कोल्हेवाडी रस्त्यावरील घटनेला अवैध व्यवसायांचे कोंडाळे? दोघा कसायांच्या वादातून घडला प्रकार; मुख्य आरोपीसह दोघे पोलिसांच्या ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातून कोल्हेवाडीकडे जाणार्या रस्त्यावर शुल्लक कारणावरुन एकाला बेदम मारहाण करण्याच्या घटनेने संगमनेरातील सामाजिक सौहार्दाला पुन्हा एकदा तडा गेला आहे. अवघ दहा महिन्यांच्या कालावधीत घडलेल्या या दुसर्या घटनेतून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवरील पोलिसांचा ‘धाक’ संपुष्टात आल्याची शंकाही निर्माण झाली आहे. त्यातच मंगळवारच्या ‘त्या’ घटनेपूर्वी दोघा कसायांमध्ये अंतर्गत वाद झाला होता. त्याचा राग गोमांस भरुन निघालेल्या पिकअपच्या चालकाने राहुल गुंजाळ या तरुणाला मारहाण करुन काढल्याची जोरदार चर्चा समोर येत आहे. त्यामुळे संगमनेरच्या जातीय तणावाला अवैध व्यवसायांचे कोंडाळेच कारणीभूत असल्याचेही आता बोलले जात आहे. शहरातील कत्तलखाने बंद असल्याचा दावा खोडणार्या या घटनेला जबाबदार असलेले सर्वच आरोपी सध्या पसार आहेत. मात्र या घटनेने पोलिसांच्या र्काक्षमतेवरच प्रश्न निर्माण केल्याने कातडी वाचवण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडीत घटनेनंतर 36 तासांनी सोळा वर्षीय अल्पवयीन मुख्य आरोपीसह अरबाज कुरेशी याला ताब्यात घेतले आहे.

कधीकाळी जातीय तणावाचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहरातील बहुतेक दंगली अवैध व्यवसायाच्या कारणातून घडल्याचा इतिहास आहे. मात्र गेल्या तीन दशकांत बदललेल्या परिस्थितीनुसार संगमनेरकरांनी सामाजिक सलोखा राखताना दंगलीच्या शहराचा डाग पुसण्याचा प्रयत्न सुरु ठेवला असताना गेल्या चार वर्षात एका पाठोपाठ त्याला धक्का देणार्या घटनाही समोर येत आहेत. त्यावरुन कोणत्यातरी अदृष्य शक्तिने शहराची सामाजिक शांतता भंग करण्याचे षडयंत्र रचल्याचाही वास आता येवू लागला आहे. गेल्यावर्षी 28 मे रोजी केवळ वाहनाचा हॉर्न वाजवला या कारणावरुन जोर्वेनाका येथील अतिक्रमणधारक व अवैध व्यावसायिकांनी झुंडगिरी करीत जोर्वेतील शेतकर्यांच्या निष्पाप मुलांवर सशस्त्र हल्ला चढवला होता. या घटनेला अद्याप दहा महिनेही होत नाही तोच पुन्हा एकदा तसाच प्रकार समोर आल्याने या दाव्यालाही बळ मिळत आहे.

खरेतर आपल्या कार्यक्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था राखताना प्रभारी पोलीस अधिकारी भूतकाळातील घटनांना अधिक महत्त्व देतात. त्या अनुषंगाने शहरात सर्वत्र बोकाळलेल्या अशा प्रवृत्तींवर वेळोवेळी वचक निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो. यापूर्वी मटका, दारु व गांजाच्या धंद्यातून शहरातील जातीय तणावात भर पडायची, मात्र गेल्या दहा वर्षांपूर्वी राज्यात गोहत्येच्या कायद्यात सुधारणा करुन राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. त्यामुळे जर्शी जनावरे आणि म्हशी दाखवून गुपचूप चालणार्या या बेकायदा धंद्याला खूप मर्यादा आल्या आणि त्यातूनच आर्थिक गणितं आणि परस्पर व्यावसायिक स्पर्धा वाढीस लागल्याने आता संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखाने संगमनेर शहराला पुन्हा एकदा भूतकाळात घेवून जाण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र उभे राहू लागले आहे.

मंगळवारी (ता.12) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन्ही समुदायाची संमिश्र लोकवस्ती असलेल्या कोल्हेवाडी रोडवर घडलेल्या ‘झुंडगिरी’च्या या घटनेलाही बेकायदा व्यवसायाची किनार असल्याचे आता समोर येत आहे. या प्रकरणात दुचाकीला कट मारल्यानंतर पुढे जावून दुचाकीस्वाराने केवळ चालकाकडे पाहिले म्हणून त्याला बेदम मारहाण केली गेली. वास्तविक या घटनेपूर्वी संबंधित पिकअपचा चालक आणि परिसरातील अन्य एका कसायामध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याची चर्चा आहे. त्या रागातूनच बेदरकारपणे वाहन हाकीत निघालेल्या आरोपीने नियमाने दुचाकी चालवणार्या राहुल गुंजाळ याला पाठीमागून येवून कट मारला व काही अंतरावर त्याची दुचाकी आडवून त्याला मारहाणही केली आणि त्यासाठी आपल्या अन्य साथीदारांनाही बोलावले. धक्कादायक म्हणजे ज्या वाहनाने कट मारल्याच्या कारणावरुन शहराची शांतता धोक्यात आली, त्या पिकअपमध्ये त्यावेळी कांपलेल्या गोवंशाचे मांस भरलेले असल्याचीही जोरदार चर्चा आता सुरु आहे.

या घटनेतील मुख्य आरोपी अल्पवयीन असून तो या घटनेतील आरोपी क्रमांक तीन असलेल्या समद कुरेशी याच्या कत्तलखान्यात वाहनचालक म्हणून काम करतो. तर निष्पन्न आरोपींमधील दुसर्या क्रमांकाचा आरोपी अरबाज कुरेशी हा देखील त्याच्याकडेच सेवेत असून त्याच्या भावाचाही कत्तलखाना असल्याची माहिती आता समोर आली आहे. अल्पवयीन मुख्य आरोपीने हाणामारीसाठी बोलावलेली कुमकही जातीय नव्हेतर व्यावसायिक असल्याचेही त्यातून समोर येत आहे. त्यामुळेच घटनेची छायाचित्रे व व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी लागलीच तिघांची ओळखही पटवली. या घटनेत सहभागी असलेले बहुतेक आरोपी यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवर असल्याने रमजानच्या कालावधीत कारागृहात बसण्याची वेळ येवू नये यासाठी त्याच दिवशी सगळे संगमनेरातून पसार झाले.

मात्र आज पहाटे अल्पवयीन (वय 16 वर्ष) असलेल्या मुख्य आरोपीसह दुसर्या क्रमांकाचा आरोपी अरबाज गुलामनबी कुरेशी (वय 24, दोघेही रा. अलकानगर, जुना जोर्वेरोड) हे दोघे आज (ता.14) घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सकाळी सहा वाजता पोलिसांनी दोघांच्याही घरावर छापा घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यातील अरबाज कुरेशी याला अटक करण्यात आली असून दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तर, अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाला नोटीस बजावण्यात आली असून कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला अहिल्यानगरच्या बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

एकंदरीत जोर्वेनाक्या प्रमाणेच या घटनेलाही बेकायदा व्यवसायांची किनार असल्याचे आता हळुहळु समोर येवू लागले असून चक्क विनाक्रमाकांच्या पिकअप वाहनातून बेकायदा पद्धतीने गोवंशाचे मांस घेवून जात असतानाही चालकाने घातलेला धुडगूस आणि त्याला पाठबळ देण्यासाठी सरसावलेले अन्य सातजण कत्तलखान्याशी निगडीत असल्याचीही जोरदार चर्चा परिसरासह पोलीस वर्तुळात सुरु आहे. हप्तेखोरी आणि गुन्हा दाखल केल्यास पितळ उघडे होण्याच्या भितीनेच पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत नंतर केवळ अदखलपात्र गुन्ह्यावरच फिर्यादीची बोळवण करुन आरोपी अटक करण्याच्या प्रक्रियेलाच फाटा देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ‘वरतून’ दाब पडताच पोलिसांचे मनसुबे उधळले आणि वास्तवतेचे दर्शन घडल्याचे आता बोलले जात आहे.

गेल्या काही वर्षात संगमनेरातील अवैध व्यावसायिकांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामागे यंत्रणांची हप्तेखोरी कारणीभूत असल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. संगमनेरात कधीकाळी घडणार्या जातीय दंगलीमागेही अशीच कारणं असतं, मात्र गेल्या तीन दशकांत त्यात खंड पडलेला असताना आता हळुहळु असे प्रकार डोके वर काढीत असून सुसंस्कृतपणाचे सोंग घेणार्या संगमनेर शहराचा प्रवास पुन्हा एकदा जातीय तणावाच्या शहराकडे सुरु झाला आहे. या घटनेची राजकीय धुरिणांसह वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनीही गांभीर्याने नोंद घेण्याची गरज आहे, अन्यथा मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर दिसणारी शांतता वादळापूर्वीची ठरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

