शिर्डीत आजी-माजी खासदारांमध्ये रंगणार लोकसभेची लढत! वाकचौरेंना ‘मातोश्री’चा ग्रीन सिग्नल; लोखंडेंबाबत दोन दिवसांत निर्णय..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुढील चोवीस तासांत अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या अंतिम केल्या जात आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकांचे वातावरण तापायला सुरुवात झाली असून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत आपल्या 20 उमेदवारांची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. मात्र महायुतीतल्या घटक पक्षांकडून अद्यापही उमेदवारांबाबत ‘सस्पेन्स’ कायम असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील इच्छुकांची घालमेल वाढली आहे. अशातच शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या जिल्हाध्यक्षांनी शिर्डी लोकसभेसाठी चर्चेत असलेल्या नावांवर एकमत झाल्याचा दावा केल्याने शिर्डीतील आगामी लढत शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांमध्येच रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून त्यांच्याबाबत केलेल्या अंतर्गत सर्व्हेत मतदारांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त समोर येत होते. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देशभरातील आपल्या घटकपक्षांसह 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्या अनुषंगाने लोकसभेच्या सर्वच्या सर्व 543 जागांचे वारंवार सर्व्हे केले जात असून जिंकून येण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाचा हा निर्णय मित्रपक्षांनाही लागू असल्याने शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या शिर्डीच्या जागेबाबतही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्यावेळी संयुक्त शिवसेनेने 23 जागा लढवून 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर पक्षात बंडाळी होवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत
त्यातील 13 खासदारांनी प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडे केवळ पाच खासदारांसह 15 आमदारांचे संख्याबळ उरले आहे. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या सूत्रानुसार शिवसेनेला मागीलवेळी लढवलेल्या 23 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतच्या वाटाघाटीही अंतिम झाल्याचे वृत्त असून शिर्डीसाठी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्याचा दावा या गटाच्या जिल्हाप्रमुखांनी केला आहे. वाकचौरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच ‘आपला माणूस – आपल्यासाठी..’ असे म्हणतं प्रचारालाही सुरुवात केली. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित होते, आता त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.

दुसरीकडे शिंदेगटाकडून शिर्डी मतदार संघ घ्यावा यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठा आग्रह लावून धरला आहे. त्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शिर्डीतून उमेदवारी मिळण्याची मागणी केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. विद्यमान खासदाराबाबत शिर्डी लोकसभा मतदार संघात केलेला अंतर्गत सर्व्हे अहवालही नकारात्मक असल्याची चर्चा असल्याने भाजपकडून त्यांच्या नावाला विरोध असल्याचेही वृत्त समोर आले होते. त्यामुळे खुद्द खासदार सदाशिव लोखंडेही साशंक झाले होते.

मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून आपल्या कामांची यादीच त्यांच्यासमोर मांडल्याने आणि विजयाचा दावा केल्याने शिवसेनेकडून त्यांनाच उमेदवारी
दिली जाईल असा शब्द त्यांना मिळाल्याचे वृत्त आहे. शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनीही तसेच संकेत दिल्याने येत्या एक-दोन दिवसांतच महायुतीचा जागावाटपाचा फार्मुला निश्चित झाल्यानंतर नावांबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याची उत्कंठा वाढवणार्या शिर्डी लोकसभा मतदार संघात यंदा संयुक्त शिवसेनेच्या बळावर निवडून आलेल्या ‘आजी-माजी’ खासदारांमध्येच लढत होणार असल्याचे आता स्पष्ट होवू लागले आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फार्मुला अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केल्याने उद्याच देशातील निवडणुकांची घोषणा होवून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात 30 जागा लढवून 13 शिंदे गटाच्या शिवसेनेला तर 5 अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा नवा फार्मुला समोर आणल्याची माहिती असून येत्या दोन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होवून भाजपच्या उर्वरीत उमेदवारांसह मित्रपक्षांच्या उमेदवारांचीही घोषणा होईल.

