विवाहितेच्या खून प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी मिर्झापूरमधील घटना; आत्महत्येचा रचला होता बनाव..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ट्रॅक्टरची अवजारे घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेवून यावेत यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ व गेल्या 26 एप्रिलरोजी बेदम मारहाण करुन थेट विवाहितेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी मयत विवाहितेची सासू आणि नवरा यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना बुधवारी रात्री अटक केली होती, गुरुवारी न्यायालयाने त्या दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.


गेल्या शुक्रवारी (ता.26) तालुक्यातील मिर्झापूर येथील सायली अविनाश वलवे (वय 23) या तरुणीने घरातच खिडकीच्या चौकटीला ओढणीने गळफास बांधून आत्महत्या केल्याची खबर मयतेची सासू सुभद्रा निवृत्ती वलवेने तालुका पोलिसांना दिली होती. मात्र खिडकीला गळफास बांधणे आणि आत्महत्या करणे ही गोष्टच पचनी पडत नसल्याने या प्रकरणात सुरुवातीपासूनच संशय निर्माण झाला होता. त्यामुळे मयतेच्या वडिलांनी लोणी अथवा छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदनाची मागणी केली होती. त्यानुसार प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाने मयत सायली वलवेचे शवविच्छेदन केले होते.


त्याचा अहवाल बुधवारी (ता.1) सायंकाळी उशिराने प्राप्त झाला. त्यात मृत्यूपूर्वी सायली वलवेला बेदम मारहाण झाल्याचे व त्यामुळे डोक्यात अंतर्गत जखमा होवून मेंदूत रक्तस्राव झाल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे मयतेच्या सारकडील लोकांनी आत्महत्येचा बनाव रचल्याचेही या अहवालाने सिद्ध केले व सायलीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा स्पष्ट निष्कर्षही समोर आला. याचा अर्थ बेदम मारहाणीत खून झालेल्या सायलीला मृत्यूनंतर फास बांधून तिची आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न झाल्याचेही ठळकपणे दिसून आले. त्यामुळे अहवाल प्राप्त होताच तालुका पोलिसांनी पूर्वीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात खुनाचे कलम लावून आधीच अटकेत असलेल्या अविनाश (नवरा) व सुभद्रा निवृत्ती वलवे (सासू) या दोघांना गुरुवारी (ता.2) पुन्हा न्यायालयासमोर हजर केले.


यावेळी सरकारी पक्षाने आरोपींनी आत्महत्येचा बनाव निर्माण करुन खून दडपण्याचा प्रकार केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. हा संपूर्ण प्रकार सुनियोजित कारस्थानाचा प्रकार असल्याचा व त्याचा शोध घेण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद केला. यावेळी बचावपक्षाने दोन्ही आरोपींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यापूर्वीच चार दिवसांची कोठडी सुनावल्याचा मुद्दा पुढे करुन त्यांच्या पोलीस कोठडीला विरोध केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळतांना दोन्ही आरोपींना शनिवारपर्यंत (ता.4) पोलीस कोठडीत पाठवले आहे. त्यांच्या तपासातून या खुनाचे रहस्य उलगडणार असून आणखी कोणी या कृत्यात सहभागी आहे का? याचाही शोध घेतला जाणार आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 114872

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *