अत्याचारानंतर अल्पवयीन पीडितेची आत्महत्या! साकूरमधील ‘रुबाब’ पानशॉपमधील घटना; पोलिसांकडून पाचजणांना अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारभागाची समृद्ध बाजारपेठ म्हणून लौकीक असलेल्या साकूरमध्ये अलिकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. अशातच आता प्रत्येक कायदाप्रिय नागरिकाच्या तळपायाची आग मस्तकात नेणारी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत साकूरमधील आरोपीने भरसकाळी रस्त्याने जाणार्या अवघ्या साडेपंधरा वर्षीय मुलीला बळजोरीने ‘रुबाब’ नावाच्या पानशॉपमध्ये नेवून दोनवेळा तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने घरी जावून सगळा प्रकार आपल्या आईच्या कानावर घालीत विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण पठारभागासह तालुक्यात संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणी मयत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन साकूरमधील सौरभ रावसाहेब खेमनर या नराधमासह त्याला साहाय्य करणार्या चौघांनाही घारगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना गेल्या महिन्यात 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते साडेअकराच्या दरम्यान साकूरमधील ‘रुबाब’ पानशॉपमध्ये घडली. याबाबत 15 वर्ष 8 महिने वयाच्या मयत पीडितेच्या आईने रविवारी (ता.17) मध्यरात्रीच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार इयत्ता दहावीत शिकणारी पीडित मुलगी गुरुवारी (ता.29) सकाळी साडेआठच्या सुमारास आपल्या आजोबांच्या दुचाकीवरुन साकूरमधील शाळेत गेली. मात्र शाळेला सुट्टी असल्याने त्यावेळी प्रवेशद्वारावर आलेल्या अन्य दोन मैत्रिणींसोबत गप्पा मारुन त्या तिघीही आपापल्या घराकडे जाण्यासाठी निघाल्या.

या दरम्यान 1 मार्चपासून सुरु होणार्या 10 वीच्या परिक्षेसाठी शालेय साहित्य घेण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलगी साकूरमधील एका दुकानात गेली व तेथून साहित्य घेवून जात असतानाच काही अंतरावर असलेल्या रुबाब पानशॉपजवळ तिची गाठ साकूरमधील सौरभ रावसाहेब खेमनर या पिसाटाशी पडली. त्याने पीडितेला पाहताच त्याच्यातला सैतान जागा झाला आणि त्याने कोणताही विचार न करता भररस्त्यात तिला आडवून तिचा हात पकडला. या प्रकाराने घाबरलेल्या त्या लहानशा मुलीने त्याला तिव्र विरोधही केला. मात्र हरामाचे खाऊन पोसलेल्या त्या वळूच्या ताकदीसमोर तिचा निभाव लागला नाही.

यावेळी पीडितेने आरडाओरड करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्या नराधमाने तिचे तोंड दाबून बळजोरीने तिला बाजूच्या रुबाब पानशॉपमध्ये अक्षरशः ओढीतच नेले. यानंतर आरोपी सौरभ खेमनर याने त्याचा दुसरा साथीदार योगेश रामा खेमनर याला पानशॉपच्या शटरला बाहेरुन कुलुप लावण्यास सांगितले. या दरम्यान पीडितेने आपली सुटका करुन घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र त्यात तिला अपयश आले. पानशॉपचे शटर बंद केल्यानंतरही पीडितेने आपल्या वयाचा दाखला देत वारंवार त्याला सोडून देण्याची विनंती केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आरोपीने तिचे तोंड व हात बांधले आणि पीडितेच्या तिव्र विरोधानंतरही तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

यानंतर मुख्य आरोपी सौरभ खेमनर याने त्याचा जोडीदार योगेश खेमनर याला ‘थंडपेय’ आणण्यास सांगितले, त्यावेळीही पीडित मुलगी तोंड व हात बांधलेल्या स्थितीत निर्वस्त्र अवस्थेत पानशॉपमध्येच होती. थंडपेय घेवून आलेल्या योगेश खेमनर याला आरोपीने पुन्हा बाहेरुन कुलुप लावून त्याच्या चाव्या विकास रामदास गुंड याच्याकडे देण्यास सांगून प्रशांत भास्कर भडांगे व विजय खेमनर या दोघांना बाहेर पहार्यावर थांबण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी सौरभ खेमनर याने सलग दुसर्यांदा पीडितेवर बळजोरीने अत्याचार केले. काही वेळाने त्याने पीडितेचे तोंड व पाठीमागे बांधलेले हात सोडून ‘जर तु याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारील’ अशी धमकीही भरली.

काही वेळ थांबल्यानंतर आरोपी सौरभ खेमनर याने त्याचा जोडीदार योगश खेमनरला फोन करुन रुबाब पानशॉपचे शटर उघडण्यास सांगितले. त्यावेळी दुकानाच्या समोर पीडितेच्या परिचयातील बाजीनाथ दातीर उभे असल्याचे व प्रशांत भडांगे आणि विजय खेमनर हे दोघे त्यांना दमबाजी करीत असल्याचे पीडितेने पाहिले. त्याच दरम्यान पीडितेची मैत्रिणही तेथे आली. तिला पाहताच कंठ दाटून आलेल्या पीडितेने तिच्या गळ्यात पडून ‘मला फार भीती वाटते गं’ असं म्हणतं ती रडायला लागली. दातीर यांनी पीडितेच्या वडिलांची शेती वाट्याने करणार्या इसमासोबत तिला घरी पाठवल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडितेने आपल्या आईच्या गळ्यात पडून घडला प्रकार कथन केला. यावेळी तिने ‘मला खूप भीती वाटते’ असे आईला सांगितले.

प्रचंड घाबरलेल्या आपल्या लेकराची समजूत काढताना पीडितेच्या आईने ‘तु घाबरु नकोस, मी तुझ्या वडिलांना सांगते’ असे म्हणून तिला धीर देण्याचाही प्रयत्न केला. काही वेळाने अचानक पीडितेच्या आजीच्या आवाजाने तिची आई खोलीकडे धावली असता अवघ्या 15 वर्ष 8 महिने वयाच्या त्या चिमुरडीने घडला प्रकार असह्य झाल्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने तिला साकूरमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी तातडीने तिला संगमनेरला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र संगमनेरात पोहोचण्यापूर्वीच त्या लहानशा जीवाने या जगाचा निरोप घेतला.

याप्रकरणी 18 दिवसानंतर रविवारी (ता.17) मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभ रावसाहेब खेमनर (वय 21), त्याला साहाय्य करणारे योगेश रामा खेमनर (वय 26, दोघेही रा.हिरेवाडी), प्रशांत भास्कर भडांगे (वय 24, रा.भडांगे वस्ती), विकास रामदास गुंड (वय 24, रा.मांडवे बु.) व विजय खेमनर (वय 22, रा.हिरेवाडी) या पाच जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (3), 109, 306, 506, 34 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 4, 8, 12, 17, 21 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करुन पहिल्या तिनही आरोपींना तत्काळ अटक केली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करीत आहेत. या घटनेने संपूर्ण पठारभागासह तालुक्यातून संताप व्यक्त होत असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भरसकाळी नऊच्या सुमारास रस्त्यावरुन चाललेल्या अल्पवयीन मुलीवर दांडगाई करीत तिला फरफटत नेवून अत्याचार करण्याचा हा प्रकार पठारभागात पोलिसांचे अस्तित्त्वच नाकारणारा आहे. ही घटना घडत असताना मुख्यआरोपीसह त्याला मदत करणार्यांना एकदाही कायद्याचा धाक वाटू नये याबाबत आश्चर्यही व्यक्त होत आहे. बापाच्या पैशांवर पोसलेले असे कितीतरी वळू आजही पठारावर अशाच प्रकारे धुडगूस घालीत असताना अत्याचारानंतर थेट आत्महत्येच्या या घटनेने अनेक प्रश्न उभे केले आहेत. पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन, नागरिक आणि प्रशासन या प्रत्येकाने त्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि त्यानंतर तिच्या आत्महत्येने तालुक्यात संताप निर्माण झाला असून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारपासून (ता.1) सुरु होणार्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (रिसिट) घेण्यासाठी शाळेत आलेल्या निष्पाप मुलीच्या आयुष्यात काय लिहिले आहे याची पुसटशीही कल्पना नसताना तिला सौरभ रावसाहेब खेमनर या लिंगपिसाटाने भररस्त्यातून अक्षरशः फरफटीत रुबाब नावाच्या पानशॉपमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. त्याच्या या कृत्याला चौघांनी प्रोत्साहन आणि पाठबळ दिल्याचेही समोर आले आहे. घारगाव पोलिसांनी सर्व पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेतून पठारभागात पोलीस आणि कायद्याचा धाक पूर्णतः संपल्याचेही अधोरेखीत केले आहे. भारतीय पोलीस सेवेतून आलेले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला आतातरी संगमनेर तालुक्याकडे गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

