‘त्या’ आठ रुग्णालयांच्या नावात आता ‘धर्मादाय’ असा उल्लेख होणार! गणेश बोर्हाडे यांच्या प्रयत्नांना यश; प्रांताधिकार्यांच्या शिष्टाईने ‘आत्मदहन’ स्थगित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनाचे निर्देश डावलून रुग्णांकडून अतिरीक्त रक्कम वसूल करण्यासह नियमानुसार लेखापरिक्षण न करणार्या शासकीय तपासणींवर कारवाई, तालुक्यातील आठ धर्मादाय रुग्णालयांच्या नावात तसा उल्लेख करुन आत्तापर्यंत तेथे उपचार घेणार्या गरीब व दुर्बल रुग्णांची रक्कम परत करणे, शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांकडून बोगस डॉक्टरांना पाठबळ, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञावर कारवाईस टाळाटाळ, खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या बिलाचे खोटे लेखापरिक्षण आणि कोविड काळात शासनाच्या अधिसूचनेतील मुद्द्यांचा भंग करणारी रुग्णालये अशा सात मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करुन कारवाईसाठी आत्मदहनाचा इशारा देणार्या सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांचे मन वळविण्यात संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांना यश आले आहे. याबाबत त्यांनी शिष्टाई करीत संबंधित सर्व अधिकार्यांसमवेत बैठक घेवून बोर्हाडे यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर कालबद्ध कारवाईचे आदेश दिल्याने बोर्हाडे यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा निर्णय ‘स्थगित’ केला आहे.

गेल्या दिड वर्षांपासून थैमान घालणार्या कोविड संक्रमणाने संगमनेर तालुक्यातील हजारों नागरिकांना लागण होवून त्यांना
रुग्णालयात दाखल व्हावे लागले. संक्रमणाचा वेग आणि त्यातून मोठ्या प्रमाणात बाधित होणारे रुग्ण यामुळे राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना कोविड उपचार करण्याची परवानगी दिल्यानंतर अनेक रुग्णालयांनी कोविडला पैसे कमविण्याची संधी मानून दाखल रुग्णांकडून उपचारापोटी भरमसाठ रकमा उकळल्या. राज्यभरातून याबाबत तक्रारी येवू लागल्यानंतर 3 जूनरोजी अधिसूचनेद्वारे शासनाने कोविड उपचार करणार्या सर्व खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांचे देयक तपासणी करुनच अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र संगमनेरात त्याचा लाभ रुग्णांपेक्षा रुग्णालयांनाच अधिक झाल्याचे आरोप समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनी संबंधितांकडे तक्रारीही केल्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांच्या या निर्णयानंतर संगमनेरच्या प्रशासनात खळबळ उडला होती. अखेर संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करीत घटना व्यवस्थापक तथा तहसीलदार अमोल निकम, नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकी अधिकारी डॉ.मच्छिंद्र साबळे, संजीवन रुग्णालयाचे डॉ.जगदिश वाबळे व सर्व शासकीय लेखापरिक्षकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत गणेश बोर्हाडे यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. बोर्हाडे यांनी आत्मदहनाचा इशारा देतांना उपस्थित केलेल्या सात मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होवून त्यावर कारवाईसाठी कालनिश्चिती करण्यात आली.

त्यानुसार, संगमनेरातील कोविड रुग्णालयातील सर्व रुग्णांच्या बिलांची नव्याने तपासणी करुन 23 ऑगस्टपर्यंत त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करुन अतिरीक्त शुल्क घेतलेल्या रुग्णांची रक्कम परत करण्यात येणार आहे. लेखापरिक्षणात हलगर्जीपणा करणार्या तपासणीसांवर कारवाईच्या मुद्द्यावर निर्णय घेतांना लेखापरिक्षण करीत असतांना काही तपासणींची बदली झाली. त्यामुळे ज्या रुग्णालयांचे लेखापरिक्षण राहीले असेल ते तत्काळ पूर्ण करण्यात येवून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी सांगितले. धर्मादाय रुग्णालयांच्या नावात नियमानुसार ‘धर्मादाय’ असा उल्लेख असावा व तेथे उपचार उपचार घेतलेल्या गरीब व दुर्बल घटकांकडून घेतलेली देयके त्यांना परत करावी या मागणीवरही या बैठकीत चर्चा होवून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार संगमनेर तालुक्यात आठ रुग्णालये धर्मादाय स्वरुपाची आहेत. त्यातील काही रुग्णालयांमध्ये दुर्बल व निर्धन घटकांसाठी स्वतंत्रपणे प्रत्येकी 10 टक्के तर काही रुग्णालयांमध्ये नमूद केलेल्या सर्व खाटा राखीव ठेवणे गरजेचे आहे. या रुग्णालयांच्या नावात ‘धर्मादाय’ असा उल्लेख करणे बंधनकारक आहे. तसा बदल करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकार्यांना तत्काळ पत्र द्यावे व त्याची अंमलबजावणी करावी. अशा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नावाची यादी दाखल दिनांक, घरी सोडण्यात आल्याची तारीख व घेण्यात आलेल्या देयकासह सर्व माहिती प्राप्त करावी व ज्या रुग्णालयात दुर्बल व निर्धन घटकातील रुग्ण दाखल होते त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेच्या लेखा परिक्षणाबाबत धर्मदाय आयुक्तांचे मार्गदर्शन घेवून त्यानुसार कारवाई करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी आदेश देवूनही शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मच्छिंद्र साबळे यांनी कोणतीही केली नसल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीवर मुख्याधिकारी डॉ.बांगर यांनी सदर बोगस व्यक्तिने आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडले असल्याचे सांगत त्यासोबत काही कागदपत्रेही डॉ.साबळे यांचेकडे दिल्याचे सांगीतले. संबंधितास रुग्णांच्या तपासणी अहवालावर स्वाक्षरी करता येत नाही हे देखील मान्य केले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत या प्रकरणी कारवाई करण्यात येईल असे डॉ.बांगर यांनी बैठकीत सांगीतले. कारणे दाखवा नोटीस बजावूनही संगमनेरातील एका खासगी रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोगस डॉक्टर म्हणून कारवाई न करणार्या गटविकास अधिकारी व तालुक आरोग्य अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मुद्द्यावर निमोण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांना याबाबत गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले असून पुढील दोन दिवसांत संबंधितावर गुन्हा दाखल होईल अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी दिली.

संगमनेरातील एका खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या देयकाचे ‘खोटे’ लेखापरिक्षण करणार्या दोघा शासकीय कर्मचार्यांवर कारवाईच्या मुद्द्यावर सादर अहवालातील विसंगती पाहून संबंधित दोन्ही लेखापरिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजवावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोविड काळात ज्या रुग्णालयांनी राज्य शासनाच्या अधिसूचनेतील मुद्द्यांचा भंग केला आहे अशा रुग्णालयांवरील कारवाईबाबत पुढील पंधरा दिवसांत सर्व खासगी व धर्मादाय रुग्णालयांचे लेखापरिक्षण करुन प्राप्त अहवालातून अशा प्रकारे उल्लंघन करणार्या रुग्णालयांवर अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर घटना व्यवस्थापक तथा तहसीलदार अमोल निकम यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्यांना तत्काळ पत्र देत तालुक्यातील वामनराव इथापे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, घुलेवाडीतील संजीवन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, सौ.मथुराबाई थोरात सेवाभावी ट्रस्टचे डेंटल हॉस्पिटल, मांची हिल येथील आश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर खुर्द येथील सिद्धकला हॉस्पिटल, पालिका आवारातील दर्शन रोटरी आय केअर हॉस्पिटल, अमृतनगर येथील अमृतवाहिनी रुरल हॉस्पिटल व गुंजाळवाडी पठारावरील वृंदावन (जनरल) हॉस्पिटल या आठ ठिकाणी धर्मादाय असा उल्लेख असलेले फलक दर्शनीभागात लोवण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांच्या संबंधित असलेल्या या सातही मुद्द्यांवर वारंवार तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनी अखेर देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनी तहसील कार्यालयासमोर ‘आत्मदहन’ करण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी शिष्टाई करीत सर्व संबंधित अधिकार्यांची बैठक घेवून बोर्हाडे यांनी प्रस्तुत केलेल्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली व त्यावर कालबद्ध कारवाईचे आदेश दिल्याने बोर्हाडे यांच्या आत्मदहन आंदोलनाला स्थगिती मिळाली आहे.

