मनसेच्या महायुती प्रवेशाने ‘शिर्डी’ लोकसभेचा खेळ बदलणार! दुसर्या जागेसाठी शिर्डीचा आग्रह; ‘वंचित’च्या ‘एकला चलो’ने रंगत वाढवली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजून पाच दिवस उलटूनही राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. गेल्याकाही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास विकास आघाडीत समावेशाच्या चर्चा असताना आता त्याही मावळल्यात जमा आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी सुरु असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याने त्यांच्या सहभागाने महायुतीची ताकद वाढणार आहे. त्यासाठी मनसेने तीन जागांची मागणी केली असून त्यात दक्षिण मुंबईसह नाशिक आणि शिर्डीचा समावेश आहे. मात्र भाजपकडून मनसेला दोन जागा सोडल्या जाण्याची चर्चा असून त्यात मुंबईसह शिर्डीच्या नावाची जोरदार चर्चा असल्याने सदाशिव लोखंडे यांची धाकधूक वाढली आहे. वंचित आघाडीही एकट्याने निवडणुकांना सामोरे जाण्याची भाषा करीत असल्याने देशाची 18 वी लोकसभा राज्यासह शिर्डीतील रंगत वाढवणारी ठरणार आहे.

गेल्या दोन वर्षात राज्यातील प्रादेशिक राजकारणात मोठे उलटफेर झाले आहेत. मागील निवडणुकीत एकसंघ असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. यासर्व राजकीय घडामोडीनंतर ग्रामपंचायत वगळता राज्यात अन्य कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या या राजकीय खेळाकडे मतदार कसे पाहतात याचा कोणत्याही राजकीय पक्षाला अंदाज बांधता आलेला नाही. भाजपने यंदा 400 पेक्षा अधिक जागा पटकावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे साहजिकच राज्यातील 48 जागांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने सर्वच्या सर्व 48 जागांवर अंतर्गत सर्व्हे केला असून त्यातून काही विद्यमान खासदारांना नारळही दिला जाणार आहे. त्यात शिर्डीतील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचाही अहवाल नकारात्मक असल्याचे वृत्त आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केंद्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या महायुतीमधील प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर काल रात्री उशिरापर्यंत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांशीही जवळपास दीडतास चर्चा केल्याने त्यांचा महायुतीमधील सहभाग जवळजवळ निश्चित मानला जात आहे. या चर्चेत राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबईसह नाशिक आणि शिर्डी अशा तीन जागांची मागणी केल्याचे वृत्त असून भाजपने त्यांना दोन जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी भाजपच्या चिन्हावर लढण्याची गळ घातली गेल्याने मनसेचा महायुतीमधील प्रवेश लांबल्याचेही बोलले जात आहे.

राज ठाकरेंच्या पक्षाला स्थापनेनंतरचा अपवाद वगळता सार्वत्रिक निवडणुकांध्ये फारमोठे यश मिळाले नसले तरीही लाखोंची गर्दी खेचणारा नेता म्हणून ठाकरेंची असलेली ओळख आजही कायम आहे. त्यामुळे त्यांचा महायुतीत समावेश झाल्यास त्याचा भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सोडल्या जाणार्या दोन जागांमध्ये भाजपच्या कोट्यातील दक्षिण मुंबई तर शिवसेनेच्या वाट्याची नाशिक अथवा शिर्डीची जागा सोडली जाण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील एका र्काक्रमात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणाही केली होती. त्यामुळे मनसेला शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा देताना त्यांच्यासमोर एकमेव पर्याय राहिल्याने शिर्डीची जागा मनसेच्या वाट्याला येण्याचीही दाट शक्यता आहे.

मुंबई दक्षिणमधून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मैदानात उतरावे असाही भाजपकडून आग्रह सुरु आहे. तसे घडल्यास शिर्डीच्या जागेवर मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत शिवसेनेकडून त्यांना आपल्या चिन्हावर लढण्याची गळ घातली असून त्याला राज ठाकरे यांनी साफ नकार दिल्याचेही वृत्त आहे. दुसरीकडे श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उबाठाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. त्यातच कालपर्यंत महाविकास आघाडीत सहभागाची शक्यता असताना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने प्रस्तावच फेटाळल्याने त्यांचा मार्ग ‘एकला चलो’चा असल्याचे संकेतही मिळत आहेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघ 2009 मध्ये शिवसेनेच्या ताब्यात आला. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी युती करुन रामदास आठवले यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्याबाबत नकारात्मक प्रचार केला गेल्याने त्यापूर्वीपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघावर भगवा फडकला. त्यानंतर झालेल्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने मतदारांशी संपर्क नसतानाही सदाशिव लोखंडे लाटेवर स्वार होवून विजयी झाले. मात्र सध्याची राजकीय स्थिती पुर्णतः वेगळी असून लोखंडे यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देवू नये असा भाजपमधूनच आग्रह सुरु असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मनसेला शिर्डीची जागा गेल्यास आश्चर्य वाटू नये. शिर्डीच्या रुपाने मनसेच्या जिल्ह्यातील राजकीय प्रवेशाने आणि वंचितच्या एकला चलोच्या नार्याने यंदा शिर्डीची निवडणूक चर्चेत राहील हे मात्र निश्चित.

