चौथ्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध शिर्डी-नगरचाही समावेश; शिर्डीत सतरा लाख मतदारांची नोंद..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी होणार्या निवडणूक प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावल्यानंतर आज (ता.18) जिल्ह्यातील दोन्ही जागांसह चौथ्या टप्प्यात होत असलेल्या राज्यातील एकूण 11 आणि देशभरातील 96 जागांसाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी उडणार असून लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदार संघात 13 मे रोजी मतदान होणार असून आजपासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
शुक्रवारी (ता.19) राज्यातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व चंद्रपूर या पाच मतदार संघांसह देशभरातील 21 राज्यातील 102 जागांसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. तर, 13 मे रोजी होणार्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीची आज (ता.18) अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यात राज्यातील शिर्डी, अहमदनगरसह नंदूरबार, जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर व बीड या 11 मतदार संघांसह 10 राज्यातील 96 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आजपासून गुरुवार 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 26 एप्रिलरोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. सोमवार 29 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येतील तर 13 मे रोजी मतदान पक्रिया राबवली जाईल. इच्छुकांसाठी उमेदवारी अर्जाची किंमत शंभर रुपये असून खुल्या मतदार संघासाठी 25 हजार रुपये तर राखीव मतदार संघासाठी 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
लोकसभेच्या शिर्डी मतदार संघाची एकूण लोकसंख्या 2011 सालच्या जनगणनेनुसार 20 लाख 48 हजार 155 इतकी असून नैसर्गिक वाढीच्या तत्त्वांनुसार 2024 च्या निवडणुकीसाठी ती 21 लाख 94 हजार 552 इतकी गृहीत धरण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत सरासरी 64.54 टक्के मतदान झालेल्या शिर्डीत यंदा (31 मार्च अखेर) 16 लाख 70 हजार 145 मतदारांची नोंद झाली असून त्यात 8 लाख 60 हजार 914 पुरुष, 8 लाख 9 हजार 153 महिला तर 78 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.
शिर्डी मतदार संघात यावेळी 80 पेक्षा अधिक वय असलेल्या 25 हजार 543, वयाची शंभरी ओलांडणार्या 700 मतदारांसह नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या 2 हजार 722 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. येत्या 25 एप्रिलपर्यंत राहिलेल्या नवमतदारांना आपल्या नावाची नोंद करण्याची संधीही देण्यात आली आहे. शिर्डीत यंदा तिरंगी लढत होण्याचा अंदाज असून काँग्रेसच्या महिला नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी वंचित आघाडीत प्रवेश केल्याने शिर्डीची रंगत वाढणार आहे. तर नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासमोर पारनेरचे माजी आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी चिन्ह घेवून उभे ठाकले आहेत.