गीता परिवाराच्या कराटे स्पर्धकांची सातार्‍यात धमाल! अकरा सुवर्णसह बहात्तर पदकांची कमाई; चारशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गीता परिवाराच्यावतीने संगमनेरात सुरु असलेल्या दैनंदिन कराटे वर्गातील खेळाडूंनी सातार्‍यात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत धमाल केली. कराटेच्या वेगवेगळ्या तीन प्रकारांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत संगमनेरातील ४२ स्पर्धकांनी सहभागी होताना ११ सुवर्ण, २६ रौप्य व ३५ कांस्यपदकांसह तब्बल ७२ पदकांची लयलुट केली. सातार्‍यातील स्वराज सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन ओकिनावा स्पोटर्स कराटे असोसिएशनच्यावतीने केले गेलेे होते.

बदलत्या सामाजिक वातावरणात वावरणारी मुलं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावीत यासाठी पालक त्यांना वेगवेगळ्या वर्गात दाखल करीत असतात. त्यातील एक म्हणजे कराटे प्रशिक्षण वर्ग. मुलांना आत्मरक्षणाचे धडे देण्यासह त्यांचे आत्मबळ वाढवणार्‍या कराटे प्रशिक्षणाचे गीता परिवाराच्यावतीने संगमनेरातही नियमितपणे वर्ग चालतात. या वर्गात मुला-मुलींची मोठी संख्या आहे. दरवर्षी राज्याच्या विविध भागात होणार्‍या स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्यातील चुणूकही दाखवली आहे.

सातारा येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अहमदनगरसह पुणे, सोलापूर, सातारा, मुंबई, रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यातून जवळपास चारशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कराटेच्या कुमिते (लढाई), काता (युद्ध) आणि ग्रुपकाता (सांघिक युद्ध) या तीन प्रकारात झालेल्या स्पर्धेत गीता परिवार कराटे वर्गातील ४२ विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करताना धमाल केली. आयुष तांबे, स्वराज शिंदे, ईश्वर सातपुते, निर्भय भोसले, जान्हवी गवंडी, साईशा कानवडे, उर्जिता शिंदे, शिवेंद्रसिंह देशमुख, संघराज गायकवाड व वैष्णवी वाळके या खेळाडूंनी सुवर्णपदके मिळवली.

अभिराज नवले, भक्ती सातपुते, ओंकार कोळी, आरव कासट, आयुष दळे, सिद्धी पर्बत, यश जाधव, अक्षया म्हस्के, श्रेयस दळे, आदित्य कोते, साहील काळे, संस्कृती ढोले, ओम जोर्वेकर, अनुष्का गंगासागरे, गोवर्धन पांडे, अस्मी ताजणे, ऋषीकेश जाधव, आर्ची निचळ व ऋषीकेश चव्हाण यांनी रौप्यपदकांची कमाई केली. तर, सर्वज्ञ भांगरे, कृष्णा पर्बत, आशिष सावंत, साईश गवंडी, सार्थक रच्चा, वैष्णवी पर्बत, आदित्य भवार, सत्यम जाधव, वैष्णवी पर्बत, दिव्या कोकणे, ईश्वरी पांडे, पलाश शिंदे, कार्तिक शेलार व नम्रता निमसे यांना कांस्यपदके मिळाली. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना गीता परिवाराच्या कराटेपटूंनी ११ सुवर्ण, २६ रौप्य व ३५ कांस्यपदकांसह ७२ पदकांची कमाई केली.

सिंकदराबाद येथील ओकिनावा चीफ मास्टर एस. श्रीनिवासन व त्यांच्या टीमने स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश मिळवून संगमनेरात परतलेल्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी पालक प्रतिनिधी म्हणून संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख उपस्थित होते. कराटे खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्यासह पालकांनी मुलांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 27279

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *