आदिवासींच्या भाजी-भाकरीला हात लावू नका ः पिचड
आदिवासींच्या भाजी-भाकरीला हात लावू नका ः पिचड
नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी वयाच्या 80व्या वर्षीही रस्त्यावर आहे आणि पुढेही राहील. धनगर आरक्षणावर वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांना पुरणपोळी द्या; पण आमच्या गरीब आदिवासींच्या भाजी-भाकरीला हात लावू नका, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.

घोरपडा देवी मंदिर, रंधा (ता.अकोले) येथे आयोजित कार्यक्रमात पिचड बोलत होते. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार वैभव पिचड, भारत घाणे, सरपंच पांडुरंग खाडे, विजय भांगरे, सुनील सारुक्ते, सुरेश गभाले आदी उपस्थित होते. सुरुवातीला माजी मंत्री मधुकर पिचड व हेमलता पिचड यांच्या हस्ते घोरपडा देवीचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना पिचड म्हणाले, धनगर आदिवासी आहेत का, याची ‘टाटा’ समितीमार्फत तपासणी करण्यात आली. त्यावेळी मी स्वतः समितीला सामोरे गेलो. विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर मी आदिवासी नाही, अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. महादेव कोळी नव्हे, तर कोळी महादेव आदिवासी असल्याचा युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयात वाद गेल्यावर न्यायालयानेच मी आदिवासी असल्याचे सांगितले. ‘टाटा’ समितीने दिलेला अहवाल जाहीर करावा व आदिवासींचा आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यास आमची हरकत नाही, असे पिचड शेवटी म्हणाले.

