जय श्रीराम नको, आपली बॅटच बरी! ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी सांगितली पुढची रणनीती


नायक वृत्तसेवा, नेवासा
माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवारी (ता.11) सोनईत मेळावा घेतला होता. याच मेळाव्यात त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनीही पुढील निवडणूक अपक्ष म्हणूनच लढविण्याचा सल्ला देत भाजप किंवा इतर पक्षांत किंवा गटासोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे चिन्ह बॅट आहे. तो धागा पकडून गडाख म्हणाले, यापुढेही आपली बॅटच बरी. गेल्यावेळी 30 हजारांचे मताधिक्क्य होते, ते आता 50 हजार करण्याचा प्रयत्न करा.

यावेळी बोलताना गडाख यांनी स्थानिक विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नेवासा तालुक्यात विरोधक हलकटपणे वागत आहेत. कौटुंबिक दुखःत असतानाही त्यांनी आम्हांला त्रास दिला. ज्यांना बोटाला धरून राजकारण शिकविले, तीच माणसे आमच्या विरोधात गेली. राजकीय विरोध तर केलाच मात्र, कौटुंबिक विषयांत हात घालून विनाकापण कोर्टबाजी केली. दु:खात विरोधकांनीही साथ द्यावी, अशी आपली भारतीय संस्कृती आहे. येथे मात्र उलटे झाले. पूर्वीही विरोधक होते. त्यांनी मलाही विरोध केला. मात्र, आज शंकरराव गडाख यांना जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला जात आहे, तसा प्रकार माझ्या बाबतीत नव्हता.

यावेळी गडाख यांनी आपले पुत्र शंकरराव यांचे कौतुक केले. ते म्हणाले, शंकररावांनी मंत्रिपपदाच्या काळात चांगले काम केले बरेच सर्वपक्षीय आमदारांनी मला सांगितले की, शंकररावने त्यांची कामे केली, हे ऐकून समाधान वाटते. तालुक्याचे नाव राखले याचा अभिमान आहे. त्यांनी जिल्ह्यात शिवसेना संघटना बळकट केली. आता राजकारण बदलत आहे. ते आणखी बदलणार आहे. त्यामुळे आपण आपले स्थिर राहिलेले चांगले. संघटना वाढली पाहिजे. त्या ताकदीवर आपण काहीही करू शकतो. तालुक्यातील काही कार्यकर्ते मला विचारत होते की आता आपण जय श्रीराम करायचे का? पण मी सांगतो, त्याची गरज नाही. आपली हीच एकजूट कायम ठेवा. शंकररावांच्या पाठीशी उभे रहा. आपली बॅटच बरी आहे, असेही गडाख म्हणाले.

शिवसेनेसंबंधी ते म्हणाले, आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलो असतो तर कदाचित मंत्रिपद कायम राहिले असते. मात्र ज्या उद्धव ठाकरेंनी शंकररावांना स्वतःहून बोलावून घेतले. कॅबिनेट मंत्रिपद आणि महत्त्वाचे खाते दिले. त्यांना अशावेळी सोडून जाणे योग्य वाटत नाही. पूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. अपक्ष लढलो, स्थानिक आणि विधानसभा निवडणूकही जिंकली. विश्वासाने लढल्याने हे यश मिळाले. तोच आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, असेही गडाख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *