वाहन चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद
वाहन चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद
नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगरसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत चारचाकी, दुचाकी वाहनांची चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीकडून तब्बल 25 लाख 5 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
अहमदनगरजवळील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन चोरीला गेले होते. ही घटना 23 नोव्हेंबर, 2019 ला घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाहनचोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप पवार यांच्या पथकाला या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना पवार यांना माहिती मिळाली की, आरोपी हर्षद भगवान गंगतिरे (वय 28, रा.चंदनझीरे, जि.जालना) हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने राज्यात विविध जिल्ह्यांतून चारचाकी व दुचाकींची चोरी करतो. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत हर्षद गंगतिरे याला पकडले. तसेच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात आरोपी दिनेश राधाकिसन काठोटे (रा. हनुमान घाट, जालना) व संतोष नामदेव सानप (रा. गुंजाळवाडी, जि. बुलढाणा) यांनी साथ दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दिनेश कठोटे व संतोष सानप या दोघांनाही पकडले आहे.
आरोपींकडील कार, दुचाकींसह एकूण 25 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज गोसावी, संदीप पवार, संतोष लोंढे, सचिन आडबल, दीपक शिंदे, दत्ता गव्हाणे, प्रकाश वाघ, विनोद मासाळकर, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.