पावसाळ्याचे पाणी निळवंडेच्या दोन्ही कालव्यांद्वारे आणण्याचा प्रयत्न ः थोरात सहकारमहर्षी थोरात कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेती ही व्यावसायिक पद्धतीने करताना शेतकर्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत एकरी उत्पादन क्षमता सरासरी 100 मेट्रिक टन होईल असे नियोजन करावे. याचबरोबर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दुसर्याच दिवशी निळवंडे कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली असून पुढील वर्षीच्या पावसाळ्यातील पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांद्वारे दुष्काळी भागात आणण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, दुर्गा तांबे, लक्ष्मण कुटे, इंद्रजीत थोरात, शंकर खेमनर, उपाध्यक्ष संतोष हासे, अमित पंडित, साहेबराव गडाख, आर. बी. रहाणे, अॅड. प्रदीप मालपाणी, अॅड. सुहास आहेर, गणपत सांगळे, सुभाष सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. ऑनलाइन प्रणालीद्वारे विविध सभासदांनी सहभाग घेतला.
सध्या कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी नियम पालन करणे गरजेचे आहे. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. कोरोना अद्याप संपलेला नाही, म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या. याचबरोबर संगमनेरचा सहकार अत्यंत दिशादर्शक असून सहकाराचे हे मॉडेल राज्यासाठी आदर्श ठरले आहे. संगमनेर तालुक्यातील रचनात्मक काम, सुसंस्कृत राजकारण, ग्रामीण विकास याचबरोबर येथील सहकारी संस्था या सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे. कारखान्याने एकरकमी एफआरपी देताना उच्चांकी भाव दिला आहे. नव्या 5 हजार 500 मेट्रिक टन कारखान्याचा हा पाचवा हंगाम असून यावर्षी वीज निर्मितीतून 50 कोटी पेक्षा जास्त उत्पादन मिळाले आहे. आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीत ऊस उत्पादन करताना एकरी उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी विशेष यंत्रणा वाढवा. यामुळे वाहतूक खर्च कमी होणार असून कारखान्याला फायदा होणार आहे आणि त्याचा सरळ फायदा ऊस उत्पादक व सभासदांना मिळणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने मागील हंगामात 13 लाख 19 हजार मेट्रिक टनाचे गाळप केले व 13 लाख 36 हजार क्विंटल साखर उत्पादन केले. अडचणींमध्ये अत्यंत चांगले निर्णय घेत कारखान्याने काम केले आहे. एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कार्यक्षेत्रातील 97 ऊस प्लॉटची निवड करण्यात आली असून या माध्यमातून ठिबक बरोबर जास्तीत जास्त नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी मोहन करंजकर, रामनाथ कुर्हे, भास्कर शेरमाळे, संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीननाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपत गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, मंदा वाघ, मीरा वर्पे, रामदास वाघ, संभाजी वाकचौरे आदी उपस्थित होते. नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.