सोनसाखळी चोरांचे पोलिसांसोबत संगनमत? प्रवाशांचा आरोप; पुन्हा साडेपाच तोळ्याचे गंठण लांबवले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरकर महिलांसह प्रवासानिमित्त बसस्थानकात येणार्‍या महिलांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे वारंवार समोर येत असताना शनिवारी त्यात आणखी एका मोठ्या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेत मूळच्या ठाणे येथील रहिवाशी 53 वर्षीय महिला बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर हात साफ करुन तब्बल साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण गायब केले. धक्कादायक म्हणजे बाजारात सोन्याच्या भावाने उच्चांक गाठलेला असताना पोलिसांनी मात्र अवघ्या 6 हजार 900 रुपये प्रतितोळा या दराने त्याची किंमत गृहीत धरुन आपली लक्तरे वाचवण्याची धडपड केल्याचेही दिसून आले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी पोलिसांचे चोरट्यांशी संगनमत असल्यानेच वारंवार अशा घटना घडूनही त्यांचा शोध लागत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शनिवारी (ता.4) दुपारी साडेतीनच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात घडली. मूळच्या ठाणे येथील रहिवाशी असलेल्या शांता मारुती साबळे (वय 53) या ठाण्याकडे जाणार्‍या बसची प्रतिक्षा करीत फलाटावर उभ्या होत्या. कदाचित संगमनेरातील सोनसाखळी चोरांबाबत त्यांना पूर्वकल्पना असल्याने त्यांनी फलाटावर येण्यापूर्वीच आपल्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे गंठण काढून ते आपल्या पर्समध्ये ठेवले होते. काही वेळाच्या प्रतिक्षेनंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास ठाण्याकडे जाणारी बस आल्यानंतर गर्दीतून वाट काढीत त्यांनी बसमध्ये प्रवेश केला.


सीटवर बसल्यानंतर गळ्यात अडकवलेली पर्स जेव्हा त्यांनी समोर घेतली तेव्हा पर्सची चेन उघडी असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी लागलीच त्यात ठेवलेले आपले सोन्याचे गंठण तपासले असता त्यातून ते गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचे गंठण चोरीला गेल्याने त्या महिलेला अश्रू अनावर झाले. हे चित्र पाहून तेथे जमलेल्या प्रवाशांनी पोलिसांच्या नावाने बोटं मोडीत चोरट्यांशी त्यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी केला.


दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तक्रार प्रत्यक्षात रात्री दहाच्या सुमारास दाखल करण्यात आली आणि आपली लक्तरे वेशीवर येवू नयेत यासाठी ही गोष्ट माध्यमांपासून दडवूनही ठेवण्यात आली. या प्रकरणी शांता साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात 38 हजार रुपये सरकारी मूल्याचे साडेपाच तोळे वजनाचे गंठण लांबविल्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास हवालदार जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. या घटनेनंतर बसस्थानकातील प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याचेही बघायला मिळाले.


तत्कालीन पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी शहरात सातत्याने घडणार्‍या गंठणचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अशा घटनांचा सखोल अभ्यास, गुन्हेगारांची ओळख आणि तांत्रिक विश्‍लेषण करुन वडाळा महादेव (ता.श्रीरामपूर) येथील खंग्या उर्फ विनोद या कुख्यात चोरट्याची टोळी जेरबंद केली होती. त्यानंतर दीर्घकाळ शहरातील अशा घटनांना पायबंद बसला होता. मात्र गेल्याकाही महिन्यांत शहरातील रहदारीचे रस्ते सोडून उपनगरांसह संगमनेर बसस्थानकात सातत्याने अशा घटना घडू लागल्याने पोलीस आणि चोरट्यांच्या संगनमताबाबत प्रवाशांनी केलेल्या आरोपांना बळ मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *