कोल्हेवाडी हल्ला प्रकरणात दुसरा आरोपी कारागृहात उपअधीक्षकांच्या पथकाची कामगिरी; अल्पवयीन सूत्रधार आज बालन्यायालयात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत दुसर्यांदा संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडवणार्या कोल्हेवाडी हल्ला प्रकरणात पोलिसांवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून दिवसरात्र एक केली जात असून गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने आणखी एकाच्या मुसक्या आवाळल्या आहेत. उमर फैय्याज सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तर, या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 16 वर्षीय सूत्रधाराला आज अहिल्यानगरच्या बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. घटनास्थळावरील व्हिडिओवरुन पोलिसांनी आणखी काही आरोपींची नावेही निष्पन्न केली असून त्यांचाही कसून शोध घेतला जात आहे.
मंगळवारी (ता.12) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संगमनेरच्या कोल्हेवाडी रस्त्यावर दहा महिन्यापूर्वी घडलेल्या जोर्वेनाका प्रकरणाची पुनरावृत्ती झाली होती. शासकीय जागांवर उभारलेल्या अवैध व्यवसायातून मिळणार्या मलिद्यावर पोसलेल्या गुंडांनी चिमुरड्या मुलींसह शहराकडे येणार्या तरुणाला शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर संगमनेरातील सामाजिक वातावरण खराब झाले असून अशाप्रकारची दादागिरी आणि अवैध व्यवसाय सहन केले जाणार नसल्याचे सांगत विविध हिंदुत्त्ववादी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात सरसावल्या आहेत.
याबाबत बुधवारी (ता.13) शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत या घटनेचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी जमलेल्या हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी शहराच्या अवतीभोवती बोकाळलेले प्रचंड अतिक्रमण आणि त्याच्या आडोशाला राजरोसपणे चालणार्या अवैध व्यवसायांमुळेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप करताना पोलीस प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला होता. या बैठकीत घटनेनंतर पोलिसांकडून प्रत्यक्ष कारवाई करण्यात विलंब झाल्यानेच आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला होता.
दोन दिवसांत सर्व आरोपींना गजाआड करुन कोल्हेवाडी रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे मुळासकट उखडली गेली नाहीत तर संगमनेरात पुन्हा एकदा ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण झाला असून या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली आहे. मात्र त्या उपरांतही त्यांच्याकडून दिवसरात्र एक करुन आरोपींचा माग काढला जात आहे. अशाच प्रयत्नांना गुरुवारी सायंकाळी यश मिळाले आहे.
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना यातील एक आरोपी सायंकाळी घरी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल डोके व राहुल सारबंदे यांना पाळत ठेवून कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने माहिती मिळालेल्या आरोपीच्या घराजवळ दबा धरुन रात्रीच्या अंधारात साडेआठच्या सुमारास घराकडे जात असलेल्या आरोपी उमर सय्यद फैय्याज कादर (वय 23, रा.मदिनानगर) या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला रात्रीच कारागृहात टाकण्यात आले असून आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
बुधवारी (ता.13) रात्री पोलिसांनी या घटनेच्या सोळा वर्षीय मुख्य सूत्रधारासह अरबाज गुलामनबी कुरेशी (वय 24, रा.अलकानगर, जुना जोर्वेरोड) याला जेरबंद केले होते. सध्या अरबाज कुरेशी पोलीस कोठडीत असून अल्पवयीन सूत्रधाराला आज अहिल्यानगरमधील बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.