संगमनेरच्या पठारावरील अल्पवयीन मुली असुरक्षित! तिघांनी छेड काढली; 26 जणांनी आई-वडीलांसह काकांनाही बेदम मारले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रस्त्याने पायी जाणार्या अल्पवयीन मुलीला फरफटत नेवून अत्याचार आणि त्यानंतर पीडितेने आत्महत्या केल्याच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला असताना आता त्याच भागातून पुन्हा एकदा अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत आपल्या आईसह घराकडे जाणार्या सतरा वर्षीय मुलीचा भररस्त्यात हात पकडून तिघांनी विनयभंग केला. तिघा टवाळखोरांच्या या कृत्याला विरोध करणार्या पीडितेच्या काकालाही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर सायंकाळी प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने पीडितेच्या वडीलांना बोलावण्यात आले. मात्र त्यावेळीही शिरजोर झालेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी सुरुवातीला दगडफेक आणि नंतर पीडितेच्या घरात घुसून तिच्या आई-वडीलांसह काकांनाही लोखंडी गज, कुळवाचा फास आणि दगडांनी मारहाण करीत अक्षरशः रक्तबंबाळ केले. या प्रकरणी पीडितेच्या वडीलांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मयूर, आदेश व आदिनाथ अशोक वामन या तिघा सख्ख्या भावांसह त्यांच्या 26 नातेवाईकांवर हत्यारांचा वापर करुन गंभीर दुखापत करणे, विनयभंग, बेकायदा जमाव जमवून दंगल माजवण्यासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्यातील (पोक्सो) तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेने पठारभागातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून कायदा व सुव्यस्थेचे बारा वाजल्याचे ठळकपणे समोर आले आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गुरुवारी (ता.18) सायंकाळी चार व त्यानंतर सव्वा सहाच्या सुमारास हिवरगाव पठार परिसरात घडला. याप्रकरणी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पीडित सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपले आई-वडील, आजी व भावासह गणपीर बाबांच्या यात्रेसाठी केकान वस्ती परिसरात भरलेल्या यात्रेसाठी आले होते. दुपारी चारच्या सुमारास पिण्याचे पाणी भरण्यासाठी पीडित मुलगी आपल्या आईसह यात्रेतून आपल्या घराकडे जाण्यासाठी पायी निघाली. सव्वाचारच्या सुमारास हिवरगाव पठारभागातील कौठशेत परिसरात त्या दोघी आल्या असता पाठीमागून पल्सर मोटार सायकलवर (क्र.एम.एच.17/सी.वाय.030) आलेल्या मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन व आदिनाथ अशोक वामन या तिघा सख्ख्या भावांनी पीडितेचा हात धरुन तिला ओढले.
यावेळी तेथे पोहोचलेल्या पीडितेच्या काकाने तेथे जमलेल्या योगेश सखाराम उगले, तुकाराम लक्ष्मण कारंडे व भाऊ अनाजी वामन यांच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता त्या सर्वांनी शिरजोर होवून पीडितेच्या काकालाच शिवीगाळ व धमक्या देत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी योगेश उगले याने वाहनाच्या चावीला लावलेला छोटा चाकू काढून त्यांच्या डाव्या कुशीवर वार केला, त्यात ते जखमी झाल्याने त्यांनी फोन करुन आपला भाऊ आणि पीडित मुलीच्या वडीलांना घडला प्रकार सांगत बोलावून घेतले. यावेळी तेथे पोहोचलेल्या पीडितेच्या वडीलांनी तिघा टवाळखोरातील एकाला काठीने मारहाण केली व नंतर सामोपचाराने चर्चा करुन पुन्हा असा प्रकार घडणार नाही असा शब्द घेत प्रकरण मिटवले.
त्यानंतर पीडितेचे कुटुंब आपल्या घरात असताना सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सुमनबाई सखाराम उगले हिने पीडितेच्या वडीलांना फोन करुन प्रकरण मिटवण्यासाठी त्यांना घराच्या पाठीमागील मोकळ्या रानावर येण्यास सांगितले. त्यानुसार ते तेथे गेले असता सुमनबाईसह तिचा मुलगा योगेशही तेथे हजर होता. पीडितेच्या वडीलांसोबतही गावातील काही मंडळी चर्चेसाठी माळावर गेली होती. यावेळी घडल्या प्रकाराबाबत चर्चा सुरु असताना त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्या दरम्यान सुमनबाई उगलेने फोन करुन आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानुसार काही वेळातच 50 ते 60 जणांच्या जमावाने तेथे धाव घेत पीडितेच्या वडीलांसह त्यांच्यासोबत असलेल्या लोकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली, त्यामुळे ते सर्वजण तेथून आपापल्या घराकडे निघून गेले.
मात्र जमावातील तुकाराम लक्ष्मण कारंडे (रा.दरेवाडी) व योगेश सखाराम उगले (रा.शेंडेवाडी) हे दोघे हातात लोखंडी गज आणि कुळव्याचा लोखंडी फास घेवून पीडित मुलीच्या वडीलांच्या पाठोपाठ आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात, पाठीवर आणि हातावर त्याचे घाव घालीत त्यांना रक्तबंबाळ केले. हा प्रकार सुरु असताना पीडितेची आई आपल्या पतीला वाचवण्यासाठी धावली. मात्र त्या दोघा नराधमांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला आणि या गदारोळात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि 20 हजार रुपयांचे पाकिटही ओरबाडून घेतले. यावेळी त्या दोघांना पाठबळ देण्यासाठी आणि पीडितेच्या संपूर्ण कुटुंबावरच हल्ला करण्यासाठी जवळपास 20 ते 25 जण हातात गज, काठ्या व दगडं घेवून धावले व त्यांनीही त्यांच्यावर हल्ला केला.
या संतापजनक घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडितेच्या वडीलांनी आज पहाटे दोनच्या सुमारास रुग्णालयात दिलेल्या जवाबावरुन घारगाव पोलिसांनी मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन, आदिनाथ अशोक वामन, योगेश सखाराम उगले, तुकाराम लक्ष्मण कारंडे, भाऊ अनाजी वामन, सुमनबाई सखाराम उगले, अशोक लहानु वामन, पप्पू अशोक वामन, संदेश वसंत वामन, गणेश जयवंत वामन, सार्थक बाळू वामन, प्रणव शिवाजी वामन, दीपक शंकर दूबेे, पप्पू छबू काळे, रामचंद्र साहेबराव काळे, वसंत अनाजी वामन, शिवाजी अनाजी वामन, जयवंत अनाजी वामन, लहानु नाथाभाऊ वामन, अनाजी नाथाभाऊ वामन, बाबू शंकर दूबे, अमित अशोक वामन, राहुल कारंडे (सर्व रा.शेंडेवाडी), बबलु बाळासाहेब शेंडगे (रा.बिरेवाडी) व सचिन गजानन चितळकर (रा.साकूर) अशा 26 जणांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 326, 324, 327, 354, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यातील पप्पू छबू काळे याला ताब्यात घेतले आहे.
अतिशय वादग्रस्त आणि हप्तेखोरीने बजबजलेली कारकीर्द असलेल्या घारगावच्या पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या कारकीर्दीत संगमनेरचा पठारभाग गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनला असून घारगाव पोलीस ठाण्याची ओळख सामान्यांच्या पिळवणूकीचे केंद्र म्हणून समजली जावू लागली आहे. एकामागून एक अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची प्रकरणं, भररस्त्यात मुलींना गाठून त्यांचा विनयभंग, अत्याचार यासोबतच अवैध धंदे, चोर्या, घरफोड्या, हाणामार्या, खून या सारखी प्रकरणं घडूनही त्यांना प्रत्येकवेळी अभय दिले जात असल्याने घारगावच्या निरीक्षकांना गृहमंत्र्यांचेच तर पाठबळ नाही ना? अशाही शंका आता उपस्थित केल्या जात असून या निष्क्रिय अधिकार्याची येथून तत्काळ उचलबांगडी करावी अशी जोरदार मागणी आता समोर येवू लागली आहे.
निष्क्रिय पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच घारगाव पोलीस ठाण्याची हद्द गुन्हेगार आणि टवाळखोरांसाठी नंदनवन ठरली आहे. जो पर्यंत खेडकर घारगावला आहेत तो पर्यंत पैसे देवून काहीही करा अशी स्थिती निर्माण झाल्याने पठारावरील सर्वच प्रकारची गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांची प्रचंड वाढ झाली असून सर्वसामान्यांसह महिला व अल्पवयीन मुलींसाठी पठारभाग धोक्याचा वाटू लागला आहे. नागरी उद्रेक होवून त्यातून पोलिसांची लक्तरं वेशीवर लटकण्यापूर्वीच पोलीस अधीक्षकांनी घारगावच्या पोलीस निरीक्षकांकडे गांभीर्याने पाहून त्यांच्या बदली अर्जाच्या विनंती ऐवजी उचलबांगडी करण्याची गरज आहे, अन्यथा सामान्यांच्या दृष्टीत पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील अंतर संपुष्टात येण्याची शक्यता आहे.