रुपये घेवून यावेत यासाठी नवर्‍यासह सासू, जाव आणि अन्य नातेवाईकांनी जवळपास वर्षभर तगादा लावताना तिला मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळही केला. अखेर वैतागलेल्या विवाहितेने याबाबत मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी सय्यदबाबा चौकात राहणार्‍या आठ जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या वर्षी 23 जानेवारी ते 14 जानेवारी या वर्षभराच्या कालावधीत घडला. या प्रकरणी उजमा शाहरुख शेख या विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सदरील महिला सासरी नांदत असताना तिचा पती शाहरुख इमाम शेख याने राहायला स्वतःचे घर नसल्याने माहेरुन वडिलांकडून 8 लाख रुपये घेवून यावेत यासाठी एकसारखा तगादा लावला व त्यासाठी आपल्या पत्नीला शारीरिक व मानसिक यातना देत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणही केली. तर तिची जाव नवशीन मोहसीन शेखने तुझ्या लग्नात माझ्या मुलांना कपडे घेतले नाहीत या कारणाने तिला शिवीगाळ व दमदाटी केली.


विवाहितेची सासू आशपाक इमाम शेखने तुझी जाव नवशीन बाहेर नोकरी करते, त्यामुळे तु तिच्या मुलांचा सांभाळ करायचा, घरातील सर्व कामही करायचे यासाठी वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच, तुझ्या लग्नात आमचा कोणाचाही योग्य मानपान केला गेला नाही, तुझ्या वडिलांनी लग्नात तुला दागदागिने दिले नाहीत असा ठपका ठेवत तिला उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. मोहसीन इमाम शेख, फिरोज इमाम शेख, सलमान इमाम शेख, शहानवाज इमाम शेख व मोहंमद जाफर इमाम शेख यांनी याबाबत कोठेही वाच्चता केल्यास अथवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास तुला व तुझ्या वडिलांना ठार मारुन टाकू अशी धमकी भरल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.


त्यावरुन शहर पोलिसांनी संबंधित विवाहितेचा पती, सासू, जाव, दीर व अन्य नातेवाईकांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. हिंदू-मुस्लिम एैक्याचेप्रतिक असलेल्या सय्यदबाबा यांच्या दर्ग्याच्या परिसरात घडलेल्या या घटनेने काही नागरीक आजही हुंड्याच्या लालसेने विवाहितांचे छळ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विवाहित महिला आपल्या वडिलांच्या घरीच राहते.

Visits: 9 Today: 1 Total: 30859

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *