धाकच संपला! आतातर चक्क पोलीस ठाण्याजवळीलच घर फोडले कुलुप तोडून तीनतोळे गायब; संगमनेरातील कोष्टी गल्लीत घडली घटना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचा कळस गाठलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितून धक्कादायक घटना समोर आली असून त्यातून शहर पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाकच संपल्याचेही स्पष्ट झाले आहे. या घटनेत अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या सतीष गोडसे या अगदी पोलीस ठाण्याच्या जवळच राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकाचे भरदिवसा घर फोडून तीन तोळे वजनाचे दागिने लांबविण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी शेजारी राहणार्‍यांची नजर ‘त्या’ घराच्या दारावर पडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी रात्री उशिराने अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या कक्षापासून अवघ्या 30 सेकंदाच्या पायी अंतरावर घडलेला हा प्रकार शहर पोलिसांचे वाभाडे काढणारा ठरला असून आतातर चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गुरुवारी (ता.2) सकाळी सहा ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दिवसा घडला. पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच असलेल्या कोष्टी गल्लीत राहणारे सतीष मुरलीधर गोडसे गुरुवारी आपल्या पत्नीसह पुण्यात सख्ख्या भावाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. त्याच दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहणार्‍या मोहन मंडलिक यांनी त्यांना फोन करुन तुमच्या घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात इसमाने तोडले असून उघड्या असलेल्या दाराला आपण बाहेरुन कडी लावल्याची माहिती त्यांना दिली. त्यावर गोडसे यांनी आपण भावाची उत्तरिय क्रिया पूर्ण करुन शुक्रवारी येणार असल्याने घराला कुलुप लावण्याची त्यांना विनंती केली.


शुक्रवारी (ता.3) पुण्यातील विधीकार्य उरकून गोडसे संगमनेरात आले असता त्यांना घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी लाकडी कपाटातील दागिन्यांचा शोध घेतला असता ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी आपला कार्यभाग साधल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी शहर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाला भेट देत नेहमीप्रमाणे आपले सोपस्कार पूर्ण केले. याबाबत रात्री उशिराने सतीश गोडसे यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.


त्यानुसार त्यांनी लाकडी कपाटात ठेवलेल्या 11 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, तीन ग्रॅम वजनाच्या रिंगा, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन झुबे व 12 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण अशा एकूण 2 तोळे 9 ग्रॅम वजनाचे आणि 72 हजार 500 रुपये सरकारी किंमत असलेले दागिने अज्ञात इसमाने घराचे कुलुप तोडून चोरुन नेले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास हवालदार अशोक पारधी यांच्याकडे सोपवला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच असलेल्या कोष्टी गल्लीत घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक असून पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाकच संपल्याचे स्पष्ट करणारा आहे.


मागील काही महिन्यांत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित चोर्‍या, घरफोड्या व महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत आहे. मात्र यातील एकाही घटनेचा छडा लावण्यात पोलीस सातत्याने अपयशीच ठरत असल्याने चोरट्यांचे पोलिसांशी साटेलोटे तर नाही? अशाही शंका नागरिकांच्या मनात निर्माण होवू लागल्या आहेत. त्यातच गुरुवारी भरदुपारी चक्क शहर पोलीस निरीक्षकांच्या दालनापासून अवघ्या 30 सेकंदाच्या अंतरावर चोरीचा प्रकार घडल्याने पोलिसांच्या निष्क्रियतेत आणखी एका खळबळजनक प्रकाराची नोंद झाली आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच घडलेल्या या घटनेतून चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे दिसून येते. धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी चोरीची ही घटना घडली त्याच्या जवळच मटक्याची पेढी आहे. याचाच अर्थ पोलिसांच्या पंखाखालीच शहरातील गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांची भरभराट होत असून सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेत मटका खेळण्यासाठी आलेल्या एखाद्या जुगार्‍याचा तर हात नाही अशीही शंका या निमित्ताने परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *