क्रिकेटचा सामना खेळून परतणार्‍या तरुणांवर जमावाचा हल्ला! जोर्वेनाक्यावरील ‘माज’ आजही कायम; संगमनेरातील वातावरण तणावपूर्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांपासून संगमनेरातील सामाजिक सलोखा नष्ट करण्याचे पद्धतशीर षडयंत्र राबविले जात असून एका समुदायाकडून जाणीवपूर्वक दुसर्‍या समुदायाला आव्हान देण्याचे एकामागून एक प्रकार समोर येत आहेत. आज पहाटेच्या सुमारास असाच धक्कादायक प्रकार समोर आला असून नांदूर शिंगोटे येथून क्रिकेटचा सामना खेळून परतणार्‍या आठ तरुणांना जोर्वेनाक्यावर आडवून जमावाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आठ जणांविरोधात सशस्त्र मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर जोर्वेगावात संताप उसळला असून गावबंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला आहे. वारंवार घडणार्‍या या घटनांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा यासाठी जोर्वेमधील ग्रामस्थांनी आज सकाळी संगमनेरात मोर्चाही काढला. या घटनेतून कोणीतरी अज्ञात शक्ति संगमनेरचे सामाजिक वातावरण खराब करण्याचे षडयंत्र राबवित असल्याचाही आता वास येवू लागला आहे. सदरची घटना बुधवारी सायंकाळी गैरकृत्यातून एका आरोपीला मारहाण केल्याच्या घटनेची ‘रिअ‍ॅक्शन’ असण्याचीही दाट शक्यता असून पोलिसांकडून त्याचा सखोल तपास होण्याची गरज आहे. या घटनेने संगमनेर शहरातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनले आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सदरची घटना आज (ता.21) पहाटे दोनच्या सुमारास जोर्वेनाका येथे घडली. जोर्वे गावात राहणार्‍या आठ तरुणांनी नांदूर शिंगोटे (ता.सिन्नर) येथे सुरु असलेल्या रात्र क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता. बुधवारी (ता.20) त्यांचा सामना असल्याने खेळण्याचे आवश्यक साहित्य घेवून ही मुलं खेळण्यासाठी गेली होती. सामना संपल्यानंतर तीन मोटर सायकलवरुन आठ तरुण पुन्हा जोर्वेकडे जाण्यासाठी माघारी निघाले. आज पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या दुचाकी संगमनेर बसस्थानकाजवळ येताच पाठीमागून एका दुचाकीवर (क्र.एम.एच.17/सी.पी.6028) आलेल्या दोघांनी काहीही कारण नसताना त्या तरुणांकडे रागाने बघायला सुरुवात केली.


या दरम्यान त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण वारंवार फोन करुन ‘नाके पर आ’ असे संदेश देत असल्याचेही दाखल फिर्यादीत म्हंटले आहे. काही वेळातच क्रिकेट खेळून घरी परतणार्‍या तरुणांच्या तीन दुचाकी जोर्वेनाका परिसरात पोहोचल्या. त्यावेळी बसस्थानकापासून त्यांचा पाठलाग करणार्‍या ‘त्या’ दोघांनी त्यांना आडवले आणि ‘नारेबाजी कोणी केली’ अशी विचारणा करीत ते दोघेही आठ जणांना शिवीगाळ आणि मारहाण करु लागले. हा प्रकार घडायला सुरुवात होताच अवघ्या काही क्षणात तेथे मोठा जमाव गोळा झाला व त्यातील सात ते आठजण त्या निष्पाप तरुणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले.

यावेळी जमावातील एकाने आदित्य पोपट घुले या तरुणाच्या हातातून क्रिकेट खेळण्याची बॅट ओढली व त्याचाच वापर करुन त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. सुमारे 15 मिनिटे सुरु असलेल्या या मारहाणीनंतर जमावातील एकाने त्या सर्वांना पोलीस ठाण्यात आणून सोडले. याप्रकरणी रात्री उशिराने साई महेश दिघे या तरुणाच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात सात ते आठ जणांविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 341, 143, 147, 148, 149, 324, 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (ता.20) सायंकाळी बसस्थानकावर घडलेल्या घटनेची रिअ‍ॅक्शन असल्याची चर्चा सध्या सुरु असून त्यातून शहरातील तणावात भर पडली आहे.


गेल्यावर्षी 28 मे रोजी जोर्वेतील शेतकर्‍यांच्या मुलांनी वाहनाचा हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरुन अशाच प्रकारे त्यांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर रात्री उशिराने मारहाण झालेल्या तरुणांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली म्हणून पुन्हा त्यांना जोर्वेनाका परिसरात आडवून सशस्त्र मारहाण करीत जमावाकडून त्यांचा जीव घेण्याचाही प्रयत्न झाला. त्या घटनेने गेल्या तीन दशकांपासून सामाजिक सौहार्द जपणार्‍या संगमनेरातील जातीय तणावात भर पडली होती. या घटनेची प्रतिक्रिया म्हणून सकल हिंदू समाजाने जूनमध्ये विराट आक्रोश मोर्चाही काढला होता. प्रशासनानेही त्यावेळी कठोर भूमिका घेवून आरोपींना गजाआड करण्यासह घटनेला कारणीभूत ठरलेली जोर्वेनाक्यावरील सर्व अतिक्रमण भूईसपाट करुन तेथे पोलीस चौकीही उभारली.


या घटनेला दहा महिन्यांचा कालावधी उलटला, मात्र अद्यापही पोलिसांच्या जोर्वेनाका चौकीला पोलिसच उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे त्याचप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कायम असतानाच गेल्या आठवड्यात आपल्या दोन लहान मुलींसह संगमनेरात येत असलेल्या तरुणाला चारचाकीतून कट मारणार्‍या तरुणाने आडवून व जमाव गोळा करीत बेदम मारहाण केली. ही घटना संगमनेरचे सामाजिक सौहार्द खराब करणारी ठरली. पोलिसांना जंग जंग पछाडूनही या घटनेतील सर्व आरोपींना गजाआड करण्यात अपयश आलेले असतानाच आज पहाटे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. त्यातून कोणीतरी अज्ञात शक्ति संगमनेरात दंगल घडवण्याचे मनसुबे बाळगून असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून पोलिसांच्या गळचेप्या भूमिकेतून तसे काही घडल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.


आज पहाटेच्या या घटनेने कोल्हेवाडी रस्त्यावरील मारहाण प्रकरणाने वाढलेला तणाव निवळत असतांना त्यात पुन्हा एकदा भर घालण्याचे काम केले. या घटनेविरोधात जोर्वेतील ग्रामस्थ संतापले असून आज सकाळी गावबंद ठेवून निषेध सभाही घेण्यात आली. त्यानंतर मोर्चाने उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयात पोहोचलेल्या ग्रामस्थांनीच एकामागून एक घडत असलेल्या या घटनांमागे षडयंत्र असल्याचे व वारंवारच्या घटना आता सहनशक्तिच्या पलिकडे गेल्याचे पोलीस अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरात वाढलेले अतिक्रमण आणि त्याच्या आडून चालणार्‍या बेकायदा व्यवसायांमुळेच अशाप्रकारच्या विघातक शक्तिंना बळ मिळत असल्याच्या वास्तवावरही अनेकांनी बोटं ठेवले.


मात्र केवळ आपला कार्यकाळ शांततेत जावा एव्हढ्यासाठीच धडपडणार्‍या स्थानिक पोलीस अधिकार्‍यांकडून आश्‍वासनांशिवाय काहीच पदरी पडले नाही. मात्र ही घटना शहराला अशांततेच्या दिशेने घेवून जाणारी ठरण्याची शक्यता असून त्याचे प्रतिबिंब बुधवारी (ता.27) संगमनेरात होवू घातलेल्या सकल हिंदू समाजाच्या आक्रोश मोर्चातून उमटण्याची दाट शक्यता आहे. गेल्यावर्षी जोर्वे नाक्यावरील सर्व अतिक्रमणं प्रशासनाने भूईसपाट केली होती. त्यामुळे या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीेच कंबरडे मोडले जाईल असे अपेक्षीत होते, मात्र येथील अतिक्रमणधारकांनी आता समनापूरकडून येणार्‍या रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याने गेल्याकाही वर्षांपासून फसफसणारा जोर्वे नाक्यावरील काहींचा ‘माज’ आजही कायम असल्याचे गुरुवारी पहाटेच्या घटनेने स्पष्ट केले आहे.


भारतीय पोलीस सेवेतून आलेले अधिकारी शांतता व सुव्यस्थेबाबत अधिक कठोर असतात. सध्या जिल्ह्यालाही याच केडरमधून आलेले पोलीस अधीक्षक लाभले आहेत. मात्र त्यांच्या जिल्ह्यातील कार्यकाळात श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी पाठोपाठ आता संगमनेरातही जातीय तणावाच्या एकामागून एक घटना घडू लागल्याने आश्‍चर्य निर्माण झाले आहे. संगमनेरात एका समुदायाची मुजोरी वाढण्यात येथील बेकायदा व्यवसाय आणि बेसुमार अतिक्रमणं कारणीभूत असल्याचे स्पष्ट असूनही पोलिसांकडून कारवाई करण्यात चालढकलपणा होत असल्याने गेल्याकाही दिवसांपासून संगमनेरातील तणावात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा उद्रेक होवून शहराचे सामाजिक स्वास्थ धोक्यात येण्यापूर्वीच पोलिसांनी आवश्यक पाऊलं उचलण्याची गरजही या निमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे.

Visits: 287 Today: 3 Total: 1103816

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *