आता राष्ट्रपती भवन राजकीय आखाडा झाले का? ः विखे कृषी विधेयकांवरुन काँग्रेससह विरोधकांवर सोडले टीकास्त्र
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटायला गेले तर महाराष्ट्राचे राजभवन हे राजकीय आखाडा होते, अशा प्रकारची टीका होते. परंतु, टीका करणारी हीच मंडळी आता राष्ट्रपतींना जाऊन भेटतात. म्हणजे राष्ट्रपती भवन राजकीय आखाडा झाला का? असा सवाल भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधकांना विचारला आहे.
संगमनेरमध्ये आज (शुक्रवार ता.11) कार्यक्रमामानिमित्त आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, कृषीविषयक विधेयक यूपीए सरकारच्या काळात आणले गेले. त्याचे समर्थन तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी करायला लावले होते. आता केंद्र सरकार चर्चेला तयारही आहे. सरकारची सकारात्मक भूमिका असताना सुद्धा हे आंदोलन करून आपले राजकीय फलित साध्य करण्याची भूमिका काही मंडळींनी घेतली आहे. यावरुन त्यांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचा त्यांना आता सोईस्करपणे विसर पडला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याचबरोबर राष्ट्रीय पक्ष असणार्या काँग्रेसला आपल्या भूमिकेचा विसर पडत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे नेतृत्व किती कमकुवत झाले आहे याचे वाईट वाटते अशी कोपरखळीही लगावली. एकेकाळी देशाचे नेतृत्व करणारा पक्ष किती अधोगतीला गेला हे त्याचेच द्योतक असल्याचे अधोरेखित करुन हे पाहिल्यानंतर कोणत्याही सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुःख होईल. यावरुन मूळ काँग्रेस पक्षाला सध्या आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.