परतीच्या पावसाने राहाता तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान
परतीच्या पावसाने राहाता तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान
दिवाळीला बाजारपेठेत शुकशुकाट जाणवण्याची व्यापार्यांकडून भीती
नायक वृत्तसेवा, राहाता
एकीकडे कोरोनाचे संकट त्यात विक्रमी पावसामुळे राहाता परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत शुकशुकाट जाणवण्याची भीती व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.
राहाता व परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. कालपर्यंत शहर व तालुक्यातील कालवा क्षेत्रात सुमारे एक हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 19 ऑक्टोबरपर्यंत राहाता 1042 मिमी, सोमठाणा 754 मिमी, कोळगाव 821 मिमी, सोनेवाडी मिमी, 572 मिमी, शिर्डी 770 मिमी, रांजणगाव 897 मिमी, चितळी 1025 अशी पावसाची नोंद झाली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे परतीच्या पावसाने दिलेला फटका यामध्ये शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम दिवाळीवर होणार असून, बाजारपेठे शुकशुकाट जाणवणार असल्याची भीती व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.
परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. याचा परिणाम आर्थिक गणितावर होणार असून, दिवाळी सण साजरा करण्याबरोबर पुढील पिके घेणे देखील कठीण होणार आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना पंचनामे करुन तात्काळ दिवाळीपूर्वी भरपाई द्यावी आणि शेतकर्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी हवालदिल शेतकरी करत आहेत. दरम्यान, 23 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचे संकट असल्याचे हवामान खात्याने सांगितले असल्याने शेतकर्यांनी सतर्क रहावे.