महिलांच्या दागिन्यांवर संगमनेरात पुन्हा दरोडा! चोरट्यांची सर्वत्र पाळत; आता तीन तोळ्यांचे गंठण लांबवले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भ्रष्टाचार, तडजोडी, निष्क्रियता आणि बाहेरख्याली अशा वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत येत असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित सध्या चोरट्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. मनाला वाटेल ते घर फोडा, लोकांचे मोबाईल, महिलांचे दागिने लांबवा आणि विना अडथळा शहरातून पसार व्हा अशा भयानक अवस्थेमुळे शहरातील रस्त्यारस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून एकटी महिला दिसली की तिच्या गळ्यातील दागिन्यांवर हमखास दरोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा भयग्रस्त वातावरणात भर घालणारी आणखी एक घटना समोर आली असून गुरुवारी रात्री गुंजाळवाडी रस्त्यावरुन घराकडे जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण लांबवण्यात आले आहे. या घटनेने केवळ शहरातील महिलाच नव्हेतर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षाच धोक्यात आली आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंठण लांबवण्याचा हा प्रकार गुरुवारी (ता.2) रात्री आठच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयासमोरुन गुंजाळवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर घडला. या परिसरातील शारदा बेकरीच्या पाठीमागील वसाहतीत राहणार्‍या अंजना बाबासाहेब वर्पे या रात्री आठच्या सुमारास गुंजाळवाडी रस्त्याने आपल्या घराकडे जात असताना समोरुन एका दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यावेळी रस्त्यावर अन्य कोणीही नव्हते. त्यामुळे दुचाकीवरील चोरट्यांनी समोरुन येणार्‍या महिलेला एकटे पाहून आपली दुचाकी हळूहळू त्यांच्या दिशेने नेत पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्या महिलेला काही समजण्याच्या आंतच त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण ओरबाडले.

अवघ्या काही क्षणात घडलेल्या या प्रकाराने गोंधळलेल्या महिलेला सुरुवातीला काहीच उमजले नाही. मात्र दुचाकीवरील दोन्ही चोरटे तेथून सुसाट निघाल्यानंतर आपल्या गळ्यातील सोन्याचे गंठण गायब झाल्याची जाणीव होताच त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्यावेळी वसाहतीतले बहुतेक रहिवाशी सायंकाळचे जेवण करुन घरात निवांत होते. सदर महिलेचा आवाज ऐकून काही जणांनी घराबाहेर धाव घेतली, मात्र तोपर्यंत बराच उशिर झालेला होता. सदरील महिलेच्या गळ्यातील गंठण लांबवणारे दोन्ही चोरटे पळून जाताना काही सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही कैद झालेले आहेत, मात्र त्यांचे चेहरे झाकलेले असल्याने यापूर्वीच्या घटनांप्रमाणे या प्रकरणाचा तपासही गुलदस्त्यातच राहण्याची अधिक शक्यता आहे.


घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यास आपले चोरीला गेलेले दागिने परत मिळतील या भाबड्या आशेने मध्यरात्रीच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आपली कैफियत मांडली. नेहमीप्रमाणे हजर ठाणे अंमलदाराने तक्रारीचे सोपस्कार उरकून 20 हजार प्रतितोळा दराने 60 हजार रुपये सरकारी मूल्य असलेले तीन तोळे वजनाचे मिनी गंठण चोरुन नेणार्‍या दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु करीत असल्याचे ‘त्या’ महिलेला सांगत तिच्या मनातील ‘सापडतील’ हा विश्‍वास जीवंत ठेवला. मात्र वास्तवात यापूर्वी अशा अनेक महिलांचे दागिने लंपास होवून वर्षे लोटूनही त्यांना अद्यापही आपल्या दागिन्यांची प्रतिक्षा आहे, याची त्या महिलेला कोणतीही कल्पना नसल्याचे दिसून आले.


गेल्या काही महिन्यांत शहरातून हद्दपार झालेल्या गंठण चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी मोठा गाजावाजा करीत संगमनेर बसस्थानकावर बंदोबस्त तैनात केल्याचा बडेजाव मारला होता. मात्र काही महिन्यांतच तेथील परिस्थितीही पूर्वपदावर आली असून जवळजवळ दररोज महिलांचे दागिने, पैसे, प्रवाशांच्या खिशातील पैशांचे पाकिटं लांबवण्याच्या घटना घडत आहेत. तशीच अवस्था शहरातील प्रत्येक रस्त्यावरही निर्माण झाली असून गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र अथवा दागिने घालून एखादी महिला निघाली तर ती दागिन्यांसह पुन्हा घरात येण्याची शक्यता घटली आहे.


शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकावर दोनवेळा चुकलेला एसीबीचा ट्रॅप, अवैध व बेकायदा उद्योगांना मिळणारे प्रोत्साहन, त्यातून वाढीस लागलेली गुन्हेगारी, एकामागून एक दाखल होणारे गुन्हे, मात्र त्यांचे शून्य तपास, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यावरच महिलांकडून झालेले गंभीर आरोप, त्यातून डागाळलेली पोलिसांची प्रतिमा अशा एक ना अनेक कारणांनी संगमनेर पोलीस ठाण्याची अक्षरशः रया गेली असून ही वास्तू केवळ तडजोडी करण्याचे ठिकाण म्हणून आता समोर येवू लागली आहे. त्यामुळे शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून भररस्त्यात महिलांना लुटून चोरटे विनासायस पसार होण्यात लिलया यशस्वी ठरत आहेत.

Visits: 403 Today: 2 Total: 1583377

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *