जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांची पंतप्रधानांकडून दखल! जिल्हाधिकारी डॉ.भोसलेंशी साधला दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद..
नायक वृत्तसेवा, नगर
कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदिंची माहिती पंतप्रधानांना दिली. याबाबत त्यांनीही समाधान व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध राज्यातील निवडक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ.दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली.
मुख्यमंत्र्यांकडूनही जिल्हाधिकार्यांचे कौतुक!
अहमदनगर जिल्ह्याने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडून त्यासंबंधितीची माहिती घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालक सचिव आशिषकुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करुन डॉ.भोसले यांचे कौतुक केले.