सह्याद्री पर्वतरांगेतील टाहाकारीची शिल्पसम्राज्ञी ‘जगदंबा’ देवी! कातळ शिल्पाकरिता विख्यात तशीच भाविकांचे श्रद्धास्थान म्हणूनही बहुचर्चित
डॉ.सुनील शिंदे, अकोले
सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील आढळा नदीतिरावरील अकोले तालुक्यातील टाहाकारी येथील निसर्गरम्य परिसरात जगदंबा देवीचे प्राचिन मंदीर सुप्रसिद्ध आहे. देखण्या, सुबक, आकर्षक कातळ शिल्पकलेचा सुंदर नमुना येथील देवस्थानात अनुभवयास मिळतो. श्रीराम सीतेच्या शोधात भटकंती करत असताना पार्वती माता त्यांची परीक्षा घेते (आणि अंतर्धान होऊन जगदंबा रुपात प्रकटली) अशी आख्यायिका या देवालयाशी जोडलेली आहे. यंदा कोरोना महामारीचे संकट असल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी असली तरी भाविकांची देवीवरील श्रद्धा मात्र तसूभरही कमी झालेली नाही. दूरवरुन दर्शन घेत आपला भाविक आपला भाव प्रकट करतात. एरव्ही नवरात्रौत्सवानिमित्त देवस्थान गजबजून गेल्याचे दिसते. मात्र यावर्षी हे चित्र पहावयास मिळत नाही.
पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावलेल्या आढळा नदीकाठावर किल्ल्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर टाहाकारी गाव आहे. येथील देवालयाची निर्मिती यादववंशीय राजांनी बाराव्या शतकात केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येते. या मंदिराभोवती उत्तम उंच तटबंदी असून, उत्तराभिमुख अर्थात आढळा नदीकडे देवालयाचे तोंड आहे. वेगवेगळ्या शिल्प साजात शिव-पार्वती, गणपतीच्या मूर्ती येथे आढळतात. एकूण 72 खांबांवर देवालयाचे छत तोलले गेलेले आहे. मुख्य गाभार्याच्या प्रवेशद्वारावर अप्रतिम नक्षीकाम आहे. तर गाभार्यात देवीचा तांदळा आणि जगदंबेची 18 भूजा असलेली (व्याघ्रावर आरुढ महिषासूरमर्दिनीच्या अवतारात) काष्ठ मूर्ती आहे.
मुख्य मूर्तीसह महालक्ष्मी व भद्रकाली (महाकाली) देवीच्या आकर्षक मूर्तीही आढळतात. अगदी चामुंडा, शंकर, गण ब्रह्मा-विष्ण-महेश यांची रुपेही कोरलेली आहेत. जगदंबा मंदिराला प्राचिन काळी उंच कळस होता असे सांगण्यात येते. मंदिराच्या बाजूस असलेली खजुराहो सारखी कोरलेली कातळ शिल्पे जणू भाविकांनी षड्रिपू (सहा विकार) बाहेर विसर्जित करुनच विशुद्ध भावनेने देवी जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी यावे असाच सूचक इशारा करतात असे वाटते.
विशेषतः टाहाकारी आणि पट्टाकिल्ला (विश्राम गड) यासंदर्भात दोन मोलाचे दुवे देखील सांगितले जातात. पहिला दुवा पौराणिक असून, प्रभू श्रीरामचंद्र सीता शोधार्थ दंडकारण्यात फिरत असताना महाबलशाली जटायूने जखमी स्थितीत ‘टाहो’ फोडला म्हणून या गावास ‘टाहोकारी’ (टाहाकारी) असे नाव मिळाल्याची आख्यायिका आहे. दुसरा दुवा ऐतिहासिक असून छत्रपती शिवराय पट्टाकिल्ला (विश्रामगड) येथे विश्रांती घेत असताना जेवढा कालावधी रहिवासले होते; तेव्हा नियमित जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येत अशीही लोककथा आहे. छत्रपती पट्टा किल्ल्यावर विश्रांतीस होते म्हणून ‘विश्रामगड’ असा उल्लेख आहे. मात्र, टाहाकारी निवासिनी ही जगदंबा जशी शिल्पकला, अप्रतिम कातळशिल्पाकरिता विख्यात आहे, तशीच भाविकांचे अपार श्रद्धास्थान म्हणून बहुचर्चित आहे. सह्याद्रीच्या गिरीशिखरांच्या संपन्न कोंदणातील हा एक देखणा शिल्पकलेचा ऐवज असून हजारो भाविक आणि पर्यटक दरवर्षी येथे हजेरी लावतात. मात्र, यावर्षी कोरोनाने यावर विरजण पडले आहे.