महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचा पंच प्रशिक्षण कार्यक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
योगासन हा खेळ ऑलिंपिकमध्ये नेण्यासठी राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ऑलिंपिक स्पर्धांसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम तयार करण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन एन.वाय.एस.एफचे जनरल सेके्रटरी डॉ.जयदीप आर्य यांनी केले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या चार दिवशीय राज्यस्तरीय पंच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

दूरदृश्य प्राणालीद्वारा घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्र तथा बापू पाडळकर व जनरल सेक्रेटरी डॉ.संजय मालपाणी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 23 सप्टेंबरपासून चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात भूषण टेके, मनाली देव, हेमंत कुंभार, निलेश पठाडे, महेश कुंभार, राजेश पवार, श्वेता पाटील, स्नेहल पेंडसे, संजय देशमुख, मंगेश खोपकर, सतीश मोहगावकर, सुहास पवळे, डॉ.तेजसिंग जगनाडे व प्राजक्ता खवले आदी प्रशिक्षक सहभागी झाले होते.

या प्रशिक्षण शिबिरात पंचाची भूमिका आणि त्यांची जबाबदारी, याशिवाय योगासनांच्या विविध प्रकारांचे परीक्षण करण्याच्या पद्धती, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, पारंपरिक योगासनांचे परीक्षण, परीक्षणाचे तंत्र, स्पर्धेचे नियम व अटी, सुक्ष्म गुणपद्धती, बाद पद्धत आणि अनुशासन या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्रानंतर प्रशिक्षणार्थीच्या कार्य परीक्षाही घेण्यात आल्या. या प्रशिक्षण वर्गातून तयार झालेले पंच राज्यपातळीवरील योगासन स्पर्धांचे परीक्षण करुन त्यातून राष्ट्रीय स्पर्धांसाठी स्पर्धकांची निवड करणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत बोलतांना योगाचार्य डॉ.आनंद बालयोगी भवनानी यांनी राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनद्वारा अद्ययावत आणि खेळाडू केंद्रित परीक्षण पद्धती विकसित करण्यात आली असल्याने योगासन खेळाडूंना न्याय मिळेल व परिश्रमी खेळाडू खेलो इंडियापर्यंत पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराचा सोमवारी समारोप झाला.

Visits: 140 Today: 1 Total: 1986331

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *