समनापूरमधील तरुणाचा चाकूने गळा चिरुन खून! नाजूक कारणातून घटना घडल्याचा संशय; अवघ्या तासाभरातच दोघे ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडलेले असताना आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाने आपल्याच मित्राला दारु पाजून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संगमनेर-लोणी रस्त्यापासून सुमारे तीस फूट आतील मैदानात शुक्रवारी रात्री सदरचा प्रकार घडला. सकाळी तो लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या दोन तासांतच दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे. अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवारी (ता.22) रात्रीच्यावेळी समनापूर शिवारातील हॉटेल नेचरजवळ असलेल्या मोकळ्या पटांगणात घडली. आज सकाळी आठ वाजता समनापूरचे पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी शहर पोलिसांना अनोळखी व्यक्तिचा खून झाल्याची खबर दिली. त्यानंतर तत्काळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर उपअधीक्षक वाघचौरे यांनी सहाय्यक निरीक्षक विश्वास भान्सी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार, हरिश्चंद्र बांडे, शरद पवार व अजित कुर्हे आणि उपनिरीक्षक रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, साईनाथ पवार, राहुल सारबंदे व राहुल डोके यांची दोन पथके तपासकामी रवाना केली.

घटनास्थळावर बिअरच्या तीन बाटल्या, काडेपेटी, चप्पल यासह झटापट झाल्याच्या खूणा दिसून येत होत्या. मृतदेहापासून काही अंतरावरच मयताचा गळा चिरण्यासाठी वापरलेला चाकूही आढळून आला. घटनास्थळावर सापडलेल्या बिअरच्या बाटल्या कोठून आणल्या याचा तपास करुन पोलिसांनी अवघ्या तासाभरातच आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी छापेमारी सुरु झाली. मात्र अटक होण्याच्या भितीने दोन्ही संशयीत रात्रीपासूनच पसार झाले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आणि दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

दोघांनाही ताब्यात घेवून त्यांच्याकडून घटनाक्रम समाजावून घेतला जात असून खून करणारे दोन्ही आरोपी आणि मयत एकाच समाजाचे आणि नेहमी सोबत राहणारे आहेत. शुक्रवारी (ता.22) रात्री त्यांनी वडगाव पान जवळील एका बिअर शॉपीमधून तीन बिअरच्या बाटल्या घेतल्या. तिघांनीही समनापूर शिवारातील हॉटेल नेचर जवळील मोकळ्या पटांगणात बसून त्या रिचवल्या. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले. त्यातून एकाने जवळील चाकू काढून अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत (वय 22, रा.समनापूर) याचा धारदार चाकूने गळा चिरुन खून केला आणि ते दोघेही तेथून पसार झाले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेमागे नाजूक कारण असण्याची शक्यता आहे.

गेल्याकाही कालावधीत संगमनेरात एकामागून एक घडणार्या घटनांनी शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडवले आहे. त्यातच आज सकाळी घडलेल्या खुनाच्या घटनेची भर पडल्याने संगमनेरात गुन्हेगारी घटनांचा आलेख उंचावत असल्याचेही दिसून आले आहे. सुरुवातीला या घटनेच्या अनुषंगाने काही अफवाही पसरल्या होत्या. त्यातून सामाजिक शांततेला बाधा निर्माण होण्याचाही धोका होता. मात्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तपासाला गती देवून अवघ्या दोन तासांतच खुनामागील कारणांसह दोघा संशयीतांना ताब्यात घेतल्याने अफवांचे ढग निवळले आहेत.

या घटनेत मयत झालेला अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत (वय 22) हा समनापूरचा मूळ रहिवाशी नाही. कुडीमोती विकण्याचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या कुटुंबातील या तरुणाचे मारेकरीही त्याच्याच समाजातील आहेत. मयत आणि मारेकरी एकत्रित रोजगारासाठी जात असतं. त्यांची घरेही एकमेकांच्या शेजारीच आहेत. त्यामुळे या घटनेमागे काहीतरी वेगळे कारण असल्याचा संशय घेवून झालेला पोलिसांचा तपास अचूक ठरला असून नाजूक कारणातूनच खुनाचा प्रकार घडल्याचे जवळजवळ उघड झाले आहे.

