साकूरमधील समांतर ‘न्यायालया’ने घेतला अल्पवयीन पीडितेचा बळी! गंभीर प्रकरणातही होतात परस्पर तडजोडी; वर्षभरापूर्वीचे ‘दुष्कृत्य’ही चव्हाट्यावर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दाक्षिणात्य चित्रपटांनाही लाजवेल अशा एखाद्या प्रसंगाप्रमाणे गेल्या महिन्यात साकूरमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि त्यानंतर तिने केलेल्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळत आहे. साकूरमध्ये वारंवार घडणार्‍या अशाप्रकारांना तेथील समांतर पद्धतीने चालणारे ‘न्यायालय’ जबाबदार असल्याची ‘दबकी’ मात्र जोरदार चर्चा आता कानावर येत आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात ठपका असलेल्या मुख्यआरोपीने वर्षभरापूर्वीही अशाच प्रकारचे दुष्कृत्य केले होते. मात्र त्यावेळी याच समांतर ‘न्यायालया’ने अतिशय गंभीर असलेल्या ‘त्या’ प्रकरणातही कायद्याला डावलून तडजोड केली. त्यामुळेच हिंमत वाढलेल्या आरोपी सौरभ खेमनरने दुसर्‍यांदा तसाच प्रकार केला. त्यावेळीच त्याला कायद्यासमोर हजर केले असते तर, कदाचित आज ‘त्या’ निष्पाप अल्पवयीन मुलीच्या इभ्रतीसह तिचा जीवही वाचला असता अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासोबतच साकूरमधील कथीत समांतर न्यायालयाचा विषयही तडीस नेण्याची गरज आहे.


गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी साकूर परिसरातील अवघ्या 15 वर्ष 8 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत आरोपी सौरभ खेमनरने भयानक दुष्कृत्य केले होते. भररस्त्यातून पीडित मुलीला फरफटत पानटपरीत नेवून घडलेल्या या भयंकर घटनेनंतर केवळ संगमनेरच नव्हेतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला गेला. हा प्रकार समोर आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी त्याची गंभीर दखल घेत वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करुन कठोर कारवाईच्याही सूचना दिल्या. मात्र तत्पूर्वीच घारगाव पोलिसांनी सूत्रधारासह आरोपींना गजाआड केल्याने या प्रकरणात कारवाई म्हणून शिल्लक काही राहीले नाही. मात्र या घटनेनंतरही तेथील ‘समांतर’ न्यायालय आजही कायम असून त्याद्वारे होणार्‍या परस्पर तडजोडीच अशाप्रकरणांच्या मुळाशी असल्याच्या चर्चा आता पठारभागात सुरु आहेत.


रस्त्यात आडवून दमबाजी, ओढीत टपरीत घेवून जाण्याचा आणि त्यानंतर अन्य आरोपींच्या मदतीने अत्याचाराचा संतापजनक प्रकार करणारा आरोपी सौरभ रावसाहेब खेमनर (वय 21, रा.हिरेवाडी, पो.साकूर) याला साकूरमध्ये टवाळखोर म्हणून ओळखले जाते. आपल्या साथीदारांसह दिवसभर रुबाब नावाच्या पानटपरीवर थांबून शाळेत जाणार्‍या-येणार्‍या अल्पवयीन विद्यार्थीनींची छेडछाड करणे, त्यांच्यावर अश्‍लिल शेरेबाजी करणे, विनयभंग करणे असे उद्योग तो नियमितपणे करीत असल्याचे आता समोर येत आहे. त्यातही अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वीही आरोपीने अशाचप्रकारे एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करीत तिला त्रास दिला होता.


एव्हढ्यावरच न थांबता त्याने त्या विद्यार्थीनीच्या सहनशिलतेचा फायदा घेत वेळोवेळी तिचा विनयभंग करण्यासह तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचेही आता उघड होवू लागले आहे. या प्रकारानंतर संबंधित पीडितेच्या पालकांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र अत्यंत गंभीर आणि चीड आणणार्‍या या प्रकरणातही साकूरमधील कथीत समांतर ‘न्यायालया’ने हस्तक्षेप केला. न्यायव्यवस्थेप्रमाणेच पीडित आणि आरोपीकडील मंडळींना पाचारण करण्यात आले. आरोपीची उपस्थित दोन्ही बाजूच्या लोकांसमोरच झाडाझडती घेतली गेली आणि सर्वांसमक्ष परस्पर त्याचा निवाडा करताना आरोपीला पीडितेसह तिच्या कुटुंबाची माफी मागण्यास सांगण्यात आले.


ज्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा होवू शकते अशा प्रकरणातही साकूरच्या समांतर न्यायालयाने आपला ‘हुकमी’ दबदबा वापरुन चक्क तडजोडीचा कागद तयार केला. अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या कागदात छेडछाड, विनयभंग आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या सौरभ रावसाहेब खेमनर याचा संपूर्ण जवाब नोंदवून आपल्याकडून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची शाश्‍वती लिहून घेतली गेली. पीडितेच्या कुटुंबानेही समांतर न्यायालयाच्या बेकायदा निवाड्याखाली दबून आपल्या मुलीची अब्रु लुटली मात्र कुटुंबाची वाचल्याचे समाधान मानीत कायद्यालाच फाटा देणार्‍या ‘त्या’ तडजोडीच्या कागदाला संमती दर्शवली आणि एकप्रकारे आरोपीला दुष्कृत्य करण्यासाठी रान मोकळे केले.

धक्कादायक गोष्ट म्हणजे सदरचा प्रकार कालच्या घटनेत अत्याचारानंतर आत्महत्या करणार्‍या पीडित मुलीच्या नात्यातल्याच अन्य एका अल्पवयीन मुलीसोबत घडला होता. या घटनेनंतर वर्षभरापूर्वी बेकायदापणे परस्पर दाबून टाकलेला ‘तो’ विषयही आता चव्हाट्यावर आला असून साकूरच्या समांतर न्यायालयाचे वेगवेगळे किस्सेही आता कानावर येवू लागले आहेत. याबाबत पोलिसांनाही पूर्ण माहिती असतानाही त्यांच्याकडून आजवर या कथीत समांतर न्यायालयाबाबत चकार शब्दही समोर आलेला नाही. कालच्या घटनेनंतर एका वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यासमोर हा विषय आल्यानंतर त्यांनी पीडितेकडून तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्याची तयारीही दाखवल्याची चर्चा आहे. मात्र कथीत समांतर न्यायालयाबाबत त्यांनीही सोयीस्कर ‘मौन’ बाळगल्याने मोठे आश्‍चर्य निर्माण झाले आहे.


घारगाव पोलीस ठाण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या साकूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काही राजकीय पांढरपेशांकडून ‘समांतर’ न्यायालय चालविले जाते. त्याद्वारे झालेल्या वेगवेगळ्या निवाड्यांच्या चर्चा यापूर्वीही चर्चील्या गेल्या आहेत. मात्र यावेळी चक्क लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणातही या बेकायदा व्यवस्थेचा थेट हस्तक्षेप अत्यंत धक्कादायक आहे. वर्षभरापूर्वी केलेल्या अशाच तडजोडीतून हिंमत वाढलेल्या आरोपीने त्याची पुनरावृत्ती केली आणि त्यात अवघ्या साडेपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या इज्जतीसह तिचा जीवही गेला. त्यामुळे या घटनेला केवळ आरोपीच नव्हेतर समांतर चालणारे हे कथीत न्यायालयही जबाबदार आहे. न्यायकर्त्यांनी या गोष्टीकडेही अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा अशाप्रकारे अल्पवयीन मुलींचे छळही होत राहतील आणि त्यांच्यावर अत्याचाराचे प्रकारही घडतील, आरोपी मात्र माफीनामा सादर करुन पुन्हा पुढच्या घटनेसाठी सज्ज होत राहतील.

Visits: 254 Today: 4 Total: 1105474

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *