साकूर अत्याचार व आत्महत्या प्रकरणाने राजकारण तापले! आरोपींना ‘राजाश्रय’ मिळणे ही गंभीर घटना : विखे पा… हैवानांना ‘देहदंडा’ची शिक्षा व्हावी : वाघ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अत्याचारानंतर पीडित मुलीच्या आत्महत्येची घटना सुन्न करणारी आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींना अटक झाली असली तरीही या प्रकरणाच्या तपासात पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. पीडितेच्या कुटुंबियांना फिर्याद देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून घारगावच्या ठाणे अंमलदारासह या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ देणार्‍यांचे कॉल रकॉर्ड तपासण्याची गरज असल्याचे मत राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज साकूरमध्ये व्यक्त केले.


गेल्या महिन्यात (ता.29) साकूर परिसरातील एका साडेपंधरा वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्यानंतर तिने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर तब्बल 18 दिवसांनी घारगाव पोलीस ठाण्यात अत्याचार व पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच आरोपींचा समावेश असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला चौघांना ताब्यात घेत त्यातील तिघांना अटक केली होती. मात्र उर्वरीत दोन आरोपींना गुन्ह्यातून वगळण्यासाठी पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव निर्माण केला जात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज (ता.20) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महिला नेत्या चित्रा वाघ यांनी साकूरमध्ये जावून पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते.


यावेळी बोलताना मंत्री विखे पुढे म्हणाले की, अतिशय गंभीर असलेल्या या घटनेचा तपास पूर्ण करुन त्याचा खटला जलदगती न्यायालयात चालावा व या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक व्हावी यासाठी आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरणार आहोत. प्रचलित पद्धतीने पीडितेच्या कुटुंबाला शासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदतही तत्काळ मिळेलच. त्यासाठी आचारसंहितेचा अडसर होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रकरणाच्या मूळात जावून तपास होण्याची अपेक्षा व्यक्त करताना पीडितेच्या कुटुंबाला फिर्याद देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात बसवून ठेवण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ठाणे अंमलदारापासून ते आरोपींपर्यंत प्रत्येकाचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची गरजही त्यांनी केली.


या घटनेने मुलींना शाळा-महाविद्यालयात पाठवण्याबाबत पालकांसमोर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या तपासात आपण वैयक्तिक लक्ष घातले आहे. यापूर्वीही याच आरोपींकडून अशसाच प्रकार घडला होता. मात्र त्यावेळी आरोपींना ‘राजाश्रय’ मिळाल्यानेच ही घटना घडल्याचे सांगत शेवटचा आरोपी गजाआड होईस्तोवर पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी पीडितेसोबत घडलेल्या प्रसंगासह साकूरमधील सामाजिक स्थितीची माहितीही मंत्र्यांना दिली.


पठारभागात वाळू माफीयांनी मांडलेला उच्छादही वाढलेल्या गुन्हेगारीला कारणीभूत आहे. शासनाकडून माफीयांचा बंदोबस्त करण्याचे काम सुरु असल्याने काहींचे पोटशूळ उठल्याचे सांगताना त्यांनी नाव न घेता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही चिमटा काढला. माफीयांविरोधातील आपली भूमिका स्पष्ट असून त्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक दहशतीचे उच्चाटण समाजाकडूनही होईल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अमोल खताळ, युवामोर्चाचे सरचिटणीस शैलेश फटांगरे, तालुकाध्यक्ष हरिश वलवे, अल्पसंख्याक आघाडीचे रऊफ शेख, सरपंच रवींद्र दातीर, बुवाजी खेमनर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


साकूरमध्ये घडलेल्या या भयानक घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सर्वप्रथम लक्ष घालताना पोलीस उपअधीक्षकांना सखोल तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या पाठोपाठ भाजपच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ यांनी साकूरमध्ये येवून पीडित कुटुंबाची भेट घेवून हा विषय राज्यस्तरावर नेल्याने आगामी लोकसभा निवडणूकीत त्यावरुन राजकीय अस्त्रे डागली जाण्याची दाट शक्यता आहे. मंत्री विखे यांनी साकूरमधील ‘दहशत’ संपवणार असल्याचेही वक्तव्य केल्याने आगामी कालावधीत पठारभागातील वाळू माफीयांविरोधात धडक कारवाई सुरु झाल्यास आश्‍चर्य होणार नाही.

हैवानांना ‘देहदंडा’ची शिक्षा व्हावी : वाघ

गाव-वाड्यांवर राहणार्‍या ग्रामस्थांनी महिला व मुलींच्या छेडछाडीकडे दुर्लक्ष करता कामा नये. वेळीच पोलिसांना अशा घटनांची माहिती दिल्यास, त्या विरोधात आवाज उठवल्यास गोरगरीबांच्या अनेक मुलींचे जीव वाचवता येतील. दुर्दैवाने आपल्याला हे समजण्यासाठी एका निष्पाप मुलीला आपला जीव द्यावा लागला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून येणार्‍या दिवसांत आणखी काही प्रकरणं समोर येतील. मात्र अशा घटना पाहून कृपया ‘शांत’ बसू नका! असे आवाहन भाजपच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज साकूर येथे केले.


गेल्या महिन्यात घडलेल्या अत्याचार व आत्महत्या प्रकरणातील अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जावून भेट घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी घारगाव पोलिसांनी घटनेच्या दिवशीच संशयावरुन प्रकरणाची स्वतः दखल घेत तपास सुरु केल्याचे सांगत चक्क घारगाव पोलिसांची पाठ थोपटली. ही घटना समजल्यापासूनच आपण सून्न झालो होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दुःख व्यक्त केल्याचे त्या म्हणाल्या. साकूरमध्ये 15/20 जणांच्या टोळक्याकडून शाळा सुटण्याच्या वेळी अल्पवयीन विद्यार्थीनींना त्रास दिला जातो, त्यांचा पाठलाग करुन बळजबरी केली जाते. वर्षभरापूर्वी आरोपीने असाच प्रकार केला होता. मात्र त्यावेळी गावपातळीवरच माफीनामा घेवून तो मिटवण्यात आला. तेव्हाच पोलिसांना सांगितले असते तर आज त्यासाठी एका मुलीला जीव द्यावा लागला नसता असेही वाघ यांनी यावेळी सांगितले.


या प्रकरणात सरकार आणि पोलीस दोन्ही त्यांचे काम करीत आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही. सरकार, पोलीस तुमच्यासाठी आहेत. अशाप्रकारच्या घटना पोलिसांपर्यंत पोहोचवल्या तरच त्यांना समजतील. त्यामुळे आजुबाजूला घडणार्‍या अशा घटना रोखण्यासाठी त्या विरोधात आवाज उठवा असे आवाहन करताना त्यांनी महिला व मुलींच्या चारित्र्याशी खेळणार्‍यांना देहदंडा शिवाय अन्य शिक्षा होवू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दीडशे वर्ष जुने कायदे मोडीत काढले आहेत. महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यासाठी विशेष न्यायालये सुरु होत आहेत. येणार्‍या दिवसांत महिला, मुलींच्या चारित्र्याशी खेळणार्‍यांविरोधातील कठोर कायदेही लागू होतील. मात्र त्यानंतरही आपल्या प्रत्येकाला सजग राहुन आपल्याच समाजातील मुलींचे जीव वाचवावे लागतील. या प्रकरणात आता राज्य सरकारचेही लक्ष असून कोणतीही हयगय होणार नाही याची पोलीस काळजी घेतील अशी अपेक्षाही चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

Visits: 302 Today: 3 Total: 1411792

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *